निधी आणून आमदारांनी खुशाल उद्घाटने करत फिरावे, आयत्या पिठावर रेघोट्या का ओढाव्यात- वैभव पिचड यांची टिका.!



सावभौम (अकोले) :-

                  विद्यामान आमदारांनी तालुक्यासाठी 50 व 30 लाखांचा निधी आणला आहे. त्याचे त्यांनी खुशाल उद्धाटन करावे. मात्र, माझ्या काळात मी जी काही कामे मंजूर केली आहेत. ज्याच्यासाठी मी प्रशासकीय पाठपुरावा केला आहे त्यांचे उद्धाटन करणे हे काही संयुक्तीक वाटत नाही. मी विरोधी पक्षात असताना देखील शहरासाठी 6 कोटी 50 लाख रुपयांचा निधी आणू शकलो. विद्यमान आमदार नगरपंचायतीत येऊन गेले. त्यांनी सांगितले निधी देतो, कामे देतो. मात्र, अद्याप तसे झाले नाही. त्यामुळे, त्यांनी निधी आणावा आणि खुशाल उद्घाटने करावेत अर्थात आयत्या पिठावर रेघोट्या मारु नये असा सरळसरळ टोला माजी आमदार वैभव पिचड यांनी विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांना लावला आहे. ते नगरपंचायतीत 6 कोटी 50 लाख रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी, बाळासाहेब वडजे यांच्यासह अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थितीत होते.

वैभव पिचड पुढे म्हणाले की, शेजारच्या तालुक्यात कोविडचे रुग्ण पाहिले तर ते हाताबाहेर गेले आहेत. मात्र, अकोले शहरातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचे काम नगरपंचायतीने अगदी यशस्वी पद्धतीने पार पाडले आहे. तर अकोले तालुक्यात पावसाची सरासरी जास्त आहे. येथे गेल्या दोन आठवड्यापुर्वी 85 एमएम म्हणजे जवळ-जवळ ढगफुटीसारखी परिस्थितीत निर्माण झाली होती. त्यामुळे, कारखाना रोडवरील नागरिक व संगमनेररोड वरील व्यावसायीक यांना फार त्रास झाला आहे. येणार्‍या काळात कोल्हार घोटी रोड होणार आहे. तेव्हा शहरातून आरसीसी रस्ता जाणार आहे त्यात ज्या साईड गटारी आहेत त्यांचे देखील आपण योग्य नियोजन करुन सांडपाणी आणि शहरात घुसणार्‍या पाण्याचे नियोजन करणार आहोत. तसेच शहरात आणि शहरातील कॉलनी व रस्ते येथील पाण्याचे देखील योग्य नियोजन करण्यासाठी आज जे काही विकास कामांचे उद्घाटने झाली आहेत त्यातून अनेक प्रश्न सुटणार आहेत. अकोले गटारमुक्त व आरोग्यसंपन्न करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.

ते पुढे म्हणाले की, गेल्या विधानसभेच्या वेळी विरोधात असताना देखील 3 कोटी रुपये मंजूर केले होते. विकास कामांना मंजुर्‍या मिळेना म्हणून मी भाजपत जाण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हा खर्‍या अर्थाने केंद्रसरकारकडून वित्ताचे पैसे, विविध योजना व अनुदान असे 6 कोटी 50 लाखांना मंजुरी आणली आहे. अकोले शहर हे तालुक्यातील महत्वाचे ठिकाण असून येथे गेल्या पाच वर्षात कोट्यावधींची कामे केली आहे. भाजपत प्रवेश केल्यानंतर येथील कामांना चांगला निधी मिळाला असून प्रशासकीय कामांना मंजुर्‍या मिळाल्या आहेत.

आज विद्यमान आमदार ज्या कामांचे उद्घटन करीत आहेत. त्यांना लागणारी प्रशासकीय मंजुरी, लागणारा निधी हा माझ्या काळात देऊ केला होता. नंतर अचारसंहिता लागू झाली, मार्च नंतर कोविडचे संकट आले, त्यामुळे प्रशासनाला वेळ मिळाला नाही. आज जी काही कामे सुरू आहेत. त्यात आमदारांनी त्यांचे योगदान तपासले पाहिजे. त्यांनी तालुक्यासाठी 50 लाख आणि नंतर 30 लाख दिले म्हणतात त्याचे त्यांनी खुशाल उद्घाटन केले तर हरकत नाही. मात्र, मागच्या निधीवर उद्घटने करीत फिरणे हे संयुक्तीक वाटत नाही. मी आजवर त्याच कामांचे उद्घटने केली आहेत ज्या कामांना मी निधी दिला आहे, योगदान दिले आहे असे म्हणत त्यांनी विद्यमान आमदारांच्या श्रेय्यवादाचा समाचार घेत उद्घाटन केले. तर येणार्‍या काळात देखील राज्य आणि केंद्रकडून मोठा निधी आणून तालुक्याच्या विकासासाठी मी कटीबद्ध राहिल असे पिचड म्हणाले.