अखेर पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांची बदली, अभय परमार अकोल्याचे पोलीस निरीक्षक, क्लिप व्हायरल प्रकरणी पोलीस निलंबित.!

सार्वभौम (अकोले) :- 

                 अकोले पोलीस ठाण्यात वारंवार चर्चेत आणि वादग्रस्त पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांची अखेर 14 महिन्यानंतर नियंत्रण कक्ष येथे बदली करण्यात आली आहे. विद्यमान आमदार यांच्याशी होणार्‍या वारंवार मतभेदामुळे त्यांना या बदलीला सामोरे जावे लागले आहे. तर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तब्बल अडिच वर्षे यशस्वी कार्यकाळ पार पाडणारे धडाडीचे पोलीस निरीक्षक अभय परभार यांची अकोले पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. अचानक झालेल्या या बदलीमुळे अकोलेकरांना आश्चर्य वाटले असून पोलीस खात्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांनी दि. 7 सप्टेंबर 2019 रोजी अकोले पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारला होता. त्यानंतर त्यांच्या कार्यकाळात 307 (खुनाचा प्रयत्न) 376(अत्याचार), 354 (छेडछाड), 144 (दंगे) 302 (खून), 326 (गंभीर दुखापती) यांच्यासह अनेक अदखलमात्र गुन्ह्यांची नोंद झाली होती. यातील विशेष असे की, एक वर्षाचा सीआर (क्राईम रेट) 742 पर्यंत जाऊन पोहचला होता. तर एका महिन्यात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण 65 पर्यंत जाऊन पोहचले होते. अर्थात ही अकडेवारी पाहिली तर जिल्ह्यातील भल्याभल्या पोलीस ठाण्यांची नाही. त्यामुळे येथे गुन्हे घडण्याचे प्रमाण अधिक असले तरी ते दडपण्याचे प्रमाण फार कमी होते.

एकंदर विचार करता, जोंधळे यांचा स्वभाव फार तापड होता. त्यांच्यावर कोणी दबाव आणला तरी ते कधी कोणाच्या दबावाला बळी पडत नव्हते. जे आले ते देखल झाले पाहिजे अशी त्यांची धारणा होती. मात्र, खोट्या गुन्ह्यांना त्यांच्याकडे अभय नव्हता. त्यामुळे ते नेहमी वादग्रस्त ठरत होते. तर दुसरीकडे या पोलीस ठाण्यात फार मोठमोठे गुन्हे घडले, त्यात खानापूर सामुहिक बलात्कार, टाकळी परिसरात छेडछाड, चैतन्यपुरचा खून अशा प्रत्येक गुन्ह्यात त्यांनी स्वत:चा कस लावून केवळ एका पोलीस उपनिरीक्षकच्या जोरावर पोलीस ठाणे चालवून सर्व गुन्ह्यांचा तपास केला. तर एकही गुन्हा कायम तपासावर ठेवला नाही. त्यामुळे, एकीकडे साथ न देणारे पोलीस कर्मचारी, कमी मनुष्यबळ आणि त्यांचा सरळ रेषेतील स्वभाव यामुळे त्यांची मोठी त्रिधातिरपिट होत होती. तरी देखील त्यांनी तालुक्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही.

दरम्यान, डॉ. किरण लहामटे व जोंधळे यांचे कधीच टिपन बसले नाही. तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी आमदारांनी स्वत: अमरण उपोषण पुकारले होते. तर जोंधळे यांच्या बदलीसाठी आमदारांनी पोलीस अधिक्षकांचे अनेकदा डोके खाल्ले होते. त्यामुळे, आज अखेर या बदलीचा मुुहुर्त झाला आहे. मात्र, या दरम्यान फार काही हलचाली समोर आल्या. त्यातून डॉ. किरण लहामटे यांचे स्वीय सहायक यांनी जोंधळे यांची बदली करण्यासाठी पाठपुरावा करु नये यासाठी त्यांच्यावर काही पत्रकारांनी टिकेची झोड उठविली. तर त्यांनी दिवाळीला खर्ची दिली नाही हा देखील रोष त्या निमित्ताने बाहेर आला. अकोल्यातील पत्रकारीता कशी आहे. हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. मनाजोगे झाले नाही म्हणजे एखाद्याला नंगा करोस्तोवर त्याचे लोचके तोडून चिरफाड करायची. हे आता आमदारांच्या देखील अंगवळणी पडले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या स्वीय सहायकांची बाजू घेतली ही सर्वाच समझदारीची बाजू घेतली. कारण, कोणी काहीही क्लिपा तयार करुन एकमेकांची नावे घेतील. मग ते दोषी असे म्हटले तरी उद्या मोदी साहेबांंची क्लिप तालुक्यातील पत्रकारांनी वाजवून पंतप्रधानांना जाब विचारला तर नवल वाटायला नको.!

आज पोलीस निरीक्षक अभय परमार हे अकोले पोलीस ठाण्याचा  पदभार स्विकारण्यासाठी मार्गस्त झाले आहेत. परमार यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात काम करताना स्वत:च्या कर्तुत्वाचा एक नवा ठसा उमठविला आहे. खरंतर परमार यांचे नाव पहिल्यापासून एलसीबीसाठी चर्चेत होते. मात्र, ज्याचा वशीला तोच काशीला. त्यामुळे दादांकडून आलेले नाव टाळे खात्याला शक्य नव्हते असे बोलेले जात आहे. अखेर त्यांची अकोले पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. परमार हे शिस्त व कडक स्वभावाचे असून त्यांच्यासमोर गेलेला व्यक्ती विचारपुर्वक जातो. कारण, त्यांचे समुपदेशन अतिशय कठोर शब्दाचे आहे. त्यामुळे तेथेच खोटारडा माणूस निम्मा वास्तवात येतो. येणार्‍या काळात परमार यांच्याकडून अकोलेकरांना प्रचंड अपेक्षा आहेत. ते अकोले पोलीस ठाण्यात एक यादगार टर्म पुर्ण करून जातील अशी अनेकांना खात्री आहे.

तर अवैध वाळु वाहतूक प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण बाबासाहेब केकान यांनी लाच मागितल्याचा व्हिडिओ पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे काही ग्रामस्थांनी दिला होता. त्याची चौकशी करण्याचे आदेश एसपींनी पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांना दिले होते. त्यात तत्थ्य आढळून आल्यानंतर केकान यांना पाटील यांनी निलंबित केल्याची माहिती हाती आली आहे. हा प्रकार दि. 12 ऑक्टोबर 2020 रोजी घडला होता.