सर्वात आनंदाची बातमी.! अकोले-संगमनेरात कोरोनाची लस दाखल.! प्रत्येकाला लस मिळणार.!
मार्च महिन्यात कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आणि रात्री 8 वाजता काही क्षणात देश लॉकडाऊन झाला. तेव्हापासून तर आजवर नगर जिल्ह्यात 70 हजार 750 व्यक्तींना कोरोनाने ग्रासले होते. त्यात संगमनेर तालुका कोरोनाच्या अजेंड्यावर होता. येथे 6 हजार 151 रुग्ण एकट्या तालुक्यात होते. तर अकोले तालुक्यात ही संख्या 3 हजार 156 इतकी होती. संगमनेरात 51 तर अकोल्यात 32 व्यक्तींनी प्राण गमविल्यानंतर दोन्ही तालुक्याला आनंदाची बातमी ऐकण्यास मिळाली आहे. ती अशी की, संगमनेरात 300 तर अकोल्यात 300 अशा 600 कोव्हिशील्ड वॅक्सीन (लस) देण्यात आल्या आहेत. त्यामुळे, दोन्ही तालुक्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागाचे 600 तर नंतर महसूल, अंगणवाडी सेविका, पोलीस, जनता अशी प्रत्येकाला ही लस देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी रोखठोक सार्वभौमशी बोलताना दिली. ही तालुक्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
मंगळवार दि. 8 मार्च 2019 रोजी देश पुर्णत: बंद झाला. तेव्हापासून देशाच्या अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली तर प्रत्येक नागरिकाचे हाल बेहाल झाले.त्यानंतर या कोरोनावर उपाय काय? तर फक्त हात धुणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर बाळगणे आणि रग्गड आहार घेणे यापेक्षा बाकी सर्व भुलथापा होत्या. कोरोनावर आज लस येईल, उद्या येईल अशा अनेक आशांवर निव्वळ पाणी फेरले गेले. आता मात्र ते स्वप्न सत्यात उतरले आहे. आज आपल्या तालुक्यात कोरोनाच्या लसीचे आगमन झाले असून ज्या डॉक्टर सेवकांनी स्वत:च्या जीवाची परवा न करता कडूकाळ दिवसात जनतेची सेवा केली. त्यांना ही लस देण्यात आली आहे. आज मनस्वी आनंद वाटतो की, संगमनेरात 100 आरोग्य कर्मचार्यांना तर अकोल्यात 78 कर्मचार्यांना कोव्हिशील्ड वॅक्सीन (लस) देण्यात आली आहे. ही लस स्वइच्छेची असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
संगमनेर तालुक्यात आजवर 33 हजार 600 स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यात नगर येथे 6 हजार 977 तर रॉपीड अॅन्टीजन टेस्टनुसार 21 हजार 559 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले होते. या व्यतिरिक्त खाजगी लॅबमध्ये 5 हजार 64 असे मिळून 68 हजार 861 स्वॅब झाले आहेत. त्यामुळे येथील पॉझिटीव्ह रेट हा 18.30 टक्के आजही आहे. या सर्वात आजवर 6 हजार 151 रुग्ण पॉझिटीव्ह मिळून आले आहेत तर यातील 51 जणांना कोविडशी सामना करताना मृत्युला सामोरे जावे लागले आहे. खरंतर संगमनेर प्रशासनाने इतक्या कडूकाळ दिवसात देखील जिगर सोडली नाही. कालपर्यंत संगमनेर शहरात रुग्ण अॅडमिट करण्यासाठी कॉट मिळत नव्हती. सुदैवाने आज काही कोविड सेंटर बंद करण्यात आले आहेत. कारण, सद्यस्थितीला फक्त 125 रुग्णांवर उपचार सुरू आहे. अशा परिस्थितीत आज शनिवार दि. 16 जानेवारी 2021 रोजी संगमनेरात 300 कोव्हिशील्ड वॅक्सीन (लस) उपलब्ध झाल्या असून आता कोविडचा अंत होणार. यात तिळमात्र शंका नाही. मात्र, हे दिवस पाहण्यासाठी तालुक्यात शेकडाभर लोकांना आपला जीव गमवावा लागेेला, हे विसरुन चालणार नाही.
