अकोल्यात राष्ट्रवादी व भाजपला खिंडार.! भाऊंसह बडे सात नेत्यांचा मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यात सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सगळी राजकीय गणिते बदलुन गेली. डॉ. किरण लहामटे यांचे नेतृत्व स्विकारत तालुक्यातील जनतेने त्यांच्या गळ्यात विजयाची माळ टाकली. मात्र, राष्ट्रवादीची सुरुवातच अगदी ग्रहण लागल्यासारखी झाली की, पदांचे राजकारण आणि गटतट यातून डॉक्टरांना काही मोहरक्यांनी सुधरू दिले नाही. त्यामुळे, राष्ट्रवादीत एकहाती नेतृत्वाचा आभाव दिसून आला आणि तेव्हापासुनच पक्षाच्या संघटनाचा खुट रोवला गेला. म्हणून तर जेष्ठ नेते मधुकर नवले, मिनानाथ पांडे यांच्यासह अनेकांना राष्ट्रवादीत येण्याची इच्छा होती. मात्र, पक्ष सोडून अनेकांनी हेव्यादाव्याचे राजकारण केले आणि पक्षवाढीला आळा बसला. अर्थात मदन पथवे या तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदाचा राजिनामा दिला आणि ते थेट आज काँग्रेसमध्ये दाखल झाले. या सगळ्या उठाठेवीत पिचड यांना भाजपचा पक्षप्रवेश बळ देणारा ठरला नाही. तर, डॉ. लहामटे यांचा स्वभाव व त्यांच्या भोवती असणारी काही मंडळी यांच्यामुळे ही सर्व टिम थेट काँग्रेसमध्ये गेल्याचे बोलले जात आहे. आज अखेर मधुकार नवले, मिनानाथ पांडे, रमेश पवार (सरपंच सावरगाव पाठ) रमेश जगताप, भास्कर दराडे, मदन पथवे, एकनाथ सहाणे (मा. सरपंच, देवठाण) अशा काही व्यक्तींनी आज मंगळवार दि. 22 डिसेंबर 2020 रोजी मुंबई येथील गांधी भवन येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रवेश केला आहे.
कोणताही व्यक्तीद्वेश मनात न ठेवता माजी मंत्री मधुकर पिचड व मा.आमदार वैभव पिचड यांना सोडून मधुकर नवले यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नवले हे एक चालते बोलते विचारांचे व्यासपिठ आहेत. त्यांच्या शब्दांचे अनेकजण चाहते असून संस्थात्मक मतदान त्यांचे मोठ्या प्रमाणावर आहेत. कम्युनिस्ट विचारधारा अंगी बाळगून 70 च्या दशकापासून त्यांनी अनेक व्यासपिठांवर प्रभुत्व गाजविले आहे. त्यामुळे, अकोले व संगमनेर तालुक्यात त्यांच्याविचारांचा फार मोठा पगडा आहे. तर राज्यात त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते. त्यांना भाजपची विचारधारा पटत नसल्याने ते गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांनी कमळातून उडून हाती घड्याळ बांधण्याच्या आत राष्ट्रवादीत धुडगूस सुरू झाली. हा वाद थेट अजित दादा पवार यांच्यापर्यंत जाऊन पोहचला. मात्र, त्यांच्याकडून काही हलचाली होण्याच्या आत मधुकर नवले यांनी थेट ना. बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क करून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. नंतर मात्र बैठकावर बैठका घेऊन मधुकर नवले यांना राष्ट्रवादीत घेण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, हे वरातीमागून घोडे दौडून काहीच फायदा झाला नाही. अखेर नगरपंचायत आणि कारखाना यांच्यात राष्ट्रवादीला जो काही फायदा होणार होता. तो चंद लोकांच्या नादी लागून पक्षाचे मोठे नुकसान करून घेतले आहे.
