अकोले तालुक्यात बिबट्याच्या शिकारीचा थरार.! पाच गावांत दहशत.! पहा अशी केली शिकार.!
सार्वभौम (गणोरे) :-
पाथर्डी तालुक्यात चार जीव घेतल्यानंतर बिबट्याची दहशत आता अकोले तालुक्यात देखील पहायला मिळू लागली आहे. कारण, येथे गणोरे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी इंदिरानगर परिसरात मंगळवार दि. २२ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास चक्क बिबट्याने शिकार केल्याचा थरार पहायला मिळाला. ही सर्व प्रकार गावातील एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॉमेरॅत कैद केला आहे. त्यामुळे, या व्यक्तीच्या धाडसाला आणि समयसुचकतेला अनेकांनी दाद दिली आहे. तर, मंगळवारी या बिबट्याने एक फिरस्ती कुत्र्याचा फडशा पाडला असून त्याला दातात धरुन गल्लीने फरपटत नेत शिकार केली आहे. या सर्व प्रकारामुळे गणोरे, डोंगरगाव, हिवरगाव, पिंपळगाव निपाणी तसेच शिंदेवाडी व जवळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणोरे गावात गेल्या काही दिवसांपुर्वी बिबट्या आला रे आला अशा आफवा पसरत होत्या. मात्र सुदैवाने त्याचे गावात तरी कोणाला दर्शन घडले नव्हते. त्यामुळे, ही अफवा आहे असे म्हणून अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करीत होते. आता मात्र, गणोऱ्यात लांडगा आला रे लांडगा आला या म्हणीप्रमाणे चक्क खरोखर गावातील इंदिरानगर परिसरात बिबट्याने शिकार केल्याचे समोर आले आहे. मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास बिबट्या आपले भक्ष्य शोघण्यासाठी आला होता. शेळी, वासरु किंवा अन्य शिकार मिळेल त्या हेतून त्याने अगदी धाडसाने गावात प्रवेश केला. त्याच्या वासाने गावातील कुत्रे मोठमोठ्याने भूकत होती. बिबट्या येईल अशी कोणाला शंका देखील नसल्याने गणोरे गाव नेहमीप्रमाणे कालवा करणाऱ्या भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष करुन निपचित पहुडली होती. याच संधिचा फायदा घेत बिबट्याने गावात प्रवेश केला आणि अन्य काही मिळण्याच्या आत त्याने कुत्र्याला दबोचले. दरम्यान हा सर्व प्रकार एका धाडसी व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केेले आहे.
खरंतर जनावरे जंगलातून गावात आली की मानसे गावातून जंगलाकडे चालली याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. अगदी काल परवा पुण्यात एक गवा प्राणी वाट चुकून शहरात घुसला आणि बोलबोल करता त्याच्यापेक्षा मानसांनीच इतका हैदोस घातला की, शेवटी त्या गव्याला आपला प्राण गमवावा लागला. आपला मित्र का येत नाही म्हणून अगदी कालच दुसरा जंगली प्राणी गवा पुन्हा जंगलातून पुण्यात आला आणि मानव जातीन भलतेच काहूर माजविले. त्यामुळे, प्राण्यांच्या जंगलात प्रवेश करणार्या मानसाने प्रांण्यांचे जगणे मुश्किल केले आहे. अतिक्रमण, मोठमोठी बंगले, पर्यटन, शेती, इमारती, कंपन्या, औद्यागिकीकरण, वृक्षतोड अशा नाना कारणांनी जंगले उध्वस्त करुन मानवाने जंगलात प्रवेश केला आहे. त्यामुळे, जर कोणी आज प्राण्यांना नावे ठेवत असतील तर त्यांचे तोंड झोडले पाहिजे. असे परखड मत प्राणी संरक्षण प्रेमींनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, अकोले तालुक्यात वेगवेगळ्या भागांत तसेच गावांमध्ये बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे, जे कोणी लहान बालकांना घेऊन शेतावर जातात त्यांनी मुलांना शेतात वा अडचणीच्या ठिकाणी नेवू नये. सायंकाळ होताच आपल्या अंगणातील जणावरे घरात अथवा सपरात बांधावी, कोणत्याही व्यक्तीने रात्री अपरात्री उघड्यावर शैचालय किंवा मुत्रविसर्जनास बाहेर पडू नये, आपल्या घराजवळ लंपन किंवा अडचणी ठेऊ नये, रानात किंवा गावात राहणाऱ्यांनी आपल्या घराभोवती कुंपन करुन घ्यावेत, आपल्या घराभोवती सदैव प्रकाश कसा राहिल यासाठी प्रयत्न करावा. वाघ जवळपास आल्यास मोठा आवाज होईल असा फटाका वाजवाव, काही शंका वाटल्यास गावातील प्रत्येकाला जागरुक करावे, वाघाची दहशत कमी करण्यासाठी वनविभागाशी संपर्क करावा. वाघावर अथवा अन्य प्राण्यांवर कोणताही प्राणघातक हल्ला करु नये. असे आवाहन वन विभागाने केले आहे . तर गावात येणाऱ्या या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी गणोरे ग्रामस्थांनी केली आहे.
- सुशांत आरोटे
(गणोरे प्रतिनिधी)