चक्क त्या मुर्खांनी आश्रम फोडला.! हॉस्पिटलमध्येही चोरी.! संगमनेरला पीआयची नित्तांत गरज.!

सार्वभौम (संगमनेर) :-

                      संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथे मुक्ताई आश्रम मध्ये चक्क चोरी झाल्याची धक्कादायक घटना शनिवार दि.19 डिसेंबर रोजी संध्याकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. यात 1 लाख 52 हजार रुपये किंमतीचे दागीने, 15 हजार रुपये रोख रक्कम, 67 हजार 500 रुपये किंमतीची सी.ए.एफ.3403 नंबरची गाडी व महत्वाची कागदपत्रे असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे, वेल्हाळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विठ्ठल संपतराव सोनवणे (रा. वेल्हाळे, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे भंडमळा येथे श्री. मुक्ताई आश्रम आहे. तेथे विठ्ठल सोनवणे हे वास्तव्य करतात. मात्र. ते काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यावेळी त्यांनी आश्रमाच्या खिडक्या बंद करून व दरवाजाला कुलुप लावले होते. त्यानंतर ते बाहेर गावी गेले. याचाच फायदा घेऊन काही अज्ञात चोरट्यांनी बंद आश्रमाचे कुलुप ताडून 1 लाख 52 हजार रुपये किंमतीचे दागीने, 15 हजार रुपये रोख रक्कम, महत्वाची कागदपत्रे व गाडी चोरून असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.

दरम्यान, विठ्ठल सोनवणे हे बुधवार दि. 23 रोजी सायंकाळी आश्रमावर आले असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी आश्रमात पडलेल्या अस्तव्यस्त वस्तू पाहून तेथील दागिने व मालमत्ता सुरक्षित आहे की नाही. याची तपासणी केली असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्याकडे धाव घेत अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक लबडे करत आहे.

      दरम्यान, संगमनेरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोर्‍या घरफोड्या आणि दरोडे असे प्रकार वारंवार घडताना दिसत आहे. तर दुसरीकडे येथील अवैध धंद्यांना उत आले आहे. असे असताना देखील संगमनेर सारखे मोठे पोलीस ठाणे ते ही नामदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असणार्‍या शहर पोलीस ठाण्यात गेल्या 12 दिवसांपासून पोलीस निरीक्षक नाही. त्यामुळे, येथे कर्मचार्‍यांचा मनमानी कारभार आणि खुलेआम मलिदे जमा करण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारे पोलीस ठाणे वार्‍यावर राहणे ही पहिलीच वेळ आहे. अकोल्यात एकटे पोलीस निरीक्षक तर संगमनेरात दुय्यम अधिकारी कोणती व कशी रिस्क घेणार आहे. त्यामुळे, येथे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याच्या आत पोलीस निरीक्षकाची नेमणूक व्हावी अशी मागणी होत आहे. 

शहर हाद्दीत आता चोर्‍यांचे प्रमाण वाढू लागले आहे. सरासरी महिन्यात 10 ते 15 गाड्यांची चोरी होताना दिसते. काही वेळा गुन्हा दाखल होतो तर कधी होत नाही. कारण, वाहन चोर्‍यांची टोळी गजाआड करण्याच पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. तर घरफोड्या देखील कायम तपासावर आहेत. या आश्रमातील चोर बरोबर पानसरे हॉस्पिटल येथे देखील लता दादासाहेब कोकाटे (रा. राजापूर रोड, ता. संगमनेर) यांचा 11 हजार रुपयांचा मोबाईल चोरी गेला आहे. शहर हाद्दीत लग्नातून आणि हॉस्पिटलांमधून चोर्‍या होण्याचे प्रमाण वाढत असून त्यांच्यावर आळा घालण्यात पोलिसांना अपयश येत असल्याची टिका आता होऊ लागली आहे. 

तर अकोले तालुक्यातील निब्रळ येथे नदीपात्रातून पाणी काढण्याची मोटर, पाईप व केबल असा २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला आहे. ही घटना दि. २३ डिसेंबर २०२० रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी देविदास तुळशीराम गायकर (रा. निब्रळ, ता. अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.