अकोल्यातील अॅम्ब्युलन्सच्या भंगार व्यवस्थेने तो बळी गेला असता.! आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यावर कोरोनाचे सावट उभे असताना येथील आरोग्य यंत्रणा आणि अॅम्ब्युलन्सचे व्यवस्थापन म्हणजे वेळेला केळं आणि वनवासाला शिताफळं अशी भूमिका बजावताना दिसत आहे. तर, आरोग्य विभागाने एका वेगळाच पराक्रम केल्याचे पहायला मिळाले. ते असे की, संबंधित रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह नसताना देखील त्यास कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले. तर नंतर त्यांचा एचआरसीटीचा स्कोर 17 आल्यानंतर मोठी धावपळ उडाली. त्यानंतर खरी रुग्णाची आबळ झाली. कारण, एक ना दोन तब्बल अडिच तास 108 या अॅम्ब्युलन्सची वाट पाहून देखील ती प्राप्त झाली नाही. शेवटी अकोल्यातील 1 ते 17 या व्हाटसअॅप गृपवर एक मेसेज टाकल्यानंतर मा. नगरसेवक नामदेव पिचड यांनी तत्काळ व्यवस्था करुन रुग्णास संगमनेर शहरातील डॉ. अमोल कासार यांच्याकडे दाखल केले. त्यांनी 8 वाजता येणारा रुग्ण 11:30 वाजता नेला तरी मोठे सहकार्य करीत त्यास तत्काळ दाखल करुन घेतले. आज योग्यवेळी मिळालेली अॅम्ब्युलन्स व डॉक्टरांच्या सहकार्याने 17 स्कोर असणारा रुग्ण ठणठणीत झाला आहे. यातील गमतीचा भाग असा की, रुग्णाला ऑक्सिजन लावल्यानंतर अकोल्यातून डॉक्टरांचा फोन आला की, ऑम्ब्युलन्स अकोल्यात आली आहे. म्हटलं धन्य तुमची गाडी आणि धन्य तुमची सेवा.!
कोरोनाच्या कडूकाळ दिवसात रोजच्या रोजीरोटी प्रश्न सोडविण्यासाठी एक तरुण बाजारातून भाजीपाला भरतो आणि तो हातकाट्यावर दिवसभर विकतो. हाच नित्याचा दिनक्रम असताना अचानक अंग भरुन येतं आणि एक ना दोन तब्बल आठ दिवस तो हेच दुखणं अंगावर काढतो. खोकला आणि सर्दीने जाम झाल्यानंतर कोरोनाच्या तपासणीसाठी तो दि.29 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात तपासणीसाठी जातो. तेथील डॉक्टर त्यास थेट संगमनेर येथे एचआरसीटी करण्यासाठी पाठवितात, तेथे स्कोर 17 येतो आणि मग खरी धावपळ सुरू होते. आता हा प्रकार निमोनियाचा असला तरी तो व्यक्ती पॉझिटीव्ह असेलच असे नाही. मात्र, अकोल्यात सगळ्यांना एकाच जात्यात भरडले जाते. हा प्रत्येय तेथे पहायला मिळाला. 17 स्कोर नंतर कोणत्याही प्रकारची तपासणी न करता या तरुणास अकोल्याच्या कोविड सेंटरमध्ये पुन्हा दाखल करण्यात आले. तेथे 17 स्कोर आल्याचे सांगताच रुग्ण निम्मा जायबंदी झाला होता. इतके होऊन देखील त्या कोविडच्याच ठिकाणी त्यास ठेवण्यात आले. त्यानंतर जेव्हा तरुणाच्या नातेवाईकांनी रोखठोक सार्वभौमशी संपर्क साधला. पुढील यंत्रणा हालली व त्यानंतर त्यास डॉ. भांडकोळी डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये असणार्या सरकारी बेडवर ठेवण्याचे ठरविण्यात आले. दुर्दैवाने तहसिलदार साहेबांनी 3 ते 4 वेळा कॉल करुन देखील 108 अॅब्म्युलन्स मिळाली नाही. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरतर इतके हात झटकतात की जणूकाय ते कंत्राटी कामगार आहेत. ते दोन मिनिट म्हणता-म्हणता सव्वा तास झाला, तरी त्यांची गाडी आली नाही. शेवटी रुग्णाच्या भावाने त्यास दुचाकीवर बसविले आणि सरकारी ऑक्सिजन बेडवर आणले.
दरम्यानच्या काळात रुग्णाचा स्कोर पाहता त्यास प्रचंड अशक्तपणा आलेला होता. त्यामुळे, त्यास व्हेंटीलेटर व योग्य उपलब्ध होणे अत्यावश्यक होते. अन्यथा रुग्णाची मानसिकता देखील भितीची होत चालली होती. त्यामुळे, रुग्णास पुढे हलविणे फार गरजेचे होते. त्यामुळे अकोल्यातील ग्रामीण रुग्णालयात संपर्क केला. ते म्हणाले 2 मिनिटीत गाडी येईल. तहसिलदार व डॉ. शेटे यांनी देखील प्रचंड प्रयत्न केला. मात्र, सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. एक पर्याय म्हणून पुन्हा पुण्यातील 108 क्रमांकाहून अकोल्यातील गाडीचे लोकेशन घेतले. तेव्हा समजले की, ड्रायव्हर जेवत आहे, तो कोतुळ येथे असून 10 मिनिटात तेथून निघणार आहे. ही परिस्थिती फार भयानक होती. दुसर्या साधारण गाड्यांमध्ये ऑक्सिजनची सेवा मिळेल याची शक्यता कमी होती. अशावेळी एक अटकल लक्षात आली आणि तिचाच वापर मोठा जालीम ठरला.