दरम्यान, मिनानाथ पांडे यांनी देखील दोस्तीत कुस्ती केल्याचे बोलले जात आहे. मात्र, पांडे यांनी आजवर व्यक्तीनिष्ठ राजकारण केले नाही. तर पक्षनिष्ठ म्हणून त्यांनी राष्ट्रवादीकडे पाहिले होते. मात्र, त्यांची चुक एकच होती की, भाजपचा पराभव झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीच्या वाटा दिसू लागल्या होत्या. मात्र, काही झाले तरी ते एक अनुभवी व ज्येष्ठ नेते होते. त्यांनी राष्ट्रवादीशी संलग्न राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पक्षातील काही लोकांनी अगदी दुसावट्याची वागणूक देवू पाहिली. ते पक्षात मिसळण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, त्यांना नेहमी एकटे पाडण्याचा प्रयत्न झाला. खरंतर इतका अभ्यासू माणूस जवळ केला असता तर आज तालुक्यात राष्ट्रवादीचा चेहरा वेगळा असता. पांडे यांना योग्यते सहकार्य झाले नाही म्हणून त्यांनी चारदोन ठिकाणी स्वत:ची नाराजी बोलुन दाखविली. पिंपळगाव खांड व अॅट्रॉसिटी विरोधात झालेल्या आंदोलनात त्यांनी जे काही ताशेरे ओढले त्याची काही व्यक्तींनी जोरदार चर्चा केली आणि पांडे हे राष्ट्रवादीत येणार नाही. यासाठी अनेकांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र, विचारी व स्वाभिमानी व्यक्ती कधी शांत बसत नसतो. त्यांनी सन्मानाने आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
तर मदन पथवे यांच्या पक्षबदलाने राष्ट्रवादीत फार उलटसुलट चर्चा सुरू आहे. पक्षाची विचारधारा आणि आज पक्षात झालेले वातावरण हे त्यांना न पटण्यासारखे होते. त्यामुळे, त्यांनी असा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे ते राष्ट्रवादीच्या प्रवेश कार्यकारणीवर होते. त्यांनी अशा पद्धतीने राजिनामा देत पक्ष सोडणे म्हणजे स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. पक्षात ज्यांना बुद्धीपेक्षा जास्त वजनदार पदे मिळाले आहेत त्यांच्याकडून कामाची अपेक्षा आहे. मात्र, तालुक्यात राष्ट्रवादी म्हणून जी काही चळवळ व कामे होणे अपेक्षित होती. ती काहीच होताना दिसत नाही. खरंतर डॉ. किरण लहामटे हे आमदार झाल्यापासून अगदी पायाला भिंगरी बांधुन पळताना दिसता. त्यांच्याप्रमाणे प्रत्येकाने कामे केली, जनतेत उतरले तर त्याचा पक्षाला फायदा होईल. मात्र, आज जे काही दिसते आहे. ते चित्र फार विचित्र असून पक्षाला ते घातक ठरणार आहे. खरंतर गावागावात कार्यकर्ता आहे. मात्र, आज काही ठिकाणी ग्रामपंचायतींना उमेदवार उभे करण्यासाठी माणसे नाहीत. इतकी वाईट परिस्थिती दिसून येत आहे. आज मदन पथवे यांच्या रुपाने पक्षाला गळती लागली आहे. ती थांबवायची असेल तर ज्येष्ठांनी (ज्यांना जनता मानते त्यांनी) सक्रिय होणे गरजेचे आहे.
एकंदर तालुक्यात आता राजकीय गणिते बदलु लागली आहेत. काल अकोल्यात शांत असणारी काँग्रेस आज पुन्हा नव्याने उभारी घेऊन आली आहे. नवले यांच्या रुपाने तालुक्यात पुन्हा पक्ष निवडणुकांच्या आखाड्यात उतरेल. आज जे नगराध्यक्ष होते त्यांचा देखील येणार्या काही दिवसात काँग्रेसमध्ये प्रवेश होईल. असे अनेक नगरसेवक आहेत जे भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवतील. त्यामुळे, उद्याची नगरपंचायत आणि कारखाना यात काँग्रेसला चांगले यश येण्याची शक्यता आहे. ही सर्व ताकद राष्ट्रवादीने हाताने गमविल्याची देखील चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. आज तालुक्यातील मिनानाथ पांडे, रमेश पवार (सरपंच सावरगाव पाठ) रमेश जगताप, भास्कर दराडे, मदन पथवे, एकनाथ सहाणे (मा. सरपंच, देवठाण) यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उद्या पक्षात आणखी बडे नेते देखील येण्याची शक्यता आहे. इतकेच काय आज एक भाऊ आले उद्या दुसरे भाऊ देखील काँग्रेसमध्ये दाखल झाले तर आश्चर्य वाटू देऊ नका.!