पेट्रोल कमी टाकले म्हणून पंपावर हाणामाऱ्या, डोकं फोडलं गुन्हे दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे रुक्मिणी पेट्रोलपंपावर मोटारसायकलमध्ये पेट्रोल कमी का ठाकले ? या किरकोळ कारणावरून पेट्रोल पंपावरील कर्मचारी यास बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवार दि. 4 डिसेंबर 2020 रोजी रात्री 8:45 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी संदिप गुंजाळ व अन्य पाच जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविंद्र त्रिंबक मुंगसे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी संदिप गुंजाळ हा दुचाकीत पेट्रोल टाकण्यासाठी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पंपावर गेला होता. त्याने पेट्रोल टाकले असता त्यास काही शंका आली. माझ्या गाडीत पेट्रोल कमी का टाकले या कारणावरून पंपावरील कर्मचाऱ्याशी हुज्जत घालण्यास सुरवात केली व कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत रोडच्या कडेला नेले. तेथे उभी असलेल्या मोठ्या वाहनाच्या आडोश्याला नेताच आरोपी संदिप गुंजाळ यांच्या बरोबर असलेल्या चार ते पाच जणांनी कर्मचारी शकील शेख यास शिवीगाळ करत लथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. या झटापटीत आरोपी संदिप गुंजाळ याने टणक वस्तु शकील शेख यांच्या डोक्यात मारले. त्यामुळे शकील शेख हा जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी कुटे हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
दरम्यान, रुक्मिणी पेट्रोल पंपाचे मॅनेजर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी संदिप गुंजाळ व अन्य पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, संगमनेर मध्ये लॉकडाऊन पासुन ते आज पर्यंत किरकोळ वादातून जीवघेणे हल्ले होत आहे.कधी जमिनीच्या वादातून तर कधी हॉस्पिटलच्या बिलावरून तर बांदावरील झाडांवरून रक्तबंबाळ हाणामारी पाहायला मिळत आहे.यामध्ये सखेभाऊ पक्के वैरी होत असल्याचे ही दिसुन आले आहे.मात्र,हे सर्व प्रकार चर्चेतुन मिटुन घेऊ शकतात पण, तसे मात्र होताना दिसत नाही.