दोन तलाठ्यांना वाळुंच्या ढंपरमध्ये घुसून मारहाण.! पथकाचा टायर पंक्चर, वाळु सोडून गाडी फरार, दोघांवर गुन्हा दाखल

सार्वभौम (घारगाव ) :-

                    संगमनेर तालुक्यातील बोटा ते अकलापूर शिवारात पुन्हा एकदा दोन तलाठ्यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. 25 नोव्हेबर रोजी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली.  गौणखनिज पथकाचे वाहन पंक्चर झाल्याचा फायदा घेत वाळुतस्करांनी तलाठ्यांच्या ताब्यातील वाळुचा ढंपर रस्त्याच्या कडेला खाली करुन तो पळवून नेला. याप्रकरणी रविंद्र मुकूंदराव हिरवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घारगाव पोलीस ठाण्यात अविनाश रोहिदास डोंगरे(रा. अकलापूर, ता. संगमनेर) व संकेत हरिभाऊ लामखडे (रा. केळेवाडी, ता. संगमनेर) यांच्यावर, मारहाण, शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा आणि वाळु चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महसूल खात्याने वाळुतस्करांवर कारवाई कारण्यासाठी एक पथक स्थापन केले आहे. बुधवारी हे पथक गस्त घालत असताने ते रात्री 1.15 वाजण्याच्या सुमारास आंबीत फाटा येथे थांबले होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, मुंजेवाडी येथून बोट्याकडे एक वाळुची गाडी येत आहे. ही माहिती खरी असल्याचे त्यांच्या लक्षात येताच या पथकाने पोलिसांची मदत घेऊन बोटा परिसरात अकलापूर फाटा येथे एका संशयित ढंपरला थांबविले. त्यातील वाहन चालक यात वाहनाबाबत माहिती मिळाली असता त्यांनी प्रथमत: उडवाउडविची उत्तरे दिली. मात्र, या पथकाने सखोल चौकशी करून तपासणी केली असता त्यात वाळु असल्याचे लक्षात आले. या मालाबाबत परवाना विचारला असता कोणतीही परवानगी नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर वाहन चालक संकेत हरिभाऊ लामखडे (रा. केळेवाडी, ता. संगमनेर) याला संबंधित वाळुची गाडी पोलीस ठाण्यात घेण्यास सांगितली.

दरम्यान, वाळुची गाडी, एम. एच 16 एवाय 9444 ही घारगावच्या दिशेना मार्गस्त झाली असता त्यांच्या मागे महसूल पथकाची गाडी होती. तर वाळुच्या गाडीत मिथून पुंडलिक खाडे व शशिकांत अशोक खोंड हे बसले होते. यावेळी या दोन्ही गाड्या एकापाठोपाठ एक जात असताना महसूल पथकाची गाडी बोटा बायपास येथे पंक्चर झाली. दरम्यान, वाळुची गाडी पुढे निघून गेली. याचाच फायदा घेत वाळुतस्करांनी चांगलाच डाव साधला. ही गाडी कुरकुंडी फाटा येथे असताना अविनाश रोहिदास डोंगरे(रा. अकलापूर, ता. संगमनेर) हा त्याच्या स्कार्पिओ गाडीतून आला व त्याने त्याची गाडी थेट ढंपरला आडवी लावली. यावेळी दोन्ही तलाठ्यांनी त्यास विरोध केला असता त्याने दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांना गाडीतून उतरवून दिले. तर वाहन चालक संकेत लामखडे यास ढंपरमधील वाळु तेथेच रस्त्यावर खाली करुन तो पळवून नेण्यास सांगितला. त्याने तो पळवून देखील नेला. अशा प्रकारची फिर्याद घारगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

दरम्यान, संगमनेर पठार भागावर इतकी दादागिरी करुन वाळुची तस्करी चालते. यांना कोणाचे बळ आहे. याचा शोध घेणे गरजेचे आहे. यापुर्वी याच परिसरात महसुलच्या कर्मचार्‍याना मारहण करण्यात आली होती. तर त्यानंतर पुन्हा हाच परिसर महसूल विभागासाठी जिवघेणा ठरू पाहत आहे. खरंतर यापुर्वी राहुरी, श्रीगोंदा, नेवासा आणि नगर तालुका अशा ठिकाणी वाळुतस्कारांचे हाल्ले काही नवीन नव्हते. मात्र, आता तोच पायंडा संगमनेर तालुक्यात पडू पाहत आहे की काय? असा प्रश्न पडू लागला आहे. काही झाले तरी या लोकांना राजकीय पाठबळ आणि प्रशासकीय अधिकार्‍यांची उदासिनता यामुळे काही फुकटते तस्कर मोठे होऊन बसले आहेत. प्रशासनानेच पोसलेले आज प्रशासनावरच उलटू लागले आहे यात नवे काही नाही. मात्र, यात फक्त हकनाक गोरगरिबाचा बळी जाऊ नये म्हणजे झालं.!