शादी डॉट कॉमवर ओळख करुन घारगावच्या पोलिसाने केला महिलेवर बलात्कार.! अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे.! दोन वेळा गर्भपात, डॉक्टरसह चौघे आरोपी.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

            शादी डॉट कॉमवर सोलापुरच्या एका महिलेशी ओळख करुन एका पोलीस कर्मचाऱ्याने तिच्यावर अत्याचार केला. इतकेच काय!  दोन वेळी तिचा गर्भपात करुन त्याची विल्हेवाट लावली. ही घटना घारगाव, संगमनेर व जुन्नर या ठिकाणी दि. ११ जानेवारी २०१० ते दि. २० नोव्हेंबर २०२० या दरम्यान घडली. याप्रकरणी घारगावचे पोलीस कर्मचारी सुनिल यशवंत रत्नपारखी, अमोल कर्जुले, डॉ. व्हि. जी मोरे (निरामय हॉस्पिटल आळे, ता. जुन्नर) व एक महिला अशा चौघांना आरोपी करण्यात आले आहे.

        याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलीस कर्मचारी सुनिल रत्नपारखी हा घारगाव पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्याचे घरात कौटुंबिक वादंग सुरु असल्यामुळे त्याने लग्न करण्यासाठी शादी डॉट कॉमवर स्वत:चे प्रोफाईल तयार केले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात त्याची आणि सोलापूर येथील एका महिलेची ओळख झाली होती. या दोघांनी मोबाईलवर चॅटिंग सुरु केली असता त्यांच्यात मैत्री झाली व दोघांनी लग्न करण्याचे ठरविले.

     दरम्यान, या दोघांचे प्रेम संबंध जुळल्यानंतर लग्नाचा शब्द मिळताच दोघांमध्ये जानेवारी ते नोव्हेंबर २०२० या दरम्यान वेळोवेळी शरिरीक संबंध आले. यावेळी एकदा ही महिला गरोदर राहिली असता सुनिल रत्नपारखी याने तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन तो गर्भ पाडून टाकला. जेव्हा संबंधित महिलेने त्याच्याकडे लग्न करण्याची मागणी केली तेव्हा त्याने उडवाउडविची उत्तरे दिली. तरी देखील एक दिवस लग्न होईल अशा अपेक्षेने पीडित महिला त्याच्या संपर्कात राहिली.

     दरम्यानच्या काळात सुनिल व संबंधित महिला यांच्यात पुन्हा शरिरीक संबंध आले असता ती पुन्हा गर्भवती राहिली. तेव्हा मात्र बरेच दिवस या दोघांमध्ये मतभेद होत राहिले. तिने लग्न करण्यासाठी त्याला विचारले मात्र ते शक्य झाले नाही. त्यानंतर या गर्भाचे दिवस जास्त झाल्यामुळे सुनिल याने पीडित महिलेला जुन्नर तालुक्यातील आळे येथे असणाऱ्या निरामय हॉस्पिटल येथे नेले. तेथील डॉ. व्हि. जी.  मोरे याने या महिलेचा गर्भपात करुन त्याची विल्हेवाट लावली आहे. त्यामुळे, या डॉक्टरांना देखील आरोपी करण्यात आले आहे. तर याच कालावधित सुनिल याने पीडित महिलेच्या मुलीसोबत देखील अश्लिल वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

       तर यात अमोल कर्जुले (रा. अकोले) व अन्य एका व्यक्तीस देखील आरोपी करण्यात आले आहे. ते बलात्काराच्या गुन्ह्यात नाहीत. मात्र, कर्जुले व अन्य एका महिलेने पीडित महिलेसह तिच्या भावास शिवीगाळ दमदाटी करुन मारहाण करीत घराबाहेर हुसकावून दिले. असे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी बलात्कार, अॅट्रॉसिटी व पोस्को अशा गंभीर कलमान्वये   गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपाधिक्षक राहुल मदने करीत आहेत.

- सुशांत पावसे