त्याच रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास हतबल अवस्थेत असताना अकोले नगरपंचायत 1 ते 17 या गृपवर एक मेसेज टाकला गेला. फार तत्काळ अॅम्ब्युलन्स हवी आहे. त्यानंतर नामदेव पिचड यांनी फार शिताफीने उत्तर देत दोनजणांचे संपर्क क्रमांक टाकले. तर फोन करुन पुढील यंत्रणा हलविली. (तर संदीप शेणकर, शशिकांत, गणेश शेळके, महेश जेजुरकर यांनी देखील गृपवर मदतीचे प्रयत्न केले.) अवघ्या काही मिनिटात संतोष वाकचौरे व बिलाल शेठ यांनी अगदी अल्पदरात मदत केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या वाहन चालकाने अवघ्या 15 मिनिटात संगमनेर गाठून रुग्णाला डॉक्टरांच्या स्वाधिन केले. अर्थात सोशल मीडियातील व्हाटसअॅपचा फायदा एका तरुणाला जीवदान देऊन गेला. तर कधी गृपवर ब्र शब्द न काढणारा नामदेव खरोखर देेवासारखा धावून आला. बाकी काही वाच्चाळवीर गुमान गृपमध्ये बघत होते.
आज एक गोष्ट अवर्जुन अधोरेखीत करावीशी वाटते की, 8 वाजता डॉक्टर अमोल कासार हे पुण्याहून आले होते. त्याना संबंधित रुग्णाबाबत माहिती दिली होती. आत्ता-आत्ता करता करता 11 वाजून गेले तरी रुग्ण येत नव्हता. मात्र, इतके थकलेले असताना देखील विनंतीला मान देऊन त्यांनी रात्री 11:30 वाजता रुग्ण ताब्यात घेतले. संबंधित तरुणावर उपचार सुरू करून घरच्यांना मोठा धिर दिला. प्रचंड घाबरलेल्या तरुणास त्यांनी आधार देत निम्मी भिती दूर केली. रात्री अपरात्री स्वत: लक्ष घालुन रुग्णांची काळजी करणार्या या देव माणसामुळे 17 स्कोर असणारा खचलेला तरुण आज अगदी ठणठणीत असून तो लवकरच घरी येणार आहे.
या दरम्यानच्या काळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, कोणी अचानक मरायला टेकले तर धड तालुक्यात एक प्रशस्त दवाखाना नाही. ते तर सोडा किमान रुग्ण दुसर्या तालुक्यात न्यायला साधी अॅम्ब्युलन्स नाही, ती ही सोडा पण भेटलीच खाजगी तर शेजारच्या तालुक्यात जायला धड रस्ता देखील नाही आणि जो आहे. त्याने जगणारे पेशन्ट मेल्याशिवाय राहणार नाही. इतकी बिकट अवस्था आहे. त्यामुळे, या तालुक्याने कोणत्या जन्मात नेमके काय पाप केले आहे हेच कळायला तयार नाही. ही परिस्थिती अशीच राहिली तर येणार्या काळात येथे कोणताही लोकप्रतिनिधी नको. फक्त एकाच तालुक्यावर प्रशासकीय राजवट ठेऊन तालुक्याचा विकास करण्याची तरतुद केली पाहिजे. इतका हा तालुका या बोगस राजकारणाला वैतागला आहे.
आता एक आशा आहे की, डॉ. किरण लहामटे यांच्या विविध विकास निधिच्या कामातून एक अॅम्ब्युलन्स अकोले तालुक्यासाठी मिळाली आहे. ती किमान अकोल्यातील रुग्ण संगमनेर तालुक्यात नेण्यासाठी तरी उपयोगी पडेल अशी अपेक्षा करुया. प्रशस्त हॉस्पिटल आणि सरकारी उपचार यांच्या भरवशावर लोकं बसले तरी जगणं मुश्किल होईल. सध्या डॉ. भांडकोळी हे तालुक्यासाठी देव माणूस आहेत. त्यांच्या सेवेला प्रसाद माणून त्यांच्यावर विश्वास ठेवावा, तर जे कोणी त्यांच्याबाबत रिकाम्या उंगल्या करीत आहेत. त्यांना विनंती करुयात की, तुमच्यामुळे त्यांच्या सेवा देण्यावर बंधणे येणार नाही असे कृत्य बंद करुन तालुक्यावर मेहरबानी करा. कारण, ज्याला वेदना होतात त्याचे दु:ख फुकट बाबुरावक्या करणार्यांना कळत नाही.!