संगमनेरच्या पठारावर राजकीय वादळ.! थोरात व लहामटेंना आव्हान देत, भाजपचा पिंगा जनार्दन आहेरांभोवती.!


सार्वभौम (संगमनेर) :- 

                संगमनेरमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीचे बिगुल वाजले आहेत. तालुक्यातील ९४ गावात पारावर राजकीय फड रंगू लागले आहेत. तालुक्यातील सात जिल्हा परिषदेच्या गटात काय-काय होणार याचे चित्र रंगविण्यास प्रारंभ झाला आहे.  त्यातच २४ पैकी २१ ग्रामपंचायतीचे पठार भागात राजकीय समीकरण कसे असेल याचे गणित मांडले जात असले तरी पिचड आणि थोरात यांना मानणाऱ्या या भागात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आशा संघर्षाची चिन्ह स्पष्ट दिसत आहे. तरी नुकताच शिवसेनेच्या तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिलेले जनार्दन आहेर काय भूमिका घेतात याकडे पठार भागाचे सध्या लक्ष वेधले जात आहे. या पलिकडे आ. डॉ. किरण लहामटे यांनाही येथे माननारा मोठा वर्ग तयार झाला आहे. पठार भागात पिचड-पिता पुत्रांनी नुकत्याच केलेल्या दौर्याचा अंदाज पाहीला तर जनार्दन आहेर भाजपाचे कमळ हातात घेतील का? की तटस्थ भुमिका बजावतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहेत .

   संगमनेर मधील ९४ ग्रामपंचायत पैकी २१ ग्रामपंचायतीच्या निवडणूका या पठारभागावरील आहे. या ग्रामपंचायती विधानसभेला अकोले मतदारसंघात जोडल्या गेल्याने सरासरी ३६ हजार मतदार असलेल्या या गावांकडे पिचड पिता-पुत्रांचे विशेष लक्ष लागले आहे. कारण मागील विधानसभेला या गावांमधून वैभव पिचडांना मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे जनार्दन आहेर सारख्या नेतृत्वाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमळ हाती घेतले तर पिचडांचे डोक्यावरील ओझे खांद्यावर आल्यासारखे होईल व पठारभागात प्रथमच कमळ फुल्याचे पाहायला मिळू शकते. असे राजकीय विश्लेषकांना वाटते. तर डॉ. किरण लहामटे यांची आजही क्रेझ कमी झालेली नाही. त्यामुळे, त्यांच्या राष्ट्रवादीला तेथे सुगिचे दिवस येऊ शकतात. मात्र, पठार भागावर ना. बाळासाहेब थोरातांचा हात असल्यामुळे त्यांना पठारावर अकोल्याच्या नेत्यांनी हस्तक्षेप केलेला आवडत नाही. विकास करता आला तर करा, पण येथे कोणी स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल ते साहेबांना आव्हाण दिल्यासारखे असते. त्यामुळे, डॉक्टर लहामटे हे पठारावरील गावगाड्यात फार काही लक्ष देतील असे काही वाटत नाही. तसेही संगमनेरात राष्ट्रवादीला सत्तेत कधी मुबलक स्थान मिळत नाही. ना येथे पुर्वीप्रमाणे काट्याचा संघर्ष होतो. त्यामुळे, साहेब म्हणजे सुप्रिम कोर्ट अशी पद्धत अमलात असते.

आता संगमनेर शहरात दुसरे कोणी हात घालु शकत नाही. मात्र, पठार भागात पिचड ही धमक दाखवू शकतात. याचे कारण असे की, जेव्हा २०१९ ची विधानसभा होती तेव्हा त्यांनी पठार भागावरील मतांसाठी संगमनेरच्या साहेबांना साकडे घातले होते. मात्र, त्यांनी नकार दिल्याने डॉ. लहामटे यांना तेथून बक्कळ मते मिळाली. त्यामुळे, येथे स्वत:ची ताकद उभी करण्यासाठी पिचड साहेब नवा फंड वापरु शकतात. तो असा की, सध्या तेथे जनार्दन आहेर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. बहुतांशी गावात त्यांचा थेट संपर्क आहे. त्यांच्या कुटुंबात राष्ट्रवादीकडून मागील १० वर्षे जिल्हा परिषदेचे सदस्यपद राहिले आहे. परंतु, त्यांनी २०१४ साली शिवसेनेत प्रवेश केला. आणि विधानसभेला बाळासाहेब थोरातांविरुद्ध मैदानात दोन हात केले. मात्र, त्यांचा पराभव झाला. पण, ४४ हजार ७५९ इतके मताधिक्य आहेर यांना मिळाले.

