संगमनेरच्या पीएसआयने सोनाराकडे 2 लाखांची लाच मागितली, 1 लाख स्विकारताना अटक.! पोलीस ठाण्यात शुकशुकाट.!

- सागर शिंदे

सार्वभौम (संगमनेर) :-

                   एका चोरीच्या गुन्ह्यातील सोने नाशिकच्या सराफाने विकत घेतल्याच्या संशयाने तपास सुरू असताना संबंधित सोनाराकडे दोन लाखांची लाच मागितल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यातील एक लाख रक्कम स्विकारताना संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक राणा प्रतापसिंह परदेशी यांना लाचलुचपत शाखेने संगमनेरातच रंगेहात पकडले आहे. ही कारवाई मंगळवार दि. 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास झाली. यात नाशिक विभागाचे पोलीस दुपारी उशिरापर्यंत या प्रकारणाची सखोल चौकशी करीत होते. तर सायंकाळी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरातील एमएससीबी कॉलनी मालदाड रोड येथे मंगल संजय डमरे यांच्या घरी मंगळवार दि. 20 ऑक्टोबर रोजी एक चोरी झाली होती. सखोल चौकशी केल्यानंतर एक धक्कादायक गोष्ट समोर आली की, ही चोरी दुसरे तिसरे कोणी नव्हे तर आपल्या मुलानेच त्याच्या मित्राच्या मदतीने केली आहे. यात 2 लाख 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल त्यांनी चोरुन नेला होता. त्यानंतर या आईनेच आपल्या मुलासह दोघांवर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यांनी एक टिम तयार करून या गुन्ह्याची उकल करण्यासाठी सुरूवात केली.

दरम्यान, ज्यांनी घरातील मुद्देमाल चोरला होता. त्यांनी काही सोने हे नाशिक येथील एका सराफाला विकले होते. माझे वडिल अजारी आहेत. त्यांच्या उपचारासाठी तत्काळ पैसे हवे आहेत. त्यामुळे, हे सोने घेऊन मला रोख रक्कम द्यावी असे या मुलांनी सोनाराकडे विनंती केली होती. त्यानंतर त्यांना हवी ती रक्कम मिळाली. मात्र, या दोन बहाद्दरांनी पैसे हातात पडताच थेट गोवा गाठला. तेथे गेल्यानंतर त्यांची फुल मनोरंजन सुरू केले. या दरम्यान पोलिसांचा तपास सुरू असल्यामुळे त्यांना एका व्यक्तीच्या मदतीने या दोघांचा मोबाईल नंबर मिळाला. त्यानंतर त्यांचे लोकेशन घेत पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी यांची टिम थेट गोव्याला निघाली. तेथे जाऊन त्यांनी या दोघांना कलिंगुड बीचवर जाऊन बेड्या ठोकल्या.

खर्‍या अर्थाने या ठिकाणाहून परदेशी यांच्या तोंडाला पाणी सुटले. या दोघांनी नाशिक येथील एका सराफाचे नाव घेतले असता यांचे मोर्चा आता संबंधित सराफाकडे वळला. या गुन्ह्यात सराफ यांना सहआरोपी करण्याचा घाट घालण्यापेक्षा त्यांच्याकडून रग्गड रक्कम उकळविण्याचा मोह या वर्दीला आवरला नाही. त्यांनी थोडे थिडके नाही तर दोन लाखांची मागणी या सराफापुुढे मांडली. एकतर गुन्ह्यात अडका किंवा आम्हाला खूश करा. या धोरनेने परदेशी यांनी थेट सराफाकडे लाच मागितली. मात्र, कर नाही त्याला डर कशाला असे म्हणत संबंधित सराफाने पोलीस ठाणे न गाठता थेट नाशिक लाचलुचपत विभाग गाठला. तेथे पोलीस अधिक्षक सुनिल कडासणे साहेब म्हणजे नो अपील. त्यांनी तत्काळ टिम तयार करुन संबंधित सराफ यांच्या सोबत पाठविली. सरकारी नियमांनुसार ट्रॅप ठरला आणि आज मंगळवारी संगमनेरात पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर तो यशस्वी झाला.

दरम्यान, ठरलेल्या रकमेतील एक लाख रुपयांची रक्कम स्विकारताना परदेशी यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. हा प्रकार घडल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर अधिकारी अकडकल्याचे पाहून तेथे उपस्थित असणारे सर्वच कर्मचारी पोलीस ठाण्यातून काही क्षणात गायब झाले. संगमनेर शहराचे पोलीस निरीक्षक कामानिमित्त बाहेर असताना त्यांच्या मागे असे प्रकार होतात. हे फार मोठे दुर्दैव आहे. राणा यांनी गेल्या काही दिवसात चांगले काम केले होते. मात्र, तरुण रक्त आणि अंगावर खाकी असल्यामुळे त्यांचा जोश बहुतांशी बड्या लोकांच्या लेकरांसोबत पहायला मिळत होता. तर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अजून असे काही अधिकारी असल्याचे बोलले जाते. ज्यांची हाप्तेखोरी ही खाजगी व्यक्ती करत असून मोठा मलिदा हे अधिकारी जमा करीत आहेत. आता मात्र या कारवाईनंतर मोठा आळा बसणार आहे यात शंका नाही.


लाच मागतोय तर संपर्क करा..

लाच देणे व घेणे हा एक मोठा गुन्हा आहे. त्यामुळे, नागरिकांनी कोणाला लाच देऊ नये. जर कोणी लाचेची मागणी करीत असेल तर तत्काळ 1064 या नंबरवर संपर्क साधावा. जो कोणी संपर्क साधेल त्याचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल. तसेच तुमचे काम कोणी अडविणार नाही. त्यामुळे, कोणाला लाच देऊ नये.

- सुनिल कडासणे  (पोलीस अधिक्षक लाचलुचपत विभाग, नाशिक)