मेजरला फायटरने मारहाण.! 11 जणांवर गुन्हे दाखल.! संगमनेर तालुक्यातील घटना.!

सार्वभौम (संगमनेर) : - 

                  संगमनेर तालुक्यातील निमज येथे जमिनीच्या बांदावरून दोन गटात तुफान हाणामार्‍या झाल्या. यात निवृत्त सैनिकाच्या डोक्यात फायटर ने हल्ला केला तर त्यांच्या कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवार दि. 19 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली. यात पोपट चिमाजी कासार (रा, निमज, ता. संगमनेर) हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णलयात उपचार सुरू आहे. तर या प्रकरणी 14 जणांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोपट चिमाजी कासार हे 2012 ला भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाले आहे. देशाच्या सेवेनंतर काय करायचे तर त्यांनी शेतीला प्राधान्य देत शेती व्यावसाय सुरू केला. त्यांच्या शेजारी राहणारे चुलत भाऊ यांचे नेहमी बांदावरून भांडणे होत होते. या भांडणाची काही लोकांनी मध्यस्ती केली असता चुलतभावाने बाहेर गावचे तसेच गावातील काही लोकांना बोलावून पोपट कासार यांच्यावर अचानक हल्ला करत त्याला मोटरसायकल वरून ढकलून दिले. या झटापटीत पोपट कासार यांना हातातील फायटर डोक्याला लागल्याने मोठी दुखापत झाली आहे. त्याना सोडवण्यासाठी गेलेले भाऊ, पत्नी, वडील मुलं यांनाही मारहाण करण्यात आली. त्यामुळे सर्वजण संगमनेर मधील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

दरम्यान याप्रकरणी कासार यांनी फिर्याद दिली असता त्यानुसार गुलशन भरत कातोरे, कुसुम गुलशन कातोरे, विलास बाछव कासार, शकुंतला बाच्छव कासार, मीना विलास कासार, बाच्छव बाबुराव कासार, बाळू उत्तम दिघे यांचा मुलगा व इतर 6 ते 7 जण यांच्यावर याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार हे स्वतः करत आहेत.

दरम्यान, निमज गावात पाच महिन्यापुर्वी जामीनिच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामार्‍या झाल्या होत्या. पण, साधा अदखल पात्र गुन्हा देखील नोंदवला गेला नाही. परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे तसेच गावगुंडांना राजकीय पाठबळ मिळाल्याने गावा-गावात गावगुंडांची दहशत वाढतच चालली आहे. गावगुंडांना वाळूतस्करांची साथ मिळाल्याने हाणामार्‍यांची प्रकरणे वाढू लागले आहेत. तातडीने या गुंडाच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी आता होऊ लागली आहे. तसेच राजकीय लोकांनी त्यांना पाठीशी न घालता सत्य जाणून सत्याच्या पाठीशी उभे राहण्याची गरज संगमनेर तालुक्यात निर्माण झाली आहे.