पिचड भाजप सोडून राष्ट्रवादीत.! चर्चेनंतर अनेकजण व्हेंटीलेटरवर.! अफवाही सत्य होतात..!
- Sagar Shinde
सार्वभौम (अकोले) :-
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मधुकार पिचड व मा. आमदार वैभव पिचड यांनी 30 जुलै 2019 मध्ये हातातील राष्ट्रवादीचे घड्याळ सोडले आणि कमळाशी मैत्री केली. त्याचे प्रतिबिंब असे उमटले की, 1977 ची विधानसभा वगळता गेल्या 40 वर्षात त्यांना कधी पराभवाची सावली देखील माहिती नव्हती, त्या विजयरथाचे चाक सन 2019 मध्ये निखळून पडले. अर्थात सन 1980 ते सन 2019 या दरम्यान 40 वर्षात तुम्ही काय केले? अशी विचारण्याची हिंमत कोणाची झाली नव्हती. इतकेच काय! अपवाद वगळता त्यांना सोडून जाण्याचे धाडस देखील कोणी देखविले नव्हते. मात्र, त्यांचा पराभव झाला काय आणि ओठावर मिसरुड नसणारा तरुण 40 वर्षाचा हिशोब मागू लागला. अर्थात, येथील जनता थोडी अज्ञानी असली तरी ते भाजपच्या विचारधारेला मानेल अशी त्यांची मानसिकता नाही. त्यामुळे, तडाख्यात सापडल्यानंतर अक्कल ढबुची असणार्यांनी देखील प्रवास लंडनचा करीत 40 वर्षाच्या प्रवासावर प्रश्नचिन्ह उभे केले. अर्थात साहेबांचा हा पक्षप्रवेश अनेकांना न पटणारा होता. त्यामुळे, नकळत का होईन त्यांना त्याचा पश्चाताप झाल्याचे जाणवत असेल. अशी धारणा ठेऊन आज राष्ट्रवादीच्या मेघाभरतीत पिचड साहेबांचे नाव अग्रभागी येऊ लागले आहे. मात्र, वैभव पिचड यांनी स्पष्ट केले आहे की, आम्ही आल्या घरी सुखी आहोत. राष्ट्रवादीत पुन्हा घरवापसी ही केवळ अफवा आहे. मात्र, इतिहास असे सांगतो की, पिचड पिता-पुत्र भाजपत जाणार अशी चर्चा रंगत होती. तेव्हा स्वत: साहेब बेडरेष्टवर असताना त्यांनी सांगितले होते. भाजप ही केवळ अफवा असून त्यात काही तत्थ्य नाही आणि त्यानंतर काही दिवसात दोघांनी भाजपत प्रवेश केला होता. त्यामुळे, आता ही अफवा म्हणायची की सुतोवाच हे येणारा काळाच सांगू शकतो. मात्र, त्यांना अन्य पक्षात अच्छे दिन येईल असे अकोलेकरांना बिल्कुल वाटत नाही. अशा प्रतिक्रिया राजकीय जाणकार देऊ लागले आहेत.
भाजपच्या काळात कामे होतात. असा फतवा काढून वैभव पिचड यांनी पक्षबदल केला. मात्र, गेल्या 40 वर्षात त्यांच्या पिताश्रींनी याच आघाडी पक्षामध्ये राहून तालुक्याचा विकास करुन रस्ता आणि पाणि हे अगदी डोंगराच्या दरीखोरीपर्यंत नेवून ठेवले हे विसरुन चालणार नाही. अर्थातच मंत्रीपदासाठी ज्या काही हलचाली झाल्या त्या अयशस्वी ठरल्या आणि तालुक्यात नवे परिवर्तन घडले. त्या दरम्यान शरद पवार हे वादळ अकोल्यात येऊन गेले आणि मतांचा टक्कांच डोंगराला भिडला. शेवटी राष्ट्रवादीचा किल्ला हा सरस ठरला आणि पिचड साहेबांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. हे शल्य येथेच थांबले नाही. तर, विधानसभेत देखील शरद पवार यांच्या नसा-नसांमध्ये द्वेशाच्या धमण्या शांत बसू शकल्या नाहीत. जे सोडून गेले त्यांच्या झोपा उडविण्यासाठी त्यांनी विचारांच्या पलिकडे युती करीत भाजपच्या पहिलवानांना चितपट करीत महाविकास अघाडीचे सरकार स्थापन केले. तेव्हा खर्या अर्थाने ज्यांनी घड्याळ काढून पळ काढला त्यांना वेळीची किंमत सांगितली.
