नवरदेवाच्या बहिनीचे भर लग्नातून दागिने चोरले.! लाख रुपयांचा भुर्दंड, अकोल्याचे वर्‍हाड, संगमनेरचे लॉन्स.!

सार्वभौम (संगमनेर) :- 

                 अकोले तालुक्यातील एक वर्‍हाड संगमनेर येथील एका लॉन्सवर गेले असता तेथे नवरदेवाच्या बहिनीची पर्स एका लहान मुलाने मोठ्या शातीर पद्धतीने लंपास करुन पोबारा केला. यात सोने, चांदी, रोख रक्कम व मोबाईल असा 1 लाख 3 हजार रुपयांचे मुद्देमाल चोरी गेला आहे. ही घटना संगमनेर शहराच्या जवळच असणार्‍या विघ्नहर्ता लॉन्स येथे शुक्रवार दि. 27 रोजी 12 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी निवृत्ती चिमाजी शेणकर (रा. अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सीसीटीव्हीत पाहिल्यानंतर समोर आले की, एक लहान मुलाने हा उद्योग केल्याचे समोर आले आहे.

यबाबत सविस्तर माहिती अशी की, निवृत्ती शेणकर याचे सुपुत्र हरेश्वर शेणकर यांचा शुक्रवार दि. 27 रोजी संगमनेर शहराच्या जवळ असणार्‍या विघ्नहर्ता लॉन्स येथे शुभविवाह होता. त्यासाठी ते सकाळी 10 वाजता लॉन्सवर आले होते. त्यानंतर 12:30 वाजण्याच्या सुमारास लग्न समारंभ अटोपल्यानंतर दुपारी सोनमुखाचा कार्यक्रम सुरू झाला होता. त्यावेळी निवृत्ती शेणकर यांच्या नातीला तहान लागल्यामुळे तिच्या आईने तिला पाणी पाजण्यासाठी एका खोलीत नेले होते. तेथे पाणी पाजत असताना त्या ताईंकडे असणारी बॅग त्यांनी एका खाटेवर ठेवली होती. आपल्या मुलीस काळजीपुर्वक पाणी पाजत असल्यामुळे त्यांच्या पर्सवर डोळा ठेऊन असणार्‍या एका बालकाने बरोबर डाव साधला.

दरम्यान, पाणी पाजून झाल्यानंतर संबंधित महिला आपली बॅग घेण्यासाठी गेली असता तेथे ती मिळून आली नाही. त्यानंतर त्यांनी लग्नसमारंभात आलेल्या काही नातेवाईकांना विचारणा केली. मात्र, तरी देखील बॅगचा सुगावा लागला नाही. त्यानंतर प्रत्येकाकडे शंकेच्या नजरेना पाहण्यापेणा शेणकर यांनी लॉन्स व्यवस्थापनाला विचारणा केली असता तेथील सीसीटीव्ही पाहण्याचा सल्ला समोर आला. त्यानंतर या सीसीटीव्हीत एक धक्कादायक माहिती समोर आली की, एक अल्पवयीन मुलगा लग्नात घिरट्या घालत होता. त्याच्या प्रत्येक हलचाली टिपल्या असता दुपारी 3 वाजता तो पुर्णत: संबंधित महिलेच्या मागावर होता. त्यानेच ही बॅग लंपास केल्याचे उघड झाले. या बॅगेत नाकातले झुंमके, एक अंगठी, एक चांदीचा करंडा, दोन सॅमसंग कंपनीचे मोबाईल व 20 हजार रुपयांची रोख रक्कम असा 1 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला आहे.

दरम्यान, हा प्रकार निवृत्ती शेणकर यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात येऊन कथन केला असता पोलिसांनी घटनेची शहनीशा केली. तसेच सीसीटीव्हीचे पुरावे सादर केले असता पोलिसांनी 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता एक गोष्ट लक्षात आली की, ज्या मुलाने ही चोरी केली आहे. तो स्थानिक नसून परराज्यातला असल्याची शंका आहे. तर त्याच्या सोबत आणखी एक तरुण असून तो मोठा असला तरी तो देखील अल्पवयीन असल्याचे दिसते आहे. त्यामुळे, या गुन्ह्याचा शोध होणे आता राम भरोसे असले तरी गुन्ह्यात लंपास झालेला मुद्देमाल मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे, संगमनेर पोलीस नेमकी काय तपास करतात, या मुलांना शोधतात कि नाही.! हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, एक गोष्ट येथे अधोरेखीत करावीशी वाटते की, गेल्या कित्तेक दिवसांपासून लहान मुलांना गुन्हेगारीत पुढे करुन मोठे लोक किंवा सराईत गुन्हेगार मोठमोठे गुन्हे करुन घेतात. कारण, लहान मुलांना अल्पवयीन समजून त्यांना समझ दिली जाते व पालकांच्या स्वाधिन केले जाते. याचाच फायदा घेत लहान मुलांना गुन्हेगारी विश्वात आणले जाते. खरंतर संगमनेरात ही मोडस आता प्रवेश करीत आहे. मात्र, नगर शहरात गेल्या कित्तेक दिवसांपासून हा प्रकार घडत आहे. मात्र, हे लोक एकदा चोरी केल्यानंतर थेट आपला डेरा दुसरीकडे दाखल करतात. त्यामुळे, त्यांचा शोध घेणे फार आव्हाणात्मक असते. हे काम आता संगमनेर शहर पोलीस तडीस लावतात का? की हा गुन्हा कायम तपासावर राहतो. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.