 विधानसभेची रणधुमाळी संपताच त्यांच्यावर तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर जिल्हापरिषद व पंचायत समितीची निवडणूक २०१७ मध्ये सुरू झाली. बोटा गट ओबीसी ला राखीव झाला आणि आहेर यांना थांबावा लागले. ही लढत थोरात विरुद्ध पिचड व आहेर यांच्यामध्ये चांगलीच रंगली होती. येथे थोरातांकडून अजय फटांगरे तर पिचडांकडून बबनराव गागरे तर आहेर याच्याकडून शांताराम गाडेकर अशी तिहेरी लढत झाली. त्यामुळे या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. यामध्ये थोरतांचे अजय फटांगरे यांचा सरासरी ८०० मतांनी विजय झाला पण आहेर यांच्या उमेदवाराने कडवी झुंज दिली तर पिचड यांच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. हेच चित्र पंचायत समितीमध्ये देखील पाहायला मिळाले. अवघ्या १२४ मतांनी आहेर यांच्या उमेदवाराचा थोरतांच्या उमेदवाराकडून पराभव झाल्याचे पाहायला मिळाले.

    मागील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जनार्दन आहेर स्वत: उभे नव्हते. त्यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह होता. परंतु, त्यांच्या थांबण्याने काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला असला तरी तो अगदी कमी मतांचा होता. याचाच अर्थ असा की पठार भागात जनार्दन आहेर यांना विचारात घेवूनच पिचड साहेबांना राजकीय निर्णय करावे लागतील हे अगदी स्पष्ट आहे. दरम्यान, आहेर यांचे पठारावरील अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठी नामदार साहेबांनी एक तरुण चेहरा म्हणून अजय फटांगरे यांना बळ दिले आणि झेडपीला निवडून देखील आणले. इतकेच काय.! तेथे त्यांचे प्रस्तान वाढावे यासाठी त्यांना गटनेता देखील केले. त्यामुळे, फटांगरे यांनी देखील चांगली भरारी घेऊन तेथे स्वत:चे चांगले अस्तित्व निर्माण केले आहे. सध्या तालुक्यातील तरुणांमध्ये त्यांची क्रेझ वाढती आहे. त्यामुळे, पठार भागावर दोघांमध्ये काट्याची टक्कर येणार्या काळात पहायला मिळू शकते.

जनार्दन आहेर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून तालुक्यात काम केले आहे. विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली. २०१९ च्या निवडणुकीत उमेदवारी मिळेल आशी अपेक्षा होती. पण पक्षाच्या निर्णयाबरोबर राहून त्यांनी स्थिर राहाण्याची भूमिका घेतली. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी तालुक्यात आहेर आणि थोरात यांचे राजकीय एकमत होईल आशी परिस्थिती नाही. त्यातच आहेर यांच्यावर पिचड यांचा कायम वरदहस्त राहील्याने पुढील विधानसभेची बांधणी आताच करण्याच्या दृष्टीने पठार भागात पिचड यांनी लक्ष घालण्यास प्रांरभ केला आहे. याचाच भाग म्हणून आहेर यांना पुन्हा ताकद देवून पठार भागात आपली फौज पुन्हा सज्ज करण्यासाठी पिचड पिता पुत्र सरसावले आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आहेर यांनाच भाजपात घेवून पठार भागात आणि संगमनेर तालुक्यात महाविकास आघाडीला धक्का देण्याचे राजकीय डावपेच आगामी काळात होवू शकतात असे राजकीय तज्ञांना वाटते आहे.

जनार्दन आहेर यांच्यावर जसा पिचड यांचा वरदहस्त आहे तसा विखेचाही आहे. मध्यंतरी माजी मंत्री राम शिंदे यांच्याही जवळ जाण्याची संधी आहेर यांनी सोडलेली नाही. या परिस्थिती वरून तरी जनार्दन आहेर यांची पाऊलवाट ही भाजपाच्या दिशेनेच जात असल्याचे दिसते आहे. सध्यातरी न बोलता काम आणि लोक संपर्क सुरू ठेवून आहेर यांनी राजकारणातील बाळगलेले सुचक मौन दूरच्या राजकारणाचा विचार करणारे आहे.

  - सुशांत पावसे

(संगमनेर प्रतिनिधी)