अकोल्यात जीम बंद पाडण्यासाठी तेथे वेश्या व्यवसाय दाखविण्याच कट, 20 लाखांच्या खंडणीचा प्लॅन.! पोलीस म्हणे हा किरकोळ अदखलपात्र गुन्हा.!

सार्वभौम (अकोले) :- 

                      अकोले शहरात असणार्‍या देवा जीममध्ये एका व्यक्तीकडे जीमचे पैसे मागितल्याचा राग आल्याने ही जीम बंद पाडण्यासाठी तीन तरुणांनी मोठी जालीम शक्कल लढविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुर्दैव असे की, हा सर्व प्लॅन उघड झाल्यानंतर पोलिसांना रेकॉर्डींग, व्हिडिओ आणि प्रत्यक्ष व्यक्ती याने सांगून देखील केवळ यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. त्यामुळे, अकोले पोलीस ठाण्यात प्रभारी पोलीस अधिकारी नसल्यामुळे कायद्याची अंमलबजावणी होत नसून पीडितांना न्याय मिळत नाही. त्यामुळे, एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यानंतर पोलीस अधिक्षक येथे पोलीस निरीक्षकाची नेमणुक करणार आहे की काय? असा प्रश्न तालुक्यातील जनतेने उपस्थित केला आहे. तर ज्या अपंग व्यक्तीची जीम आहे त्याला पुन्हा तिघांनी अश्लिल बोलत ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे, या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे अशी विनंती त्याच्याकडून केली जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जीम चालविणार्‍या या तरूणाची अकोले शहरात देवा जीम आहे. तेथे एक व्यक्ती जिमसाठी नियमीत येत होता. मात्र, कालांतराने त्याचे व मालकाचे खटकल्याने त्याने त्याचे तीन मित्र एकत्र केले आणि त्यांनी मिळून ही जीम बंद पाडण्याचा निर्धार केला. दरम्यान, काही दिवस उलटल्यानंतर या बहाद्दराने याच जीममध्ये वेश्या व्यवसाय चालतो अशी अफवा पसरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे प्रतिष्ठीत लोक व्यायाम करत असल्यामुळे त्यांनी त्यास धिर दिला आणि आम्ही तुझ्या सोबत आहोत घाबरू नको असे सांगितले. त्यामुळे या तरूणाने जीम सुरूच ठेवली.

दरम्यान, जीम सुरूच असल्याचे लक्षात आल्यामुळे, संबंधित तरुणाने त्याच्या मित्रांच्या मदतीने एक अफलातून कट रचला. त्याने त्याच्या मित्राच्या मदतीने कॉलगर्ल किंवा वेश्या व्यवसाय करणार्‍या दोन-तीन मुलींना तेथे बोलवायचे ठरविले. जीमची बनावट चावी तयार करुन ती रात्रीच्या वेळी उघडायची आणि तेथे या तरुणींना नंगानाच करायला लावायचा. त्यानंतर त्याचा व्हिडिओ काढून व्हायरल करायचा किंवा तसे न झाल्यास जीम चालकाकडून 10 ते 20 लाख रुपये घ्यायचे. असा या तिघांनी कट रचला. हा सर्व प्रकार त्यांच्यात असणार्‍या एकाने रेकॉर्ड केला असता त्याचे बिंग फुटले.

ठरल्याप्रमाणे हे घडवून आणण्यासाठी एका तरुणाने त्याच्या मित्रास अडिच हजार रुपये दिले होते. तर वेश्या मुलींना तेथे आणण्यासाठी त्यांचा शोध देखील सुरू झाला होता. यावेळी काही मुली मिळाल्या खार्‍या. मात्र, तेथे येण्यापुर्वी पहिले पैसे टाका मग आम्ही तिकडे येतो अशी अट टाकल्याचे ऑडिओ रेकॉर्डींगहुन लक्षात येते. हा सर्व खटाटोप सुरू असताना यांच्यातील एक व्यक्ती फितुर झाला आणि त्याने दोघांचे बींग उघडे पाडले. दोघांमधील संभाषण बाहेर पडल्यानंतर जीम मालकाने सावध पवित्रा घेत थेट पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रकार अकोले पोलीस ठाण्यात कथन केल्यानंतर त्यांनी सांगितले की, हा किरकोळ प्रकार असून केवळ एनसी (अदखलपात्र) मॅटर आहे. त्यानुसार त्यांनी एका विरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.

आता, अकोले पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकच नाहीत तर येथे न्याय मिळणार तरी कसा? केवळ एक पोलीस उपनिरीक्षक यांच्या जिवावर हे पोलीस ठाणे सुरू आहे. त्यामुळे, येथे न्याय मागायचा तरी कोणाकडे? म्हणजे, या तरुणाला अशा पद्धतीने अडकविल्यानंतर पोलीस गुन्हा दाखल करणार आहे का? हे सर्व न कळण्याजोगे आहे. यात कोणताही गुन्हा दाखल करता येत नाही. असे सांगितल्यानंतर जीम मालक हतबल झाला आहे. जसे एखादी टोळी दरोडा टाकण्यासाठी निघाली तर त्यांचा कट उध्वस्त करुन पोलीस कलम 399 प्रमाणे गुन्हा दाखल करतात. त्यासाठी ते दरोडा टाकण्याची वाट पाहत नाहीत. मग या गुन्ह्यात सर्व प्रकार उघड असून देखील अदखलपात्र गुन्ह्याची नोंद होते. जर यात जीम चालकाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण? असा देखील प्रश्न आता पुढे येऊ लागला आहे. त्यामुळे, या गुन्ह्यातील पुरावे जमा करुन कट रचणार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी अन्याय झालेल्या तरुणाने केली आहे. तर अकोले पोलीस ठाण्यास रामभरोसे न सोडता तत्काळ पोलीस निरीक्षक नेमावा अशी मागणी तहसिलदार व आमदार यांच्याकडे करण्यात आली आहे.