पिचड राष्ट्रवादीत आल्यास सर्वात जास्त मला आनंद होईल.! राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षांचे खुलेआम वक्तव्य.! पहिला बुके माझा.!

सार्वभौम (अकोले) :-

                   शरद पवार साहेबांवर गेली 40 वर्षे प्रखर टिका करणारे एकनाथ खडसे यांना पक्षात घेताना केवळ पक्ष बळकटीचा विचार करण्यात आला. त्यामुळे, राजकारणात कोणी कोणाचा शत्रु नसतो हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे, मी फार मोठा नेता नसलो तरी राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. जर पवार साहेबांनी किंवा उद्या अजित दादा पवार, जयंत पाटील साहेबांनी माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आ. वैभव पिचड यांना पक्षात घेतले तर तेव्हा सर्वात जास्त आनंद मला होईल तसेच त्या क्षणी माझा पहिला बुके त्यांना असेल. कारण, आता तालुक्यात व्यक्तीकेंद्री राजकारण सुरू झाले असून पक्षकेंद्री राजकारण फार थोड्या लोकांकडून पहायला मिळत आहे. जर वरिष्ठांनी दोघांचे स्वागत केले तर माझ्यासारखा कार्यकर्ता हसत त्यांचे स्वागत करेल. अशी माहिती खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा तालुकाध्यक्ष आर.के.उगले यांनी दिली. त्याच्या या वक्तव्याने अनेकांच्या काळजाला ठेच पाहचली तरी पक्षासाठी त्यांनी जी काही तळमळ दाखविली आहे. ती खरोखर वाखाण्याजोगी आहे असे म्हटल्यास काही वावघे ठरणार नाही.

उगले आपली मते व्यक्त करताना म्हणाले की, पक्ष वाढवायचा असतो. तो व्यक्तीद्वेषाने कधी वाढत नाही. पवार साहेब राष्ट्रवादीसाठी वयाच्या 80 वर्षापर्यंत योद्ध्यासारखे लढत आहेत. त्यामुळे, त्यांची जर पिचड पिता-पुत्रांना पुन्हा पक्षात घेण्याचा निर्णय घेतला तर त्याचे निष्ठावंत कार्यकर्ते कधीही विरोध करणार नाही. मात्र, ज्यांना पिचड यांच्याशी "व्यक्तीदोष" आहे. त्यांना कितीही दु:ख झाले तरी आम्ही त्यांचे स्वागत करण्यासाठी पहिला बुके घेऊन जाऊ. फक्त त्यांना पक्षात घेण्याचा निर्णंय वरिष्ठांनी घेतलेला असला पाहिजे. त्याचे कारण असे की, आम्ही देखील पक्षासाठी 40 वर्षे योगदान दिले आहे. जेव्हा पिचड यांनी पक्षबदलाची निर्णय घेतला तेव्हा पक्षासाठी आम्ही त्यांची साथ सोडली होती. खरंतर त्यावेळी अनेकजण म्हणायचे, आम्हाला जर उभे कापले तरी आमच्या शरिरात पवार साहेब निघतील. मात्र, जेव्हा पवार साहेबांच्या सोबत जाण्याची वेळ आली तेव्हा मात्र, हेच बोलघेवडे म्हणाले भाऊ हाच आमचा पक्ष आहे. त्यामुळे, कठीण काळात त्यांनी निष्ठा सोडली असेल पण आम्ही आमच्या हातातील घडळ्या काढले नाही.

ते पुढे म्हणाले की, मी छातीठोकपणे सांगतो की, जे लोक आज पिचड साहेबांच्या सोबत आहेत. त्यांनी त्यांच्या छातीवर हात ठेवावा, खरोखर तुम्ही तन-मन-धनाने भाजपात आहात का? तुम्हाला ती विचारसारणी रुचते का? तमचे मन तेथे लागते का? जर अंत:करणातून हो आला तर मी वाट्टेल ते हारेल. अगदी महत्वाचा मुद्दा फक्त इतकाच आहे की, वैभव पिचड यांच्या स्वभावामुळे आणि एक व्यक्ती म्हणून अनेकजण भाजपत अस्थिर का होईना पण भाऊंच्या निर्णयामुळे स्थिर आहेत. हे कितीही कठोर किंवा कटू असले तरी ते सत्य आहे. हे कोणी नाकारत असेल तर त्याने देखील आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. जेव्हा निवडणुकीच्या काळात मला माझ्या पुर्वीच्या सहकार्‍यांनी साद घातली होती. तेव्हा मी त्यांना स्पष्ठपणे सांगितले होते. साहेब.! मला भाजपची विचारधारा मान्य नाही. मी पुरोगामी चळवळीचा पाईक आहे. त्यामुळे, मला कोणी फोर्स करु नका. तुमच्या आणि माझ्या वाटा वेगळ्या आहेत. इतका मी स्पष्टोक्ती आहे. त्यामुळे, मी स्वत: पवार साहेबांना काळजात ठेऊन राष्ट्रवादीसाठी जे शक्य आहे ते काम करतो. त्यासाठी मला कोणतेही प्रमाण देण्याची गरज भासली नाही.

आता उगले यांनी मांडलेले विचार अनेकांच्या जिव्हारी नक्की लागतील. मात्र, खरा कार्यकर्ता तोच असतो जो वरिष्ठांच्या शब्दाला प्रमाण मानतो. आजकाल कितीही कट्टर विरोधक असले तरी ते एकाच पक्षात आल्यानंतर त्यांच्यात साख्य होतो. मात्र, अकोल्यात "पक्षपरत्वे" नव्हे तर व्यक्तीपरत्वे राजकारण होताना दिसत आहे. याच कारणामुळे तर मधुकर नवले, मिनानाथ पांडे, मदन पथवे आणि अन्य बड्या नेत्यांना राष्ट्रवादी मुकली आहे. हा नको, तो नको, हा होईजड-तो डोईजड मग पक्ष वाढेल तरी कसा? असा प्रश्न निष्ठावंत विचारु लागले आहेत. ज्यांना मोठमोठी पदे मिळाले त्यांच्यासाठी चालढकल ठिक आहे. मात्र, त्याचे शल्य तळागाळात काम करणार्‍या जाणकारांना आता खटकू लागले आहे. एकंदर, राज्यपातळीवर मेघाभरतीचे संकेत येऊ लागले आहेत. तर अकोले तालुक्यात हा नको-तो नको म्हणून बडेबडे नेते राष्ट्रवादी मुकवत आहे. त्यामुळे, आर के उगले यांचे वक्तव्य व्यक्तीश: नसून ते पक्षासाठी हिताचे आहे. त्यांनी अशा पद्धतीने उघड बोलून दाखवत एकप्रकारे पक्षातील कार्यपद्धती आणि वास्तवाला चव्हाट्यावर तर मांडले नाही ना? असा प्रश्न उभा ठाकला आहे.