बाळ, बाळासाहेब आणि पुन्हा बाळ.! एका अक्षम्य चुकीच्या दिशेचा प्रवास..! बोठे यांचे नेमके चुकले काय.!

 - सागर शिंदे

सार्वभौम (अ.नगर) :-

                        रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर काही क्षणात लक्षात येऊ लागले की, तो अपघाती खून नव्हे तर ती एक नियोजनपुर्वक हत्या आहे. अर्थातच "समझनेवाले को एक इशारा काफी हैं!" मात्र, जर कदाचित हा अपघाती मृत्यू दाखविण्यात गुन्ह्यातील व्यक्तींना यश आले असते तर हा फार मोठा अन्याय ठरला असता. कारण, या नगरमध्ये अशा नगण्य घटना आहेत ज्या "काळाच्या पडद्याआड" किंवा "वाळुच्या ढिगार्‍याआड" दडपल्या गेल्या आहेत. या गुन्ह्यात मात्र, पोलीस अधिक्षक "मनोज पाटील" यांना खरोखर सॅल्युट करावा लागेल. हा निर्भिड तपासाचा एक भाग असला तरी ज्यांना या घटनेचा इतिहास माहिती होता त्यांना ही हत्या झाल्यानंतर ती कोणी केली हे नव्याने सांगण्याची गरज पडली नाही. ही एक बाजू असली तरी पत्रकारीतेत बाप माणूस असलेल्या संपादकाने तथा प्रचंड "प्रगल्भ" लेखकाने अशा पद्धतीचे कृत्य करावे, हे फार 'दुर्दैवी आणि शोकांतीकेचे' आहे. तरी देखील एक हतबल व्यक्ती म्हणून बाळासाहेब बोठे यांना इतक्या अंतीम टोकाची भूमिका का घ्यावी लागली? यावर देखील प्रकाश पडलाच पाहिजे. कारण, नाण्याला दोन बाजू असतात त्या माध्यमांनी एकाबाजुने ओढणे चुकीचे आहे. तरी देखील बोठे यांनी त्याच्या समस्यांवर जो काही मार्ग काढला त्याचे जर कोणी "समर्थन करीत असेल तर तो मुर्खपणाच ठरेल".!

खरंतर एखाद्या ग्रामीण भागातून एक तरुण शहराकडे येतो आणि "अनवाणी" शहरभर फिरुन "पत्रकारीता" करू पाहतो. तो त्यांचा "इतिहास" सहज एखाद्याच्या काळजात भरुन जातो. म्हणजे, "क्राईम रिपोर्टींग" करताना "बाळ" नावाचा तरुण पोलीस ठाण्यात प्रवेश करताना आपल्या पायातील चपला बाहेर काढत असेे. इतका नम्र आणि खात्याशी मैत्री करणारा तो 'पत्रकार' होता. पुढे पोलिसांच्या घोळक्यात राहून "पायी पत्रकारीता" करताना त्यांनी पोलिसांनीच एक एमएटी गाडी देऊन त्यांची 'पायपीट' बंद केली. पुढे बोलबोल करता यांचे वलय इतके "प्रबळ" झाले की, पोलीस खात्यात असा वर्दीवाला नसे की त्यांनी बोठे यांच्या गळ्यात कधी हात टाकला नसले. खाकीच्या बळावर स्वत:च्या अस्तित्वाचे सर्व पैलु त्यांनी अगदी 'गडद' रंगवून ठेवले होते ते इतके की अगदी पत्रकारीतेत त्यांनी "ध्रुवतार्‍याचे स्थान" निर्माण केले होते.

पुढे याच "बाळ यांचे बाळासाहेबात" रुपांतर झाले. त्यांच्या कर्तुवाने त्यांनी स्वत:च्या व्यक्तीमत्वाचा झेंडा तर फडकविलाच यात '14 पुस्तके' लिहीताना बाळ बोठे म्हणजे एक प्रभावी व्यक्तीमत्व असा ठसा उभा राहिला होता. मात्र, या व्यक्तीमत्वाच्या आड एक वेगळी "दहशत" निर्माण झालेली होती. काल पायपीट करणारा हा तरुण आज त्यांच्या संपत्तीचे मोजमाप करावे अशी मागणी होऊ लागली आहे. अर्थातच त्यांचे मित्र शेळके प्रकरणाबरोबर अनेक गोष्टी अशा आहेत की त्या पत्रकारीतेच्या अजेंड्यात अगदी कोठेच बसू शकत नाही. त्यामुळे, बाळचे बाळासाहेब जरी झाले, तरी त्यांच्या दहशतीखाली अनेकजण हतबल होते. अर्थात "जया अंगी मोठेपण तया यातना कठीण" असे म्हणतात. मात्र, त्यांनी मोठेपणाच्या नादात असे काही मोठे कृत्य केले आहे. की, ते "अक्षम्य" असून त्यांना सामाजिक, आर्थिक, शारिरीक व मानसिक अशा अनेक यातना आता भोगाव्या लागणार आहेत.

खरंतर, कालपर्यंत जोवर त्यांच्या डोक्यावर "पत्रकारीतेचा मुकूट" होता. तोवर अपवाद वगळता प्रत्येकाच्या मनात त्यांच्याविषयी आत्मियता होती. जेव्हा का त्यांचे नाव पोलीस अधिक्षकांनी जाहीर केले. तेव्हा खर्‍या अर्थाने बाळासाहेब झालेले बोठे पुन्हा बाळ झाले आणि प्रत्येकाने अगदी लाव्हारसासारखी खदखद आपापल्या परीने व्यक्त केली. खरंतर या मोठेपणाचा मुखवटा घेऊन मिरवताना आपण प्रगतीच्या दिशेने जाताना मागे किती जणांना चिरडले हेचे मुल्यांकन तेव्हाच होते. तेव्हा तो जितक्या वेगाने पुढे गेला तितक्याच वेगाने मागे येतो. त्यावेळी लोकांचा आपल्याप्रती असणारा खरा चेहरा लक्षात येतो. बोठेंच्या बाबत हे प्रमाण अगदी तंतोतंत जुळते. कारण, त्यांचे नाव पुढे याताच अनेकांनी सोशल मीडियातून व्यक्त व्हायला सुरूवात केली.

