पिंपळगावात अवैध दारु आड्ड्यावर बेछुट हाणामार्‍या.! दोघांना मारहाण, गावकर्‍यांनी हॉटेलची तोडफोड करुन बाटल्या फोडल्या.!

सार्वभौम (पिंपळगाव) :- 

                     टिंग झाल्यानंतर दारु आड्ड्यावर पिंपळगाव निपाणी गावातील एका व्यक्तीने राडा घातला. त्यानंतर हॉटेल चालकांनी त्यांची चांगलीच बांबुने धुलाई केली. तर हा व्यक्ती घरी गेल्यानंतर त्यांच्या मुलास हा प्रकार समजताच त्याने अगदी फिल्मी स्टाईलने तरुणांना एकत्र करुन हॉटेलवर जाऊन तोडफोड केली. तर ज्यांनी मारहाण केली त्यांना जशास तसे उत्तर देत राडा घातला. यात दोघे जखमी झाले असून याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. तर यातील जखमी व्यक्ती उपचार घेत असून उद्या याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तर पिंपळगावच्या धांबोडी फाट्यावर जो दारुच्या व्यवसाय चालतो, तो नेमकी कोणाच्या आशिर्वादाने? असा प्रश्न उपस्थित करुन नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून विरगाव फाट्याला जसे महत्व प्राप्त झाले आहे. तसे तालुक्यातील अनेक फाटे दारुच्या गुट्ट्यांनी अगदी नटून गेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे पिंपळगाव निपाणी येथील धांबोडी फाटा हा काही दिवसांपुर्वी अगदी निद्रीस्त अवस्थेत होता. आता मात्र, तेथे अवैध धंद्यांचे सामाज्र पसरू लागले आहे. कधी नव्हे येथे आता दारुच्या विक्रीचा व्यवसाय केला जातो. हा कोणाच्या आशिर्वादाने हे नव्याने सांगायला नको.!

त्याचे असे झाले की, शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव निपाणी येथील एक महाशय येथे तर्र होण्यासाठी गेले होते. आता एकदा द्रव प्राशन झाल्यानंतर माणूस जमिनिवर नसतो तो थेट चंद्रावर पोहचतो हे कोणाला नव्याने सांगायला नको! त्यामुळे, येथे हॉटेल चालक आणि या महाशयामध्ये चांगलीच बाचाबाची झाली. या दरम्यान, हॉटेल चालकांनी या व्यक्तीस चांगलीच मारहाण करुन तेथून काढून दिले. त्यानंतर हा व्यक्ती गावात गेल्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार त्यांच्या मुलास सांगितला. मुलाने त्याच्या मित्रांना एकत्र करुन थेट संबंधित हॉटेल गाठले. माझ्या वडीलांना मारहाण का केली असा जाब विचारला असता तेथे पुन्हा बाचाबाची सुरू झाली.

दरम्यान, हा वाद प्रचंड टोकाला गेला आणि दोन्ही गट एकमेकांना भिडले. काही तरुणांनी तेथील हॉटेलची तोडतोड केली. तर हॉटेल चालविणारे देखील स्थानिक असल्यामुळे त्यांनी देखील दंड थोपटले. मात्र, गाव करील ते राव काय करणार? त्यामुळे, काही वेळात तेथे गावकरी हजर झाले. येेथे अवैध व्यवसाय चालवायचा नाही असे म्हणत हॉटेलमधील सर्व दारुच्या बाटल्या फोडून टाकल्या. अनेकांचा संसार उध्वस्त करणारी दारु गावात कोठेही विकली जाणार नाही असे म्हणत पिंपळगावचे तरुण एकत्र आले आणि त्यांनी काही क्षणात होत्याचे नव्हते करुन ठेवले.

हा प्रकार घडल्यानंतर जे दोन व्यक्ती जखमी झाले होतेे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची स्टेशन डायरीला नोंद घेतली आहे. मात्र, खंडोबा डोंगराच्या पायथ्याशी आणि संटुआईच्या कमानीजवळ अशा पद्धतीने दारुची विक्री करुन पिंपळगावाला बदनाम करणाच्या प्रयत्न करणार्‍यांच्या विरोधात उद्या अंदोलन करण्याची वेळ आली तर आम्ही करु. मात्र, येथे धंदा चालवू देणार नाही. असे मत गावकर्‍यांनी व्यक्त केले आहे. तर यांना पाठीशी घालणार्‍यांच्या विरोधात पोलीस अधिक्षक यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे उत्तर महा. राज्य अध्यक्ष गणेश तोरमल यांनी दिली आहे.