अगस्ति कारखाण्याचा राजकीय बॉयलर पेटला, फक्त चालु गाडीची कानखीळ काढू नका म्हणजे झालं!

 - सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

                        जसजशी अगस्ती सहकारी साखर कारखाण्याची निवडणुक तोंडावर येऊ लागली आहे. तसतशी त्याला तिखट राजकारणाची चव लागू लागली आहे. मात्र, या आरोप प्रत्यारोपात 10 जुन 2002 च्या घटनेनंतर जे काही दिवस शेतकरी आणि कारखाना कामगारांना पहायला लागले होते. ते दिवस पुन्हा येऊ नये म्हणजे झालं! कारण, ज्या पवार साहेबांच्या भरवशावर अकोले तालुक्याच्या दरी-खोरीत तिरंग्याच्या मधोमध अगदी दिमाखात घड्याळ फडकविण्याचे काम येथील 1 लाख 13 हजार 414 लोकांनी केले. तेथे एकटे आमदार न अन्य नेते अपवाद वगळता खरोखर अन्य पदाधिकारी जनमानसात आहेत का? जे आहेत ते त्यांनी समाजासाठी काय केले? त्यामुळे, परिवर्तनाच्या नावाखाली कोणी "चालु गाडीची कानखीळ" काढीत असेल तर त्यांची कान उघडणी करण्याचे काम आता कारखाण्याच्या सभासदांनीच केले पाहिजे. खरंतर अनेकदा उल्लेख झाला की, कारखाण्यावर कर्ज आहे. मात्र, साधं चहाचे दुकान टाकायचे म्हटले तरी दिड लाख रुपयांचे लोन घ्यावे लागते. येथे तर प्रोजेक्ट उभे करुन कारखाना निल करायचा आहे. सन 2017-18 मध्ये याच कारखाण्याचा साखर उतार 11.28 म्हणजे जिल्ह्यात सर्वेच्च होता. हे लोक का विसरतात! हेच काळत नाही. उगच अवडंबर करुन "उचलायची जीब आणि लावायची टाळुला" हे योग्य नाही. राजकारण काही असले तरी ज्यांच्यावर पुण्यात आरोप प्रत्यारोप झाले त्यांची "बीजे" येथे रुजविण्याचा प्रयत्न होत असेल तर येथे आरोप-प्रत्यारोप सोडून दुसरे काय "उगवणार" आहेत? त्यामुळे, राजकारण काही असले तरी येथे "चालु गाडीची कानखिळ" काढून कोणी तालुक्याचा "कामधेनु" बंद पाडू नये. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सुज्ञ सभासदांमधून उमटू लागल्या आहेत.

आता मी फार काही खोलात जात नाही. मात्र, 19 व्या शतकापासून कारखाण्यात पिचड यांच्या विरोधात विरोधकांनी थळ पेटविण्याचे प्रयत्न केले आहे. मात्र, त्यांना यश आले नाही. उभा राहिलेला विरोधक आपल्या गोटात घ्यायचा आणि त्यांना इतकी रसद पुरवायची की त्याचे अस्तित्वच संपून टाकायचे. याचे उत्तम उदा. म्हणजे सेनेचे लोक ते कोण हे तुम्हाला नव्याने सांगायला नको. थोडी इतिहासाची पाने चाळली की, त्यांचे चेहर चलचित्रासारखे आपोआप डोळ्यासमोर भिरभिरेल. त्यामुळे, कारखाण्याच्या निवडणुका ह्या आजवर धनदांडगे आणि नातेगोते संभाळून केल्याचे दिसून येते. ते काहीही असले तरी कारखाना रडत खडत सुरू आहे. येथील मालमत्ता म्हणजे अगदी "खेळते भांडवल" असल्यामुळे एकवेळी नगरपंचायतीला कोणी दंड थोपटनार नाही. मात्र, कारखाण्यासाठी "जीवाचे रान" करायला तयार असतात. हे तितकेच सत्य आहे.

सन 2002 साली म्हणजे आज 18 वर्ष झाली. विरोधाकांनी कारखाण्यावर वर्चस्व गाजविण्यासाठी मोठी धडपड केली. त्यावेळी तालुक्यात गोळीबारासह दंगल झाली होती. त्यानंतर पिचड यांनी दोन पावले मागे टाकली आणि समांतर न्याय झाला. त्यानंतर झाले काय? तर कालांतराने कारखाना बंद पडला. यंत्रसामग्री गंजून गेली. अनेकांच्या हाताचा रोजगार गेला. उत्पादन शुन्य झाले, शेतकार्‍यांना देखील मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागला होता. त्यामुळे, "चालु गाडीची कानखीळ" काढल्याचा तोटा काय होतो. याच्या झळा विचारण्यासाठी तेव्हा बेरोजगार झालेल्या नोकरदारांना विचारले तरी आजही त्यांच्या जुन्या दु:खद आठवणी जाग्या होतात. तर सन 1999 ते 2000 मध्ये याच साखर कारखाण्याला महाराष्ट्र सेंट्रल झोनमध्ये उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेबद्दल द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता. इतकेच काय! वसंतदादा शुगर संस्थानाच्या वतीने द्वितीय क्रमांकाने सन्मानित केले होते. तर अवघ्या तीनचार वर्षानंतर कारखाण्याची अवस्था प्रचंड बिकट झाली होती. तेव्हा देखील काही विरोधामुळे लोन काढून कारखाण्याला पुन्हा जिवितास्था देण्यात आली होती.