एक साधे उदा. आहे. सन 2014 साली जिल्ह्यात आर.डी.शिंदे यांच्यानंतर पोलीस अधिक्षक लखमी गौतम म्हणून नियुक्त झाले होते. तेव्हा केवळ एका शुल्लक कारणास्तव बोठे आणि लखमी गौतम यांच्यात बाचाबाची झाली होती. तेव्हा तब्बल दोन ते तीन महिने सलग एसपींच्या विरोधात त्यांनी मालिका लावली होती. प्रोफेशनल असणारा पेपर तेव्हा अगदी स्पेशल क्राईम सारखा वाटत होता. म्हणजे, वास्तवत: यापुर्वी असे कधी झाले नाही. मात्र, एक व्यक्तीद्वेष आणि मक्तेदारीचा प्रकार त्यांनी जिल्ह्यात रुजविला होता. त्यानंतर एका नेत्याच्या संगतीने अखेर नऊ महिन्यात लखमी गौतम यांना आपला डेरा आमरावती येथे हलवावा लागला होता. अर्थात तेव्हा पोलीस खात्यात पत्रकार आणि बोठे यांची जी काही प्रतिमा होती. ती पुर्णत: मलिन झाली होती. कारण, आपण जे काही कर्म करतो आहे. तर सामाजमान्य नसले तर त्याचा उद्रेख हा संयमाने का होईना होतोच. हेच वास्तव आहे. कारण, आज त्यानी स्वत:वर जी काही वेळ ओढावून घेतली आहे. त्यावर मत व्यक्त करताना बहुतांशी अधिकारी हे त्यांच्यावर भुतकाळात प्रचंड नाराज असल्याचे लक्षात येते.

आता राहिला प्रश्न हे घडलं तरी कसं? तर याचे उत्तर येणार्‍या काळात पुढे येईल. मात्र, बोठे यांनी यापुर्वीच काही मालिका लावल्या होत्या, त्या हनिट्रॅपचा आणि त्यांचा थेट संबंध असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. त्यात त्यांनी एका लेखात उल्लेख केला होता. की, या ट्रॅपचे काही पत्रकार देखील पीडित ठरणार आहेत. एकंदर त म्हणता तपेले ओळखणार्‍यांना यात नव्याने काही सांगण्याची गरज नाही. मात्र, इतक्या प्रगल्भ विचारांच्या व्यक्तीमत्वाने अशा प्रकारचे एखाद्या व्यक्तीला संपविण्यासाठी सुपारी देणे हे त्यांच्या पदाला, बुद्धीला व त्यांच्यातील लेखकाला न शोभणारे आहे. खरंतर कितीही विपक्ष परिस्थिती आली तरी तिला स्थैर्याने आणि धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती हे ज्ञान देत असते. मात्र, त्यांनी स्वत:कडील सर्व ज्ञानाला अर्थशुन्य करुन ठेवले की काय! असे वाटू लागले आहे.

खरंतर आता फार खोलात जाणे योग्य नाही. मात्र, सुपारी वैगरेच्या अपरोक्त त्यांनी विवेकाने विचार करायला हवा होता. होऊन-होऊन काय झाले असते? संविधानातील आयपीसीच्या 511 पैकी एक गुन्हा दाखल झाला असता. त्याला सामोरे जाता आले असते, पत, पद, प्रतिष्ठा आणि खूप नाही स्थिरस्थावर राहिले असते. मात्र, कदाचित इतक्या मोठ्या व्यक्तीला मार्गदर्शक म्हणून नक्कीच कोणीतरी शकुनीमामा लाभला असावा. कदाचित श्रीकृष्णासारखा एक तरी मित्र असता तर सगळं वैभव जैसे-थे राहिले असते. आता पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्यासारखा अधिकारी कोणाच्या दबावाला बळी पडेल असे स्वप्नात देखील कोणाच्या येणार नाही. त्यामुळे, बाळ बोठे यांनी स्वत: हजर होण्याच्या पलिकडे पर्याय राहणार नाही.

तरी, एक गोष्ट लक्षात घेता. बोठे यांचा धनबलाढ्य मित्र परीवार फार मोठा आहे तर कायदेशी सल्ला देणारे देखील कमी नाहीत. त्यामुळे, एकदा मागे वळुन पाहिले तर एका शेळके प्रकरणात सुप्रिम कोर्टापर्यंत पाण्यासारखा पैसा खर्च करून कायदेशीर लढाई त्यांनी लढली होती. आता मात्र, हे प्रकरण त्यापेक्षा वेगळे असले तरी ते सहजासहजी हार माननार नाहीत असे बोलले जाते. मात्र, एसपी पाटील हे अगदी चतुर निघाले आहेत. त्यांनी विजय माल्या, निरव मोदी यांच्यासारखी पद्धत वापरु नये म्हणून पाटील यांनी विमान प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे. आता जर कदाचित तीन महिन्याच्या आत बोठे हे पोलिसांना शरण आले नाही. तर त्यांची स्थावर मालमत्ता जप्तीचे आदेश देखील न्यायालय देऊ शकते. त्यामुळे, येणार्‍या काळात आता हा गुन्हा नेमके कोठे पुर्णविराम घेतो. की, बाळ बोठे देखील पुढे या प्रकरणाला राजकीय वळण देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.