राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची गळा कापून हत्या.!
सार्वभौम (अ.नगर) :-
नगर शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी महिला रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेवगाव घाटात हत्या करण्यात आली आहे. केवळ वाहनाला कट मारला म्हणून अज्ञात व्यक्तींना त्यांची गाडी आडवून त्यांच्यावर धारधार हत्याराने वार केले. यात त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा प्रकार सोमवार दि. 30 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी नगर पोलीस व सुपा पोलिसांनी तपास सुरू केला असून ही सुपारी देऊन हत्या घडवून आणली आहे की, कोणी खून केला आहे असे प्रश्न आता समोर येऊ लागले आहे. याबाबत मात्र, अद्याप पोलीस प्रशासनाने तपास सुरू असल्याची प्रतिक्रीया दिली आहे. या हत्येमुळे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सखोल व तत्काळ गुन्ह्याचा उलगडा करण्याची मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रेखा जरे या पुण्याला त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. पुण्याहून येत असताना त्या सुपा पोलीस ठाण्याच्या हाद्दीत असणारा जातेगाव घाट पार करीत असताना अचानक अज्ञात व्यक्ती आल्या व त्यांनी त्यांच्या गाडीला कट मारण्याचा बहाणा करुन विचारणा केली. त्यावर जरे त्यांना म्हणाल्या की, तुला कळते का? तू कोणाला बोलतो आहे. आम्ही धक्का वैगरे काही दिला नाही. यात त्यांची बाचाबाची झाली. जरे यांनी गाडीची काच खाली घेताच एका आरोपीने यांच्यावर गळ्यावर धारधार शस्त्राने थेट हल्ला केला. तर त्यांनी गाडीचे फोटो काढून नंतर ते हल्लेखोर पसार झाले. मात्र, जरे यांच्यासोबत गाडीत असणार्या दोन महिला व त्यांचा मुलगा हे घाबरुन गेले. मात्र, तरी देखील त्यांनी आरोपींचे फोटो काढले नंतर जखमी आवस्थेत त्यांनी जरे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोवर फार उशिर झाला होता.
दरम्यान जरे यांच्यावर झालेला हल्ला हा प्लॅनिंगपुर्वक होता की काय? असा प्रश्न पुढे येऊ लागल आहे. जर ते रस्तालुट करणारे होते तर त्यांनी गाडीतील कोणाला लुटले का नाही? जर ते दरोडेखोर असते तर त्यांनी लुटण्यासारखी कोणतीही कृती केली नाही. तसेच जरी गाडीला धक्का लागला म्हणून थेट शस्त्रास्त्रे काढून वार करण्याइतकी मोगलाई नगर जिल्ह्यात तरी माजली नाही. त्यामुळे, एकंदर विचार करता हा नियोजपुर्वक कट तर नव्हे ना? असा प्रश्न सहज समोर उभा राहतो. नेमकी रेखाताई यांच्यावरच का हल्ला झाला? वाहनातील बाकी लोक सुरक्षित राहिले. त्यामुळे देखील काही प्रश्न अनुत्तरीत राहतात. एकंदर आता पोलीस या घटनेचा छडा लावतीलच, मात्र जरे यांच्या हत्येचे गुढ आज तागायत गुलदस्त्यात आहे.
खरंतर, रेखा जरे यांचे सामाजिक वलय चांगले होते. तर त्या स्वत: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा होत्या, त्याच बरोबर त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. त्यांची हत्या म्हणजे एक राजकीय हेतू तर नसावी ना? अशी देखील उलट सुलट चर्चा सुरू आहे. जरे यांची राजकीय व सामाजिक कार्यकीर्द चांगली राहिली आहे. त्यामुळे, त्या नेहमी चर्चेत होत्या. एकंदर या सर्व प्रकारांची शहनिशा आता पोलीस करतीलच, मात्र अशा पद्धतीने एक धडाडीच्या महिलेचा अचानक खून होणे ही फार मोठी शोकांतीका आहे. हा खून का व कोणी केला याचे कारण येणार्या 24 तासात शोधणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेपुढे फार मोठे आव्हान असणार आहे.