बनावट लग्न करुन तरुणीवर बलात्कार.! एकास अटक.! संगमनेर व शिर्डीत अत्याचार.!

सार्वभौम (संगमनेर) :- 

                लग्नाचे आमिष दाखवून ओझर खुर्द येथील एका तरुणाने संगमनेर शहरात राहणार्‍या एका तरूणीवर बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. हा प्रकार 2017 ते 2020 पर्यंत वारंवार होत होता. मात्र, आपल्यावर अत्याचार आणि अन्याय झाला असून आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी अतुल शांताराम कदम (रा. ओझर खुर्द, ता. संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अतुल कदम याने संगमनेर शहरातील साईश्रद्धा चौक परिसरात राहणार्‍या एका मुलीशी ओळख झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून आले. त्यानंतर कदम याने एक पाऊल पुढे टाकत तिला लग्न करण्यासाठी साद घातली. मात्र, या दरम्यान त्याने तिच्याशी लगट करून शिर्डी येथे नेेले. तेथे दर्शनाच्या नावाखाली याने एका ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. आपण लवकरच लग्न करू असे सांगून त्यांच्यात 2017 ते 2020 पर्यंत वारंवार शरिरसंबंध होत राहिले.

दरम्यान, कदम याने पीडित मुलीच्या घरात देखील तिच्याशी संबंध ठेवले होते. त्यानंतर तिने लग्नाची मागणी केली असता त्याने तुर्तास थांबण्यास सांगितले होते. यावेळी जेव्हा तिने कदम याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या हलचाली सुरू केल्या तेव्हा कदम याने पोलीस आणि गुन्ह्याच्या फंद्यात अडकण्यापेक्षा मॅरेज सेटलमेंट डिड नोटरी करुन तिला लग्न न करता स्वत:च्या घरी घेऊन गेला. या दरम्यान देखील तिच्याशी वारंवार संबंध ठेऊन तिची वारंवार दिशाभूल करुन फसविण्याचा कट रचत राहिला.

दरम्यान, पीडित मुलीने त्याच्याकडे लग्नाची मागणी केली असता त्याने तिला बेदम मारहाण केली. तर काही काळानंतर घरातून बाहेर काढून दिले. त्यानंतर हा प्रकार पीडित व्यक्तीने पोलीस ठाण्यात कथन केला. त्यानंतर तिच्या फिर्यादीनुसार शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. त्यानंतर पुढे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तत्काळ खबरदारी घेत कदम यास अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास महाले करीत आहे.