अकोले पोलीस ठाण्याचा वाघ लाचलुचपतच्या पिंजर्यात, 50 हजारांची मागणी, 10 हजार घेताना रंगेहात पकडले.!
सार्वभौम (अकोले) :
अकोले शहराच्या लागत असणार्या नवलेवाडी परिसरातील जमिनीचा वाद मध्यस्ती करुन सोडविण्यासाठी 10 हजारांची लाच घेताना अकोले शहरातील पोलीस ठाण्यात संतोष पुंजा वाघ याच्यावर नशिक लाचलुचपत शाखेचा छापा पडला आहे. ही कारवाई सोमवार दि. 14 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी वाघ यास ताब्यात घेतल्यानंतर अकोले पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. ही छापा पडल्यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तर जे मलिदा जमा करतात ते उजळ माथ्याने फिरतात आणि ते छुप्या पद्धतीने चिरिमिरी जमा करतात त्यांच्यावर छापे होतात अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून अकोले शहराच्या जवळ असणार्या नवलेवाडी परिसरात एका जमिनीचा वाद सुरू होता. नवले आणि नाईकवाडी यांच्यात कोणत्याही प्रकारचा सलोखा न होऊ शकल्याने त्यांच्या वाद थेट पोलीस ठाण्यात गेला होता. अर्ज दाखल झाल्यानंतर त्यावर काही दिवसांपासून चौकशी सुरू होती. यात पोलीस नाईक संतोष वाघ यांनी मध्य काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर हा वाद मिटविण्यासाठी त्यांनी एका व्यक्तीकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. ती देण्याचे ठरले असता त्यातील 10 हजार रुपये आज देण्याचे ठरले होते. त्यानंतर तक्रारदाराने हा प्रकार नाशिकच्या लाचलुचपत विभागाला कळविला होता. त्यांनी काल संगमनेर तर आज अकोले गाठून वाघ यास आपल्या जाळ्यात घेतले. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
खरंतर गेल्या महिन्यात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी याच्यावर लाचलुचपतची कारवाई झाली होती. त्यानंतर अगदी कालच (रविवार दि.13 नोव्हेंबर) संगमनेर शहरात बापुसाहेब देशमुख या पोलीस नाईकावर कारवाई झाली आहे. असे असताना देखील लगेच शेजारील अकोले तालुक्यात लाचलुचपत विभागाची कारवाई व्हावी! या ईतकी शोकांतीका दुसरी कोणती असू शकते? खरंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांच्या काळात भल्याभले गुन्हे उघड झाले. तेव्हा कधी लाचलुचपतचा छापा पडला नाही. मात्र, त्यांच्या निर्भिड आणि निष्पक्ष स्वभावामुळे त्यांना पोलीस उपाधिक्षक रोषण पंडीत यांच्याप्रमाणे मुख्यालयाशी संलग्न व्हावे लागले. म्हणजे जोंधळे यांच्या काळात वाघ हे त्यांचे राईटर होते. तर त्यांच्या काही संशयित गोष्टींमुळे त्यांना जोंधळे यांनी अगदी काही काळापुर्वी राईटर म्हणून काढले होते. त्यानंतर वाघ हे कारवाईसाठी रस्त्यावर दिसत होते.
दरम्यान अभय परमार यांना तेथे हजर होऊन अद्याप 1 महिना देखील झाला नव्हता. ते सेट होतात कोठे नाहीतर पोलीस कर्मचार्यांनी आपले गुण दाखवायला सुरूवात केली आहे. खरंतर साहेबांच्या अपरोक्त काही कर्मचारी मोठमोठ्या तडजोडी करु पाहत आहेत. आता अकोले शहरात एकूण केवळ 34 ते 35 कर्मचारी आहेत. त्यापैकी पाच-सहा सुट्टीवर असतात, दोन वाहन चालक आहेत, तर कोणी सिकमध्ये आहे. म्हणजे केवळ 15 ते 20 लोकांच्या भरवशावर दोन पोलीस अधिकारी मोठी कसरत करताना दिसत आहे. विशेेष म्हणजे गेल्या महिन्यात तीन पोलीस निलंबित, या महिन्यात एक निलंबित तर आता एक लाचलुचपतच्या जाळ्यात त्यामुळे 34 पैकी पाच गेले. उरले 29, आता तुम्हीच सांगा 94 गावांचा कारभार 29 कर्मचार्यांवर चालवायचा आहे. हे शक्य तरी आहे का? त्यामुळे, पोलीस अधिक्षकांनी किमाण येथे आता 15 कर्मचारी आणि आणखी दोन अधिकारी देणे अपेक्षित आहे.
यात एक गोष्ट नमुद कराविशी वाटते की, जिल्ह्याचे क्षेत्रफळ आणि पोलीसबळ यात फार मोठी तफावत आहे. त्यामुळे, पोलीस ठाण्यांमध्ये अधिकारी व कर्मचार्यांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे, कलम 326 सारख्या आणि अन्य नाजुक गुन्ह्यांचा तपास देखील पोलीस कर्मचारी करताना दिसतात. तर एका पोलीस कर्मचार्याकडे किमान 40 ते 50 गुन्हे तपासासाठी आहेत. तर एका गुन्ह्याचे दोषारोपपत्र तयार करण्यासाठी शंभरच्या आसपास कागदांची गरज पडते. त्यामुळे, पोलीस किती वेळा घर घालुन धंदा करणार आहे? त्यामुळे, त्यांना पोलीस कल्याण निधी किंवा अन्य ठिकाणाहून तरतुद करून दोषारोपत्र तयार करणे अथवा तपास करण्यासाठी योग्यतो निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. कारण, बहुतांशी जे पोलीस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात आडकतात त्या रकमा पाहिल्या तर त्यांची रक्कम फार मोठी नसते असे लक्षात येते. त्यामुळे, काही अपवाद वगळले तर अगदी चांगला स्वभाव व सरळ राहणीमान असणार्या कर्मचार्यांना लाचलुचपतचा सामना करावा लागतो आहे.
- महेश जेजुरकर (शहर प्रतिनिधी)