ज्यांच्यावर गुटखा प्रकरणात आरोप, त्यांनीच केली गुटख्यावर मोठी कारवाई.! लाखोंच्या मुद्देमालासह आरोपी अटक.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरातील अभंग मळा येथे एका गोडाऊनमध्ये पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांच्या पथकाने शनिवार दि. 28 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यात 1 लाख 6 हजार 346 रुपयांचा मुद्देमाला हस्तगत केला आहे. यात संजय बाबुलाल लुंकड (वय 45, रा. अभंगमळा, ता. संगमनेर) यास अटक करण्यात आली आहे. तर याप्रकरणी साईनाथ भानुदास तळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध धंद्यावाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तर ज्या अधिकार्याने या गुटखा गोडावुनवर छापा टाकला त्यांच्यावर गुटखा प्रकरणी आरोप झालेला आहे. त्यामुळे, त्यांनी केलेल्या कारवाईमुळे त्यांच्या धडाकेबाज कारवाईला अनेकांनी सॅल्युट केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर विभागीय पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांना अभंग मळा परिसरात एका गोडाऊनमध्ये गुटखा साठवून ठेवलेला असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी मिळालेल्या माहितीची खात्री केल्यानंतर एक विशेष पथक स्थापन केले. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांसह या पथकाने थेट घटनास्थळ गाठले. संबंधित ठिकाणी अचानक छापा टकला असता संजय बाबुलाल लुंकडे याच्या घराच्या शेजारी असणार्या गोडाऊनमध्ये काही विषारी पदार्थ व नशिले द्रव, सुपार्या, मसाले, असे गुटख्याची पाकीटे मिळून आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचानामा केला असता तेथे दिड हजार रुपयांचा पान मसाला, 16 हजार रुपयांचा टोबॅको गोल्डन पाकीट, 22 हजार रपयांचे हिरा कंपनीचा पान मसाला, 12 हजार रुपयांचा रॉयल पाकीटे, 19 हजार रुपयांचे व्हि-1 कंपनीचे निळे पाकीटे, 18 हजार रुपयांचे विमल पान मसाला 1 हजार 800 रुपयांचे गोवा पान मसाला, 2 हजारांचे विमल पान मसाला असा 1 लाख 6 हजार 346 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, संगमनेर तालुक्यात गांजा, गुटखा, बनावट दारू आणि देहविक्री व्यावसाय सध्या सुरू आहे. संगमनेर शहरात सध्या बहुतांशी धंदे बंद असले तरी येण्यार्या अगदी काही दिवसात हेच व्यावसाय अगदी दुपटीने चालणार असल्याची चर्चा आता चांगलीच रंगली आहे. पहिल्यांदा अवैध धंद्याना कोमता घालायचे आणि दाम दुगना करुन जोमात आणायचे अशी काही अधिकार्यांची पद्धत असल्याची चर्चा सुरू आहे. तर आता धंद्यावाल्यांना निरोप धडकू लागले आहेत की, चालवायचे असेल तर दुप्पट मलिदा मोजावा लागेल. त्यामुळे, एकीकडे अर्थपुर्ण तडजोड व दुसरीकडे कारवाई. असा प्रकार पहायला मिळाला तर जसे महसूल कारवाईत मार खाते तीच वेळ खाकीवर येऊ नये म्हणजे झालं अशी वाच्चता खात्यातूनच बाहेर पडू लागली आहे.