धक्कादायक.! अकोल्याच्या तरूणाचा संगमनेरात भोकसून खून, एकावर गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
अकोले तालुक्यातील धामनगाव आवारी येथून संगमनेर तालुक्यातील धंदरफळ येथे मजुरीसाठी गेलेल्या तरुणाचा धारधार हत्याराने भोकसून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अगदी किरकोळ कारणास्तव दोघा तरुणांमध्ये वाद झाले आणि एकाने त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करत धारधार हत्यार पोटात भोकसले होते. या वादाप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. शुक्रवार दि. 11 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता घडलेल्या घटनेनंतर मयत भिमा बाजीराव डोके (वय 22, मुळ रा. धामनगाव आवारी) यास नाशिक येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. सोमवार दि. 14 डिसेंबर रोजी तो मयत झाल्याचे नाशिक डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अजय मलखान तामचिकर (रा. धांदरफळ, ता. संगमनेर) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवार दि. 11 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता भिमा बाजीराव डोके व अजय मलखान तामचिकर यांच्यात किरकोळ वाद झाले होते. त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची सुरू असताना काहींनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते यशस्वी ठरला नाही. त्यानंतर दोघे एकमेकांना भिडले असता तामचिकर याने डाके यास लाथाबुक्यांनी मारहाण करीत शिवीगाळ दमदाटी केली. त्याचा राग अनावर झाल्यानंतर त्याने त्याच्याकडे असणारे धारधार शस्त्र काढून डाके यांच्या पोटात खुपसले. त्यानंतर डाके हा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्यात नाशिक येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. डाके यांच्या पोटातील जखम गंभीर स्वरुपाची असल्यामुळे डॉक्टर कसोशीने प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना यश आले नाही.
दरम्यान, ही मारामारी झाल्यानंतर संगमनेर पोलीस ठाण्यात एक अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे जीव जाईल इतका प्राणघातक हल्ला झाल्यानंतर देखील पोलीस ठाण्यात केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद होते. ही फार मोठी शोकांतीका आहे. मात्र, जेव्हा हा तरुण मयत झाला त्यानंतर त्याने दाखल केलेल्या अदखलपात्र गुन्ह्याचा तपास करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेऊन त्यात वाढीव कलम (302) लावण्यात आले. यात डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार डाके यांच्या पोटात हत्यार मारल्यामुळे आतील आतड्यांना गंभीर जखमा होऊन त्यांना होल पडले आहेत. त्यामुळे या तरूणाचा मृत्यु झाला आहे. त्यानुसार सीआरपीसी 155 (2) अन्वये न्यायालयाच्या परवानगीने आता पुढील तपास सुरू झाला आहे. सदर गुन्ह्याचा तपास स्वत: पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार करीत आहेत.