अकोले पोलीस ठाण्याचे तिन पोलीस निलंबित टायर चोरीत भोसले, गुडवाल व सदाकाळ दोषी,एसपींची धडक कारवाई.

सार्वभौम (अकोले) :- 

अकोले पोलीस ठाण्यात ऑगस्ट महिन्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे अंम्मलदाराच्या अगदी समोर लावलेल्या वाळु तस्काराच्या टेम्पोचे टायर आणि डिस्क चोरी गेले होते. त्यात चक्क चोरटे आणि पोलीस यांनीच हा पराक्रम केल्याचे समोर आले होते. त्यानंतर रोखठोक सार्वभौमने याबाबत निर्भिड वृत्तांकन केले होते. त्यानंतर अकोले पोेलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता सखोल चौकशी करुन तिघांचा कसुरी अहवाल पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत यांच्याकडे पाठविला होता. त्यानंतर पंडीत यांच्याकडे आमचे प्रतिनिधी सुशांत पावसे यांनी पाठपुरावा केला असता त्यांनी सांगितले होते की, संबंधित अहवाल पोलीस अधिक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. त्यानंतर आज पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी या अहवालावर कठोर करावाई करीत पोलीस हावलदार बाबासाहेब भोसले, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय गुडवाल व वाहन चालक चंद्रकांत सदाकाळ (नेमणूक अकोले पोलीस ठाणे) या तिघांना निलंबित केले आहे. या कारवाईमुळे आरविंद जोंधळे यांची निष्पक्षता आणि पोलिसांची चोरी उघड झाली आहे. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.   

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रशासनाने गेल्या काही दिवसांपुर्वी गणेश आवारी याचा वाळुचोरी करणारा एम.एच17 एजी 2605 हा टेम्पो पडकला होता. त्यातील दोन ब्रास वाळु देखील जप्त करण्यात आली होती. त्यामुळे त्या वाळुसह टेम्पोचा पंचनामा करण्यात आलेला होता. या प्रकरणाचा तपास हासे करीत होते. दरम्यान कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर हा टेम्पो तहसिल कार्यालयाच्या आवारात म्हणजे अकोले पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार कक्षाच्या अगदी समोरासमोर लावण्यात आला होता. मात्र, सोमवार दि. 10 ऑगस्ट 2020 रोजी लक्षात आले की, सरकार दरबारी जमा असलेल्या टेम्पोला चाकेच राहिलेली नाही. 

दरम्यान, या प्रकरणात सखोल चौकशी झाल्यानंतर विनायक नरहरी साबळे (रा. खानापुर, ता. अकोले) याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. या दरम्यान दै. सार्वभौमने एक वृत्त प्रकाशीत केले होते. कोणी कोणाला वाचविण्यापेक्षा हा तपास पारदर्शी झाला पाहिजे यासाठी काही सुचना मांडल्या होत्या. कारण, हा एकटा व्यक्ती अशा पद्धतीची चोरी करू शकतो का? ते ही पोलीस ठाण्यात घुसून.! आणि ठाणे अंमलदार कक्षेच्या अगदी समोर.! हे खरोखर आश्चर्य वाटण्याजोगे होते. त्यामुळे अशी चोरी करण्याची धाडस तोच करु शकतो ज्याला पोलीस ठाण्यातून पाठबळ आहे. त्यामुळे, त्या दिवशीचे ठाणे अंमलदार, त्यांचे सहाय्यक, तपासी अधिकारी, पोलीस ठाण्यात उपस्थित असणारे कर्मचारी, 3 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या दरम्यान तहसिल कार्यालय व पोलीस ठाण्यात असणारे सीसीटीव्ही, संशयित व्यक्तींच्या हलचारी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आरोपी साबळे यांच्याकडून मिळणारे जबाब यात सर्व चित्र उघड होऊ न गेले. 

दरम्यान पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांनी भल्याभल्या गुन्ह्यांचे तपास लावले आहे. त्यामुळे, त्यांना हा टायर चोरीचा गुन्हा उघड करणे काही कठीन नव्हते. त्यांनी त्यांच्या स्टाईलने तपास सुरू केला. काही चौकशी आणि संशयित बाबी लक्षात घेऊन काही पोलीस कर्मचार्‍यांचे जबाब नोंदविले. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय गुडवाल व वाहन चालक चंद्रकांत सदाकाळ हे तिघे यात दोषी आहेत. त्यानंतर त्यांनी या तिघांचा दोषी अहवाल पाठविला होता. हा अहवाल सरकारी नियमांनुसार कार्यालये पिंजत-पिंजत अखेर तिन महिन्यानंतर पोलीस अधिक्षक कार्यालयात जाऊन पोहचला. त्यानंतर या तिघांना शो-कॉझ नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आज मंगळवार दि.10 नोव्हेंबर रोजी एसपी पाटील यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत.