अब की बार, फिर देशमुख और परमार.! पुन्हा जैसे थे होणार.! साहेब, तुमच्यावरही कारवाई झाली असती तर..!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
अकोले आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे दोन्ही प्रभारी अधिकारी पोलीस अधिक्षक यांनी नियंत्रण कक्षेत जमा केले आहेत. आज पाच दिवस उलटले तरी येथे ना पोलीस अधिकारी नेमले ना त्यांच्यावर काही निर्णय घेतला. त्यामुळे, एसपी साहेबांच्या मनात नेमके काय चालु आहे त्यांनाच माहित. मात्र, हे दोन्ही अधिकारी सक्षम असून त्यांच्यावर झालेल्या कारवाईने येथील जनता प्रचंड नाराज आहे. त्यामुळे, हे दोन्ही अधिकारी जरी पोलीस ठाण्याचे पालक असले तरी पोलीस कर्मचार्यांनी केलेल्या चुकांचे प्रायचित्त त्यांना देणे योग्य ठरणार नाही. खरंतर, साहेेबांनी दोघांवर जी काही कारवाई केली ती योग्यच आहे असे समजू. मात्र, पाच दिवसानंतर या दोन्ही पोलीस अधिकार्यांची चौकशी करुन त्यांचा जर काही लाचलुचपतमध्ये दोष नसेल तर त्यांना हजर केले पाहिजे. असे अनेकांचे प्रांजळ मत आहे.
खरंतर, पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या स्वाभावाचा इतिहास फार सुंदर आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कधी कोणाला अभय दिला नाही. गुन्हा केलाय तर शिक्षा झाली पाहिजे. आरोप झालाय तर चौकशी झाली पाहिजे. तत्कालिन पोलीस अधिक्षक लखमी गौतम यांच्यासारखी त्यांची निर्भिड व निष्पक्ष पद्धत आहे. म्हणून तर बाळबोठे प्रकरणात अगदी तळापर्यंत ते जाऊ शकले. अन्यथा पोलीस दलाकडून अनेक गुन्ह्यांमध्येे नम्रतेची भुमिका पहायला मिळाली आहे. पाटील यांच्या पोलीस दलाच्या कार्यकीर्दीत त्यांनी गुन्हेगारांना कधी पाठीशी घातलेले दिसत नाही. तर पोलीस दलाला लाजवेल असे काम करणार्या कर्मचार्यांची देखील त्यांनी खैर सोडलेली नाही. त्यामुळे, त्यांनी नगरमध्ये आल्यानंतर जे काही डिफॉल्ट रिपोर्ट होते. त्यातील बहुतांशी निकाली काढून त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. त्यातील पाच जण अकोले पोलीस ठाण्यातील आहेत. त्यामुळे, त्यांच्याकडे चुकीला माफी नाही.!
आता दुसरी गोष्ट म्हणजे, गेल्या कित्तेक वर्षापासून एक नियम आहे. ज्या पोलीस ठाण्यात ट्रॅप होईल त्या पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी थेट नियंत्रण कक्षेत जमा केला जाईल. हे जरा मिलेट्री प्रमाणे रुल असला तरी तो काही अंशी चांगला आहे. मात्र, ज्या व्यक्तीवर लाचलुचपतचा छापा पडला आहे. त्याची सखोल चौकशी करुन जर अधिकारी त्यास काही अंशी दोषी असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे आणि नसेल तर त्यांना पुन्हा त्या पोलीस ठाण्यात नियुक्त केले पाहिजे. कारण, लोकशाहीत जो व्यक्ती गुन्हा करतो त्यालाच शिक्षा असते. त्याच्या कुकर्मची प्रतिबिंब जर त्याच्या अधिकार्यावर पडत असेल तर तो खर्या अर्थाने अन्याय ठरेल. त्यामुळे, तुर्तास तरी आता पाच दिवस उलटून गेले आहेत. आता तरी मुकुंद देशमुख व अभय परमार यांना त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी कायम करावे अशी मागणी जनतेतून होत आहे.
यापलिकडे पाहिले तर, लाचलुचपतचे छापे राज्यात सर्वात जास्त महसूल खात्यात झाले आहे. यात तलाठी आणि लिपीक यांचे प्रमाण सार्वधिक आहे. मग असे कधी झाले नाही. की, तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे आणि लगेच त्या तालुक्यातील तहसिलदार जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून घेतला आहे. इतकेच काय.! राज्य उत्पादन शुल्क, वन विभाग, पीडब्लुडी असे कित्तेक विभाग आहेत. तेथे हे नियम लागु होत नाहीत. मात्र, पोलीस खात्याने स्वत: नियम करुन त्याची कडेकोट अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे, पोलीस दलाला बळ नव्हे. तर अधिकार्यांचे आणि कर्मचार्यांचे मनोबल खच्चीकरण होताना दिसत आहे. खरंतर जेव्हा अप्पर पोलीस अधिक्षक दत्तात्रय राठोड यांनी यांची क्लिप व्हायरल झाली. त्याला जबाबदार धरुन जर साहेबांची बदली केली असती तर तो त्यांच्यावरील अन्यायच गणला गेला असता ना? त्यामुळे, वड्याचे तेल वांग्यावर न काढता साहेब योग्यतो निर्णय घेऊन अकोले व संगमनेर शहराला पोलीस निरीक्षक देतील अशी आशा नागरिकांनी बाळगली आहे.
खरंतर जेव्हा पोलीस निरीक्षक यांची अकोले शहरात बदली झाली तेव्हा अनेकांनी त्यांचे स्वागत केले. कारण, संगमनेर शहरात त्यांची उल्लेखनिय कामगिरी राहिली आहे. त्यांच्यावरील कारवाईनंतर अनेकांना वाईट वाटले आहे. मात्र, मनसेने मोठी स्टन्टबाजी केल्याचे पहायला मिळाले. येथे अनेक अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले. येथे अनेकांना रेशन मिळाले नाही, कोणाला कुपन नाही, तालुक्यात अनेक ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडल्या तेव्हा मनसे रस्त्यावर किंवा पोलीस ठाण्याच्या बाहेर अगदी आजवर कधीच दिसली नाही. इतकेच काय.! अभय परमार यांना अकोल्यात एकही कारवाई करण्यास वेळ देखील मिळाल नाही. तरी देखील त्यांनी चांगल्या कारवाया केल्या असा निर्वाळा मनसेने दिला. म्हणजे एका नवख्या पोलीस अधिकार्यासाठी कधी नव्हे मनसेने ठिय्या मांडला, यावर सोशल मीडियातून त्यांवर टिकेची झोंड उठली होती. तर काही ठिकाणी बाहेरुन वेगळे आणि मनसे वेगळे असे मेसेज फिरत होते. अर्थात काही झाले तरी परमार यांचे अनेकांनी समर्थन केल्यामुळे, पोलीस अधिक्षक योग्यतो निर्णय घेतील अशी अपेक्षा नागरिकांनी बाळगली आहे.