मोबाईल शॉपी फोडणारे ते सराईत चोरटे पोलिसांच्या जाळ्यात.! दोघांना अटक, मोबाईल, गाड्या, एलईडीसह सहा गुन्हे उघड.!
सार्वभौम (राजूर) :-
अकोले तालुक्यातील राजूर येथे ओमनगर परिसरात अपना मोबाईल शॉपी आणि शेंडी व पांजरे येथे घरफोडी झाल्याची घटना घडली होती. यात गुन्ह्यातील सराईत दोन गुन्हेगारांनी राजुरचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विष्णु विठू सोडनगर (रा. घाटघर, ता. अकोले) व सोमनाथ शिवाजी भुतांबरे (रा. समशेरपूूर, चिंचेचीवाडी, ता. अकोले) या दोघांना अटक केली असून हे दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. आज त्यांना न्यालयालयात हजर करण्यात आले होते. त्या दोघांना पुढील तपासासाठी 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कामगिरीनंतर पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांनी राजूर पोलिसांचे कौतुक केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 27 ऑक्टोबर 2020 रोजी राजूर शहरातील तोफीक आयुब तांबोळी (रा. ओमनगर) यांच्या अपना मोबाईल शॉपीत चोरी झाली होती. यातून 30 हजार 3353 रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला होता. त्यावेळी आयुब यांनी राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून पोलीस या गुन्ह्याचा अगदी कसोशीने तपास करीत होते. या दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना गोपनिय सुत्रांकडून माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी विष्णु विठू सोडनगर व सोमनाथ शिवाजी भुतांबरे हे दोघे घाटघर परिसरात आहेत. त्यावेळी पाटील यांची टिम थेट घाटघर येथे दाखल झाली. तेथे मिळालेल्या माहितीनुसार या टिमने दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
दरम्यान, या दोघांकडे पोलिसांनी कसून चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे सराईत गुन्हेगार असल्यामुळे त्यांनी नाहीची रि ओढली. मात्र, पोलिसांना खात्रीशिर माहिती असल्यामुळे त्यांनी यो चोरट्यांना खाक्या दाखविला आणि यातील विष्णु हो पोपटासारखा बोलता झाला. खरंतर सोमनाथ हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आत्तापर्यंत 9 गुन्हे दाखल आहेत. तर या पलिकडे त्याने किती केले असतील हे त्यालाच माहिती आहे. घोटी, इगतपुरी राजूर आणि अकोले तालुक्यात त्याची चोरीबाबत आता फार मोठी दहशत आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्यामुळे त्याने तोंड खोलले नाही. मात्र, त्याच्या सोबत असणार्याने सगळ्या चोर्यांची माहिती दिली. माग नंतर बाकी सोमनाथ पोपटासारखा बोलला आणि त्याचे चोर्या केलेल्या वस्तू देखील पोलिसांना दिल्या.
यात दोघांनी कबुली दिली की, राजूर येथील अपना मोबाईल शॉपी आम्हीच फोडली आहे. त्यातील काही मोबाईल त्यांनी पोलिसांच्या स्वाधिन केले आहेत. त्यानंतर त्यांनी शेंडी आणि पांजरे अशा काही ठिकाणी घरफोड्या केल्याची माहिती दिली. तसेच इगतपुरी येथे बावली गाव येथील काही दुचाक्या देखील त्यांनी जनावरांच्या चार्यात लपवून ठेवल्या होत्या. त्या देखील पोलिसांना काढून दिल्या आहेत. तर तीन एलईडी टिव्ही, 3 मोटार सायकली, 3 मोबाईल असा लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्याकडून ताब्यात घेतला आहे. आज या दोघांंना न्यायालयाने शनिवार दि.19 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खैरनार, आघाव, डगळे, थोरात, मोरे या पथकाने केली.
दरम्यान, अकोले तालुक्यात आजवर खून, बलात्कार, अपहरण, मारामार्या अशा गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात अनेकदा यश आलेले आहे. मात्र, चोरीच्या गुन्ह्यात आरोपी अटक होतात हे चित्र तालुक्याने फार कमी वेळा पाहिले आहे. विशेष म्हणजे नितीन पाटील यांच्याकडे अकोले शहर आणि राजूर अशा दोन्ही ठिकाणांचा पदभार असताना देखील त्यांनी इतकी मोठी कामगिरी केल्यामुळे त्यांच्यावर तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे. लवकरच अकोल शहरात झालेल्या स्टार मोबाईल शॉपी फोडणार्यांचा देखील छडा लावण्यात त्यांना यश येईल अशी अपेक्षा शहरातील व्यक्तींनी केली आहे. तर आज अटक केलेल्या आरोपींकडून एक ना दोन तब्बल सहा गुन्ह्यांची उकल झाली आहे.