या पलिकडे अकोले तालुक्यातील आरोग्य, महसूल व पोलीस यंत्रणेचे कौतुक करावे तितके कमीच आहे. कारण, मार्चमध्ये देश स्थिरावला आणि देशाच्या गल्लीबोळात कोरोनाने हाहाकार माजविला होता. अशा परिस्थितीत अकोले तालुक्यात तब्बल तीन महिने एकही कोरोनाचा रुग्ण मिळून आलेला नव्हता. हे सर्व श्रेय तहसिलदार, सीओ बीडीओ आणि पोलीस निरीक्षक यांना जाते. कारण, यांनी जीवाचे रान करुन अकोल्याच्या सिमारेषांवर कडा पहारा दिला होता. तेव्हा कोठे कोरोनाचे सावट तालुक्याची शीव ओलांडू शकले नाही. या तीन महिन्यात रुग्ण नव्हता मात्र, तरी देखील तहसिलदार मुकेश कांबळे, डॉ. इंद्रजित गंभीरे, पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांनी पायाला अक्षरश: भिंगरी बांधली होती. त्यावेळी एक ना दोन तब्बल 50 हजार व्यक्तींना आजवर होमक्वारंटाईक केले होते. ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. अर्थात हे कोण्या एकट्याचे यश नाही तर त्यात अनेकांचा सामावेश आहे हे देखील नाकारुन चालणार नाही.
अकोले तालुक्यात आजवर 22 हजार 326 संशयित रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 3 हजार 156 रुग्ण आजवर पॉझिटीव्ह मिळून आले आहेत तर 3 हजार 211 रुग्ण बरे झाले आहेत. हा सर्व प्रवासात कोविडशी झुंज देत असताना तालुक्यातील 32 जणांनी लढताना अखेरचा श्वास घेतला आहे. त्यामुळे, या कोव्हिशील्ड वॅक्सीनचे (लस) महत्व किती आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. आज अकोले तालुक्यातील शासकीय रुग्णालयात 300 लस दाखल झाल्या आहेत. त्या आज देण्याचे शासनाचे आदेश असल्यामुळे ज्यांची नावे होती त्यांना तत्काळ माहिती दिली असता त्यातील 78 आरोग्य सेवकांनी ही लस घेतली आहे. जे गैरहजर होते त्यांच्या लस पेंडींग आहेत. ज्यांना लस द्यायच्या आहेत त्यांना टप्याटप्याने देण्यात येणार आहेत.
दरम्यान, कोरोनाचे संकट आजुनही गेलेले नाही. त्यामुळे कोव्हिशील्ड वॅक्सीन (लस) आली असली तरी प्रशासनाने जे काही नियम व अटी ठरवून दिल्या आहेत त्यांचे पालन कारणे अनिवार्य असणार आहे. आरोग्य विभागाला लस देऊन झाल्यानंतर महसूल, पोलीस यांच्यासह काही खाजगी हॉस्पिटल आणि जनतेला देखील ही लस देण्यात येणार आहे. ही लस घेणे अनिवार्य नसून ती घ्यायची की नाही हे प्रत्येकाच्या मनावर आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत वितरीत करण्यात येणार असून जर खाजगी रुग्णालयात ती दिली जात असेल तर त्याचे नाममात्र शुल्क आकारले जाऊ शकतात. त्यासाठी शासनाकडून सविस्तर गाईडलाईन येणार आहे. तोवर आता कोव्हिशील्ड वॅक्सीन (लस) आपल्या तालुक्यात येऊन पोहचल्याचा आनंद नागरिकांनी व्यक्त केला आहे.