एकंदर आता सन 2017-18 सालची आकडेवारी पाहिली. तर एक गोष्ट लक्षात येते की, रोज 2 हजार 500 टन उस गाळपाची क्षमता असून तेव्हा गळीत हंगाम 1 लाख 73 हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन करणारा हा जिल्ह्यातील पहिला साखर कारखाना ठरला होता. खरंतर तेव्हा कोणत्याही प्रकारचे उपउत्पादन नव्हते. तेव्हा राज्यातील 147 पैकी 127 साखर कारखाण्यांचे गाळप सुरू होते. त्यात नगर जिल्ह्याचा सरासरी गाळप 9.30 होता तर जिल्ह्याच्या तुलनेत अकोले साखर कारखाण्याचा साखर उतार 11.18 इतका होता. नगर जिल्ह्यातील अन्य कारखाण्यांच्या तुलनेत ही आकडेवारी सर्वेच्च होती. त्यामुळे, सन 2018 हे एक वर्ष मध्ये गेले. 2019 वर्षे सगळ्यांना माहितच आहे. मात्र, तरी देखील या दोन वर्षात येथे इथेनॉल सारखा प्रकल्प आला तर अन्य प्रकल्पांनी येथे जन्म घेतला आहे. हे प्रकल्प म्हणजे काही चहाच्या टपर्‍या नाहीत. त्यामुळे, जे काही करायचे ते कर्ज काढूनच करायचे होते. डर के आगे जीत हैं! असे म्हणत विकासाच्या दृष्टीने प्रोजेक्ट उभे रहात असतील तर काय हरकत आहे? असा प्रश्न सुज्ञ नागरिक व सभासद करीत आहेत.

खरंतर, कर्जाची जी काही चर्चा होत आहे. ती म्हणजे केवळ बागुलबुवा उभा केला जात आहे. जिल्ह्यातील आणि राज्यातील असा कोणता कारखाना असा नाही. की ज्यावर कोट्यावधींचे कर्ज नाही. जस्ट केंद्रशासनाने न मागता आत्मनिर्भार योजनेतून सगळ्या कारखाण्यांना कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. अशा अनेक योजना आहेत त्यातून अगदी सहज कर्ज मिळते. त्यामुळे, कारखाण्याचे कर्ज ही टिकेची बाजू होईल असे अनेकांना वाटत नाही. खरंतर कारखाण्यात जे कोणी कामगार व उत्पादक आहेत. ते कारखाण्याचे काही संचालक वगळता व्यवस्थापनावर खूश आहेत. शेतकर्‍यांना कारखाण्याने लॉकडाऊन आणि दिवाळीच्या काळात कोट्यावधी रुपयांचा हातभार लावला आहे. तर दुसरीकडे कारखाण्याचे एम.डी घुले यांनी कारखाण्याला जी काही शिस्त लावली आहे. त्यामुळे येथे अर्मी प्रमाणे सरळ सुतासारखे काम चालते. त्यांच्या प्रशासकीय कार्यकाळावर जर कोणी शंका उपस्थित करीत असेल तर तो व्यक्तीद्वेष म्हणावा लागले.

खरंतर देशमुख यांनी एक पत्रकार परिषद घेऊन जे काही मुद्दे उपस्थित केले. त्याचे खंडण करणे कारखाना व्यवस्थापनाला अनिवार्य नसले तरी आवश्यक होते. ती जी काही निव्वळ कोटीत आकडेवारी होती. त्याचा हिशोब त्यांनी जरी वरवर मांडला तरी तो तितका सोपा नाही. हे आपल्याला चांगले कळते. कारण, नुसतं घर बांधायला काढलं तर दिड लाखांचं बजेट तीन लाखांंवर जाते. मात्र, त्यांनी निवृत्तीनंतर जो काही जनजागृतीचा वसा घेतला आहे. तो योग्यच आहे. "जेणे आपल्याला ठावं, तेने दुसर्‍याला सांगावं"! ही म्हण आहे. त्यांचा प्रशासकीय सेवेतील अनूभव प्रचंड मोठा आहे आणि त्यांच्या डोळ्यादेखत जर कोणी मनमानी कारभार चालवत असेल तर ते त्यांच्यासारख्या माहितगार व बुद्धीजीवी व्यक्तीला न खपण्यासारखे आहे. त्यामुळे, त्यांच्या आरोपांचे खंड करणे अनेकांना अनिवार्य वाटते आहे. मात्र, दुसरा मुद्दा असा की, असेच आरोप-प्रत्यारोप व प्रश्न उत्तरांचा तास सुरू राहिला तर कामे करायचे कोणी? त्यामुळे, व्यवस्थापनाने कानाला हात लावलेले दिसतो आहे. आता कारखाना घाट्यात आहे, बुडते जहाज आहे, बंद पडणार आहे. जाणकार कोणी त्यावर निवडून जायला तयार नाहीत. तर, मग ही सगळी उठाठेव कशासाठी, गावोगावी भेटीगाठी आणि पवार साहेबांना साकडे कशासाठी हे सर्व काही तुर्तास कळण्याच्या पलिकडचे आहे. अर्थात आता राजकारणाचा बॉयलर पेटला आहे. त्यातून धुरळा उडणारच आहे. परंतु जर असेच विरोधक आक्रमक राहिले तर सभासद, जनता आणि शेतकरी हुशार होत राहतील. यात शंकाच नाही.

भाग  : १ क्रमश: