धनगंगा पतसंस्थेचे आख्खे धन मॅनेजरनेच लुटले.! पुर्वी कोटी, आता पुन्हा 50 लाख लुबाडले.! त्याची जमीन अकोल्यात.!

सार्वभौम (संगमनेर) :- 

                  संगमनेर शहरातील घुलेवाडी येथे धनगंगा पतसंस्थेचे लाखो व कोट्यावधी रुपये चक्क मॅनेजरनेच आपल्या घशास घातल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा उघड झाला आहे. सन 2017 मध्ये कोट्यावधी तर सन 2018-19 मध्ये लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी लेखापरिक्षक अजय केशव राऊत (रा. निमज, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सचिन बजरंग कवडे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अजय राऊत हे लेखापाल असून त्यांच्याकडे सन 2017 साली धनगंगा स्वयंसहाय्यता ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे लेखापरिक्षण करण्याचा जबाबदारी शासनाने टाकली होती. राऊत यांनी पारर्शी काम सुरू केले असता त्यांच्या लक्षात आले की, येथे कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व अपहार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात 420, 468 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, हा अपहार कोटी रुपयांच्यापेक्षा मोठा असल्यामुळे तो नगर येथे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर यात चेअरमन, संचालक मंडळासह सर्वांना आरोपी करण्यात आले होते. तेव्हा सचिन बजरंग कवडे यास अटक करण्यात आली होती. आज तब्बल तीन वर्षे उलटून गेले तरी कवडे याला जामीन मिळालेला नाही. त्याने पैसे खाल्ले खरे. मात्र, त्याची शिक्षा तो आज तागायत भोगत आहे.

दरम्यान, हा प्रकार येथेच थांबला नाही. तर राऊत यांनी सन 2018-19 चे रेकॉर्ड तपासले असता त्यात पुन्हा सावळा गोंधळ असल्याचे दिसून आले. यात चेअरमन रंगनाथ काशिनाथ काशिद यांनी दिलेल्या तोंडी जबाबात म्हटले आहे की, मॅनेजर कवडे याने त्याच्या मालकीची पारेगाव बु (ता. संगमनेर) येथील जमिनीचे गहाणखत करुन कर्ज घेतलेली कर्जाचा बोगस निल दाखला देऊन संस्थेची फसवणुक करुन मालमत्तेची विक्री केलेली आहे. याबाबत पडताळणी केली असता लक्षात आले की, सचिन कवडे याने पत्नीच्या नावे 40 लाख रूपयांचे कर्ज घेतलेले असताना कर्जाची परतफेड न करता कर्जाचा बोगस निल दाखला तयार करुन त्या आधारे मालमत्ता महिला ज्योती तुकाराम हुलवळे (रा. पिंपळदरी ता. अकोले) यांना विक्री केली आहे. हे 40 लाख रूपयांचे कर्ज कोणत्याही संचालक अथवा चेअरमन यांना विश्वासात न घेता दि. 2 एप्रिल 2016 साली रोख रक्कम परस्पर घेतली. अशा अनेक ठिकाणी अफरातफर केल्याचे पुरावे समोर आले आहेत. पुर्वी कोट्यावधी रुपये तर नंतर आता 48 लाख 60 हजार 287 रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, ग्रामीण भागात काही राजकीय लोक मोठ्या गोंडस नावाने पतसंस्था खोलतात. मोठे होण्यासाठी तेथील मोठ्या रकमा आपल्या स्वत:च्या सार्थासाठी वापरतात. एक वेळ अशी येते की, कुंपनच शेत खाऊ लागतात. तेव्हा घशात घातलेल्या रकमांचा ताळमेळ लागत नाही. नंतर डोईजड झालेले आकडे पाहून मी नाही केले अशी री ओढत संचालक मंडळ नकाराचा पाढा म्हणते. मात्र, शेतकरी, मजूर, कामगार, व्यापारी हे आपल्या घामाचे पैसे मोठ्या आशेने तेथे ठेवतात आणि नंतर घोटाळे, अपहार, फसवणुका झाल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळु सरकते. त्यामुळे, पैशांची गुंतवणुक करताना सावधानता बाळगली पाहिजे. गेल्या काही दिवसांपुर्वी अकोले तालुक्यातील गणोरे येथील एका पतसंस्थेत देखील असाच घोटाळा झाला. तेथील मॅनेजरने देखील आख्खी पतसंस्था स्वत:च्या घशात घातली आणि आजाही त्यात ज्या शेतकार्‍यांनी पैसे ठेवले ते रडत आहेत. अशा व्यक्तींना खरोखर जामीन न होता, या केसेस अंडरट्रायल चालल्या पाहिजे असे अनेकांना वाटते.