आता मुळात ज्यांनी राष्ट्रवादी सोडली त्यातील काहींना प्रचंड मनस्ताप झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यातील काही लोक पुन्हा बारामतीच्या खेटा घालताना दिसत आहे. तर कोणी आपल्या राजकीय मित्रांच्या करवी आपले दु:ख व्यतीत करीत आहेत. त्यामुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुतोवाच दिले आहेत की, आता राष्ट्रवादीत भाजप प्रमाणे मेघाभरती होणार आहे. तर त्याला पुष्टीकरण देत अजित पवार म्हणाले की, जे कोणी राष्ट्रवादीत येतील त्यांना पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. म्हणजे हे खुलेआम निमंत्रणच म्हणावे लागेल. त्यामुळे, या नेत्यांच्या वाक्यांना अनुसरुन मुंबईतून राजकीय विश्लेषकांनी त्यांचे अंदाज वर्तविण्यास सुरूवात केली. त्यात माजी मंत्री मधुकर पिचड, मा.आ. वैभव पिचड, आ. बबनराव पाचपुते यांच्यासह चित्रा वाघ, नाईक आणि अन्य व्यक्तींची नावे पुढे आली. त्यामुळे, नगर जिल्ह्यात चर्चेला एकच उधान आले. पिचड-पितापुत्र पुुन्हा राष्ट्रवादीत येणार या धसक्याने अनेकांनी रोखठोक सार्वभौमशी संपर्क केला. खरोखर असे होऊ शकते का? अशी विचारणा केली. आता यांना इतकी का काळजी लागली! हे न कळण्याइतके कोणी दुधखुळे राहिले नाही. कारण, येथे प्रत्येकाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहु लागला आहे.
खरंतर, पक्षबदलाचे वृत्त देऊन इलेक्ट्रॉनिक मीडियाने अकोले तालुक्यात मोठा संभ्रम निर्माण करुन दिला आहे. कारण, येथे ज्यांनी राष्ट्रवादीत उभी हयात काम केले आहे. त्या तळागाळातील सामान्य कार्याकर्त्यांना डॉ. किरण लहामटे यांनी चांगली पदे देऊन त्यांच्या पक्षनिष्ठेचा सन्मान केला आहे. कधी स्वप्नात देखील वाटले नव्हते की, आपल्याला अशी संधी मिळेल ती मिळाली केवळ पिचड यांच्या पक्षप्रवेशाच्या परिवर्तनानंतर. त्यामुळे, आता जर पुन्हा पिचड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर पक्षात सगळा सावळा गोंधळ सुरू होईल. अर्थात आताकोठे भाजपची पदे वाटली गेली आहे. कार्यकर्ता सांभाळायचा म्हणजे त्याला पदांची भुरळ घालावी लागले. त्यामुळे, किमान वैभव पिचड तरी या काळात असा काही निर्णय घेणार नाही. असे अनेकांना वाटते आहे. कारण, आता ज्यांनी उभी हयात त्यांच्या नेतृत्वाचा कट्टर विरोध केला. ते सगळेच राष्ट्रवादीत आहेत. त्यांच्याशी मिळते-जुळते घेताना त्यांना अगदी तारेवरची कसरत करावी लागेल. त्यामुळे, येणारी चार वर्षे ते शांत राहून योग्यवेळी योग्य निर्णय घेतील असा अंदाज त्यांची राजकीय परिपक्व सांगून जाते. तसेही, ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वत:ची ताकद आजमावतील आणि मग पुढील निर्णय घेतली. कारण, या कोणत्याही निवडणुकीत पक्षाचे चिन्ह नसते ते फतवा म्हणून अघाड्या स्थापन करुन नेत्यांनी स्वत:ला सिद्ध करता येते. त्यामुळे, ते सध्यातरी एखाद्या पक्षात प्रवेश करतील याची फार कमी शक्यता आहे.
या सगळ्या गडबडीत एक महत्वाची गोष्ट डोळ्यासमोर उभी राहते. ती म्हणजे, ज्या अशोक भांगरे यांनी 8 वेळी पिचड कुटुंबाला शह दिला. त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा आपली माघार घेत पिचडांच्या पराभवासाठी शरद पवार यांच्या शब्दाखातर डॉ. किरण लहामटे यांना बळ दिले आणि रात्रंदिवस पायपिट करुन लहामटे यांच्या विजयाचे शिल्पकार झाले. असे बोलले जाते की, पवार साहेबांकडून भांगरे यांच्या घरात पुढील विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनी पवार साहेबांचा शब्द पाळत सन 2019 च्या विधानसभेत कोणतीही इन्व्हॉलमेंट नसताना गावोगावी राष्ट्रवादीचा प्रचार करुन डॉक्टरांच्या विजयात सिंहाचा वाटा घेतला. आता जर पिचड यांची राष्ट्रवादीत ऐन्ट्री झाली तर भांगरे यांना पुन्हा बे-एके बे करावे लागेल. त्यामुळे, हा देखील विचार अनेकांच्या मनात घोळू लागला आहे. मात्र, पवार साहेबांनी जो काही कोणाला शब्द दिला त्याबाबत कोठे धोका होत नाही. याची देखील संपुर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे, पिचड साहेबांच्या पक्षप्रवेशाच्या बातमीने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, स्वत: वैभव पिचड यांनी आज स्वत: सांगितले आहे की, मी भाजपमध्ये समाधानी आहे. त्यामुळे, मी राष्ट्रवादीत जाणार ही अफवा आहे. त्यामुळे, तुर्तास या चर्चेला पुर्णविराम मिळाला असला तरी रात्रीतून दादा राज्यपालांकडे गेले आणि पहाटे काय झाले हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे, राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही.