अकोल्यात राष्ट्रवादीचे वरातीमागून घोडे.! भाऊंच्या प्रवेशासाठी दिवसभर आटापिटा.! जर तो प्रवेश झालाच तर तो कोडगा ठरेल.!

सार्वभौम (अकोले) :- 

                       अकोले तालुक्यात अशोक भांगरे, शिवाजी धुमाळ, जालिंदर वाकचौरे, सिताराम भांगरे यांनी नवचैतन्य आणलेल्या भाजप पक्षाला पिचड साहेबांच्या प्रवेशाने फुलते कमळ मिळाले. मात्र, त्यांच्या या निर्णयाने अनेकांवर हा पक्ष लादला गेला. त्यातलीच खदखद आता बाहेर पडू लागली आहे. याचे पहिले उदा. म्हणजे मधुभाऊ नवले व मिनानाथ पांडे हे होय. यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीत जावे की काँग्रेसमध्ये? असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला. अर्थात काही राष्ट्रवादीच्या कट्टर समर्थकांना मनोमन वाटत होते की, पवार साहेबांचा पक्ष वाढला पाहिजे. बहुजन समाज एकवटला पाहिजे, पक्षाला बळकटी मिळाली पाहिजे. अशा काही वैचारिक नेत्यांनी नवले यांना राष्ट्रवादीत येण्याची विनंती केली. मात्र, नाकापेक्षा मोती जड नको म्हणून त्यांना काही व्यक्तींचा छुपा विरोध झाला. तर कोणी वैयक्तीक संबंध जोपासण्यासाठी त्यांना विरोध करू लागले. हे राजकीय रणकंद सुरू असतांना नवले व पांडे यांनी थेट काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. म्हणजे, राष्ट्रवादीला बळकटी देण्यापेक्षा स्वत:चे राजकीय वलय टिकविण्यासाठी पक्षाचे जे नुकसान झाले. यावर रोखठोक सार्वभौमने परखड लिखाण केले होते. त्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना जाग आली. त्यांनी नवले यांना पक्षात घेण्यासाठी जंग-जंग पछाडण्यास सुरूवात केली. मात्र, आला मिळालेल्या माहितीनुसार त्यांना अपयश आल्याचे समजते आहे. मात्र, जर नवले आणि पांडे साहेब जर आता काँग्रेसच्या सावलीत उभे राहून राष्ट्रवादीचे उन चाखण्याचा प्रयत्न करीत असतील. तर मात्र, त्यांच्याविषयी जनतेत आत्मियतेची भावना राहणार नाही. त्यांचा जर राष्ट्रवादीत प्रवेश झाला तर तो निव्वळ एक कोडगेपणा ठरेल. मात्र, या दोघांची विचारधारा जर अभ्यासली तर हे शब्दाचे पक्के आहेत. नवले यांनी जर काँग्रेसची वाट धरली असेल तर ते पुन्हा राष्ट्रवादीचा विचार देखील करणार नाही. असे अभ्यासकांचे मत आहे.

खरंतर, कोणत्याही गोष्टीला एक काळवेळ असते. ती त्या ठराविक काळात झाली तर त्याचे फायदे आपल्या समोर येतात. अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागते. आज अकोल्यात तिच परिस्थिती आहे. जेव्हा भाजपतून काही नेत्यांना राष्ट्रवादीत यायचे होते. तेव्हा, वर्चस्ववाद सुरू झाला. मात्र, जेव्हा वेळ निघून गेली तेव्हा सगळे त्यांच्या मागे लागत बसले, तोवर फार उशिर झाला होता. काल, पहिल्याच दिवशी मधुभाऊ नवले, मिनानाथ पांडे यांना जर सन्मानाने पक्षात घेण्याचे नियोजन झाले असते तर आज राष्ट्रवादीची ताकत फार मोठी झाली असती. मात्र, येथील गटबाजी, मित्रपक्षांची मनधरणी आणि भोंगळ नियोजन यामुळे दोन नेत्यांना राष्ट्रवादी मुकली. मात्र, काल दि. गुरूवार 20 नोव्हेंबर रोजी अनेकांनी मधुभाऊ नवले यांची मनधरणी करुन पुन्हा राष्ट्रवादीत येण्याचा गळ घातला. मात्र, हे वरातीमागून घोडे नवले यांना बिल्कुल पटले नाही. त्यांना ना. बाळासाहेब थोरात यांनी संपर्क करून वेलकम इन द काँग्रेस अशी साद दिली. त्यानंतर तालुक्यातील लोकांशी ते मनोरंजन करीत बसतील ते नवले कसले! एकंदर काल त्यांच्याशी अनेकांनी चर्चा सुरू केल्या, भेटीगाठी आणि बैठका देखील पार पडल्या. मात्र, त्यांचा सारांश काय? हे लवकरच सर्वांच्या समोर येणार आहे.

दरम्यान, असे अनेकांना वाटते की, नवले व पांडे यांनी चुकूनही पुन्हा राष्ट्रवादीशी हात मिळवणी करू नये. कारण, येथील गटबाजी, एकमेकांच्या मानात एकमेकांविषयी असणारा द्वेष, पदाधिकार्‍यांच्या निवडी आणि बरेच काही. त्यामुळे, येथे प्लॅनिंगने होणारे एक तरी काम ते ही वाद आणि नाराजी नाट्य न होता तडीस गेले आहे. असे एक तरी उदा. दाखवा. आहो.! शोधून सापडणार नाही. त्यामुळे, भाजपच्या अस्थिर विचारधारेतून या मचक्यात जाऊन पुन्हा डोक्याचा गोविंदा करुन घेणे, कितपत योग्य आहे. अर्थात जे झाले असते ते पहिल्यांदाच सन्मानाने. आता तडजोडीअंती हात सोडून घड्याळ बांधणे हे किती उलट वाटते? त्यामुळे, यांनी काँग्रेस सोडणे हे त्यांचे शहाणपण कधीच होऊ शकत नाही. तसेही ज्यांनी पक्ष बदलला आहे ते प्रगल्भ विचारांचा वारसा जोपासणारे आहेत. खरंतर राष्ट्रवादीत जुनी चारदोन डोके सोडले तर बाकी अनेकांना पुरोगामीत्व म्हणजे काय? हे देखील सांगता येणार नाही. त्यामुळे, या दोन्ही नेत्यांसाठी काँग्रेस हा योग्य पक्ष असून त्यांनी ते जाहिर केल्यासारखे आहे. असे झाले तर लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील. अन्यथा वारंवार पक्षबदलाचा कलंक त्यांच्या माथी हकनाक बसले. तर दुसरी गोष्ट म्हणजे, बाळासाहेब थोरात यांचा शब्द टाळणे म्हणजे नवले व पांडे यांच्यासाठी फार मोठी जिकरीची गोष्ट आहे. त्यात नवले यांचा स्वभाव अभ्यासू असला तरी ते शाब्दीक देखील आहे. त्यामुळे, त्यांच्यासारख्यांनी जर शब्दांना विश्वासाच्या वेशीवर टांगले तर  दिलेल्या शब्दांना किंमत राहणार नाही. त्यामुळे, ते तरी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत येण्याचा विचार करतील, असे तालुक्यातील सुज्ञ जनतेला वाटत नाही.

आता आणखी एक धक्कादायक माहिती मी तुमच्या समोर मांडणार नाही. ती अशी की, मदन पथवे हे भाजप किंवा रिपाईचे नेते नसून ते खुद्द राष्ट्रवादीचे एक जबाबदार पदाधिकारी आहेत. आता राष्ट्रवादीच्या तळागाळातील नेतेच जर पक्ष सोडू लागले तर ही पक्षाला लागलेली गळती नाही का? याला जबाबदार कोण आहे.? म्हणजे, तुम्हाला नेते घ्यायचे नाहीत आणि जे आहेत ते देखील टिकवायचे नाहीत. मग तालुक्यातून पक्ष संपवायचा आहे की काय? असा प्रश्न पुढे येऊ लागला आहे. पथवे यांची आई देवठाण गणातून पंचायत समितीच्या सदस्या होत्या, त्यावेळी त्यांना तालुक्यात दोन नंबरची मते होती. तर ते आमदारकी लढविणार्‍या सक्रुभाई यांचे नातेवाईक आहेत, त्यांचे सामाजिक व राजकीय वलय असताना देखील त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम केला. याचा अर्थ पक्षाचे पदाधिकारी कोठेतरी कमी पडत असल्याचे सिद्ध होते आहे.

एकंदर ज्या राष्ट्रवादीला लोकांना अक्षरश: डोक्यावर घेऊन आमदार दिला. तोच पक्ष आज कमीकमी होण्याच्या मार्गावर दिसत आहे. हे सर्व चित्र येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून समोर येणार आहे. मात्र, सध्यातील महत्वाचे हेच आहे की, मधुभाऊ नवले, मिनानाथ पांडे व मदन पथवे हे येणार्‍या दोन दिवसात काय निर्णय घेतात. हे पाहणे महत्वाचे आहे.

भाग 3, क्रमश:..

- सागर शिंदे