अखेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे याच्या हात्ये प्रकरणी तिघांना अटक एक ताब्यात, गुन्ह्याची कबुली, पाच दिवस पीसीआर.!
सार्वभौम (अ.नगर) :-
नगर शहरातील रेखा जरे यांची सुपारी देऊन हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही सुपारी कोणी व का दिली याचा तपास पोलीस करीत आहे. तुर्तास या प्रकरणातील सागर भिंगारदिवे यास ताब्यात घेतले असून तर त्याच्या मार्फत पुढील ज्या काही व्यक्तींना सुपारी दिल्याचे समोर आले आहेे. त्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. यात ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे (वय 24, रा. श्रीरामपूर), आदित्य सुधाकर चोळके (वय 25, रा. कोल्हार) व फिरोज राजू शेख (वय 26, रा. संकरापूर अंबी, ता. राहुरी) यांना अटक केली आहे. आज बुधवार दि. 2 डिसेंबर रोजी तिघांना पारनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांनी पुढील तपासासाठी न्यायालयाने 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खरंतर जेव्हा ही घटना घडली तेव्हाच रोखठोक सार्वभौमने सर्वात पहिले वृत्तांकन केले होते. की हा खून नव्हे तर नियोजनपुर्वक केलेली हत्या आहे. त्याबाबत काही प्रमाण व अंदाज देखील मांडले होते. हे अंदाज अगदी तंतोतंत खरे ठरले आहे. तर ही सुपारी असल्याचे उघड झाले असले तरी ही सुपारी कोण्या एकाने नव्हे तर हातोहात देणारे काही दलाल आहेत. ही साखळी पोलिसांच्या हाती लागली असून त्यांचा कसोशीने तपास सुरू आहे. हा अंदाज देखील अगदी तंतोतंत खरा ठरला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रेखा जरे या त्यांच्या कुटुंबासोबत पुण्याला गेल्या होत्या. त्या पुन्हा माघारी येत असताना त्यांच्यावर जातेगाव परिसरात हल्ला झाला होता. या दरम्यान गाडीला कट मारल्याचा बहाणा सांगण्यात आला असला तरी रोखठोक सार्वभौमला हे काही पटण्याजोगे नव्हते. त्यामुळे, हा खून भासविला असला तरी ती एक नियोजनपुर्वक सुपारी देऊन केलेली हत्या होती असे वृत्तांकन करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता या दरम्यान एक महत्वाचा फोटो या गुन्ह्यास वळण देऊन गेला. तो म्हणजे जरे यांच्या मुलाने मोठ्या शिताफीने व धर्याने गाडीत बसून समोर उभ्या असणार्या आरोपीचा फोटा काढला. तो पोलिसांना या गुन्ह्यांच्या उकलीपर्यंत घेऊन गेला.
जरे यांच्या मुलाने जे काही धाडस दाखविले. त्यानुसार सुताहून स्वर्ग गाठण्याचे काम पोलिसांनी केले. प्रथमत: या गुन्ह्यातील पहिला आरोपी हा भिंगारदिवे आहेे. याला शहरातील एक व्यक्तीने सुपारी दिली, त्याने राहाता तालुक्यातील चोळके यास सुपारी दिली, तर चोळके याने शिंदे व शेख यांना सुपारी देऊन जरे यांची हत्या केली. आता हा प्रकार जर स्पष्ट उघड वाटत असला तरी ही सुपारी देणारा मुळ व्यक्ती कोण? याचा शोध घेणे पोलिसांपुढे पुढील आव्हान असणार आहे. यात भिंगारदिवे याने सुपारी घेऊन ती दुसर्याला दिली आणि तो थेट कोकणात फिरण्यासाठी निघून गेला. मात्र, पोलिसांनी त्याचा छडा लावला असून त्याला देखील लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
आज पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता तिघांना 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. आरोपींकडून वाहन व हत्यार जप्त करणे आहे. त्यांनी कोणाकडून सुपारी घेतली, यात आणखी कोणकोण सामिल आहे. यांचे नियोजन कसे ठरले होते. ही सुपारी किती रुपयांना ठरली होती, अशा अनेक गोष्ठींचा तपास करणे आहे. असा युक्तीवाद पोलिसांच्या वतीने करण्यात आला होता. तर आरोपींच्या वकीलांनी देखील प्रबळ युक्तीवाद केला., दोन्ही पक्षाच्या बाजू लक्षात घेऊन न्यायालयाने तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.