अकोल्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार व संगमनेराचे मुकुंद देशमुख या दोघांची तडकाफडकी बदली!
सार्वभौम (संगमनेर) :- ज्या पोलीस ठाण्यात लाचलुचपतचा छापा पडेल त्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्याची थेट नियंत्रण कक्षेत बदली करण्यात यावी असे आदेश पोलीस महानिरीक्षक यांनी काढले होते. त्याला अनुसरुन नाशिक ग्रामीण येथील काही अधिकार्यांनी कंट्रोलला जमा व्हावे लागले होते. त्यानंतर नगरच्या पोलीस अधिक्षकांनी देखील तो पायंडा निर्भिडपडे पुढे चालु ठेवल्याचे पहायला मिळत आहे. कारण, गेल्या दोन दिवसांपुर्वी संगमनेर पोलीस ठाण्यात एक छापा पडला होता तर त्यापाठोपाठ काल अकोले पोलीस ठाण्यात छापा पडला. त्यामुळे नियमानुसार संगमनेरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार या दोघांनाही पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी नियंत्रण कक्षाचे निमंत्रण पाठविले आहे. त्यामुळे, पोलीस दलात आता एकच खळबळ उडाली आहे. खरंतर रोखठोक सार्वभौमने परवा लिहीले होते. की, ज्या पोलीस ठाण्यात ट्रॅप झाला तेथील अधिकारी नियंत्रण कक्षेत जमा होणार का? अगदी तो अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. निर्भिड पोलीस अधिक्षकांनी आपल्या तत्वांशी ठाम राहत आज आदेश काढले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवार दि. 12 डिसेंबर रोजी बापुसाहेब देशमुख या पोलीस नाईकाने 1 हजार रुपयांची लाच घेतली होती. त्याचा ठपका ठेवत संगमनेरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना नियंत्रण कक्षेत हजर होण्याचे आदेश आले आहेत. खरंतर देशमुख यांनी संगमनेरात कर्मचार्यांना कडक शिस्त लावण्याचे काम केले होते. आल्याआल्या त्यांच्या नावाची मोठी दहशत निर्माण झाली होती. त्यांनी गुटखा बहाद्दरांना पळता भुई थोडी केली होती. मात्र, त्यानंतर त्यांच्याकडून फारशी काही कारवाई झाली नाही. असे असले तरी त्यांनी पोलीस ठाण्यात एक शिस्तीचे वातावरण निर्माण केले होते. त्यामुळे, काही कर्मचारी त्यांच्यावर नाराज असेल तरी ड्युटी म्हणजे ड्युटी अशी अनेकांना सवल लागून गेली होती.
तर दुसरीकडे तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय परमार यांचे नाशिब फुटकळ म्हणावे लागले. तसेतर त्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अगदी सिंघम प्रमाणे यशस्वी कामगिरी केली होती. मात्र, त्यांच्या बदलीच्या काळात माशी शिंकली आणि पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी यांच्यावर 1 लाखांचा ट्रॅप झाला. त्यामुळे, परमार यांच्या संकटात पहिली भर पडली. खरंतर त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखसाठी मोठा प्रयत्न केला होता. मात्र, एका ट्रॅपमुळे त्यांना बराच काळ नियंत्रण कक्षेत बसावे लागले होते. या दरम्यान, अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे हा थोडेसे वादग्रस्त ठरल्यामुळे त्या ठिकाणी अभय परमार यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, त्यांना तेथे हजर होऊन एक महिना होतो कोठे नाहीतर त्यांना वाघ यांच्या ट्रॅपमुळे पुन्हा नियंत्रण कक्षेत जावे लागले आहे. आता या दोघांचे आदेश पुढील आदेश होईपर्यंत स्थगित असून कोणत्याही क्षणाला पुढील आदेशाने अकोले व संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नवे अधिकारी येण्याची शक्यता आहे.