पीपी किट घालुन अकोल्यात दरोडा.! पोलीस निरीक्षक अभय परमार यांना चोरट्यांची सलामी.!

सार्वभौम (अकोले) :- 

                       अकोले शहराच्या मध्यवर्ती भागात असणारी स्टार मोबाईल शॉपी चोरट्यांनी फोडून एक गोणी भरुन मोबाईल, हेडफोन, ब्लुटूथ, पेन्ड्राइव्ह असा 2 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. ही घटना बुधवार दि. 9 ते गुरूवारी दि. 10 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुपारास घडली. याप्रकरणी समीर मोहंमद सय्यद (रा. बाजारपेठ, ता. अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा कशा पद्धतीने घडला ही बाब सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यामुळे, आता नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक अभय परमार यांना आता या चोरट्यांनी एक प्रकारची सलामीच दिली आहे. पहाटेच्या सुमारास धाडशी चोरी करणार्‍या या दरोडेखोरांना पोलीस पकडतात की नाही? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले शहरात बस स्थानकाच्या अगदी काही अंतरावर समीर सय्यद यांची स्टार मोबाईल शॉपी आहे. त्यांनी बुधवारी 8:30 वाजता नियमित आपले दुकान बंद केले होते. जाताना त्यांच्या शटरला सुस्थितीत टाळे देखील लावले होते. आपल्या दुकानात रात्री चोरी होईल याची शंका देखील त्यांच्या मनात आली नसेल. तरी देखील त्यांनी शक्यती काळजी घेतली होती. मात्र, चोरट्यांनी बरोबर त्यांच्या दुकानावर पुर्वीपासून वॉच ठेवलेला असणार! चोरीचे नियोजन झाल्यानंतर त्यांनी रात्रीचा वेळ साधून बरोबर डाव साधला आणि तिघांना मोबाईल शॉपीचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत अडिच लाख रुपयांच्या मुद्देमालावर ताव मारला.

दरम्यान, या प्रकरणात तुर्तास घरफोडीचा (कलम 457,380) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, वास्तव पाहता ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की, येथे तीन आरोपी आत चोरी करण्यासाठी गेले असून किमान अन्य दोघे तरी यांच्या मदतीला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे, ही केवळ चोरी अथवा घरफोडी नव्हे तर हा एक प्रकारचा दरोडाच आहे. यात जर पोलिसांनी सखोल व तत्काळ तपास केला तर या घटनेतील वास्तव लवकर उघड होण्यास मदत होईल. त्यामुळे, जर यात पाच पेक्षा जास्त आरोपींची टोळी मिळून आली तर पुढे गुन्ह्यात वाढीव कलम लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता जे काही समोर येईल ते तपासाअंती सर्वांना आवाक करणारे असेल.

खरंतर अकोले शहरात नाईट पेट्रेलिंग, सेक्टर पेट्रोलिंग, बंदोबस्त यांची नित्तांत गरज आहे. मात्र, दुर्दैवाने येथे 755 इतका क्राईम रेट असताना देखील पोलीस अधिक्षक अकोले तालुक्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. इतकेच काय? आमदार किरण लहामटे यांनी पोलीस ठाण्याकडे एकदा तरी डोकावून पाहिले पाहिजे. कारण, येथे केवळ एक पोलीस निरीक्षक व एक पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर 94 गावांचा कारभार सुरू आहे. तर केवळ 34 कर्मचारी त्यात दोन वाहन चालक, कोणी गार्ड, कोणी सुट्टीवर, कोणी सिकमध्ये, आजवर चौघे निलंबित, कोणी साप्ताहीक सुट्टीवर.! तुम्हीच सांगा! हे पोलीस ठाणे चालवायचे तरी कसे? एक पोलीस उपनिरीक्षक त्यांच्याकडे पोतेभर तपास.! काही कर्मचारी तर निकामीच आहेत? मग या दोन अधिकार्‍यांनी पोलिसिंग करायची की पेट्रोलिंग, तपास करायचे की पोलीस ठाणे संभाळायचे? त्यामुळे येेथे दोन अधिकारी आणि काही कर्मचारी यांची पुर्तता होणे गरजेचे आहे. अन्यथा अशा प्रकारच्या चोर्‍या येथे घडतच राहतील.