अकोल्यात हिस्ट्रिशीटरची हत्या.! हा चौथा खून दडपण्याचा प्रयत्न!

सावभौम (अकोले) :- 

                 अकोले शहरात एका तरुणाचा रात्री संशयास्पद मृत्यू झाला आहे. यात तो राहत्या घरात मयत मिळून आला आहे. एका जीम मधून एका गाडी चोरी गेली होती. त्यात संशयित म्हणून त्याला मारहाण करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, तुर्तास पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असली तरी ही एक हत्या असल्याची जोरदार चर्चा अकोले शहरात सुरू होती. तर या तरुणाच्या मित्रांनी तसेच नातेवाईकांनी देखील या मृत्युवर अक्षेप घेतला आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप तसा कोणताही तपास सुरू केलेला दिसून आलेला नाही. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपुर्वी येथे अमोल वाघमारे यांचा खून पचविला गेला, त्यानंतर राहूल शिंदे यांचा खून दडपला गेला तर त्यापुर्वी राहुल देठे यास गोळ्या घालून ठार केले गेले. अशा किती हत्या खाकी पाठीशी घालणार आहे? असा प्रश्न सामाजिक संघटनांनी उपस्थित केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, निलेश दत्तात्रय गुळे (वय 35, रा. आंबेडकरनगर, ता. अकोले) हा तरुण गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर होता. याच्या माध्यमातून काही अवैध धंद्यावाले मोठा काळा बाजार करीत होते. तर काही मागासवर्गीय तरुण देखील चोर्‍या मार्‍यांसारखे प्रकार करीत असल्याचे बोलले जात आहे. गुळे याच्यावर पोलीस ठाण्यात काही गुन्हे दाखल असल्याची देखील नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर राजूर पोलिसांनी देखील त्यास गेल्या काही दिवसांपुर्वी ताब्यात घेतले होते. मात्र, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे कधी मिळून आलेले नाहीत.

दरम्यान, गेल्या चार पाच दिवसांपुर्वी एका जीमच्या आवारातून एक पल्सर दुचाकी चोरी गेली होती. त्यात गुळे याच्यावर संशय घेण्यात आला होता. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे. या संदर्भात काही तरुणांनी गुळेकडे चौकशी केली असता त्याने या गाडीबाबत काही माहित नसल्याचे सांगितले. त्यानंतर दरम्यानच्या काळात काही तरुणांनी त्यास दारु पाजून मारहाण केल्याचे बोलले जात आहे. त्याच्या शरिरावर तसे व्रण असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे.

दरम्यान, मंगळवार दि. 13 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास गुळे हा त्याच्या राहत्या घरात निश्चिंत पडला होता. त्यानंतर शेजारच्यांनी त्यास ऊठविण्याचा प्रयत्न केला असता त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान सकाळी त्यास काही लोकांनी आवाज दिला असता तो मयत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्याला कोणीतरी मारहाण केल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली असता पोलिसांनी चौकशी करू असे सांगत त्याकडे दुर्लक्ष केले असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

दरम्यान, एक अपेक्षा होती की, पोस्टमार्टमध्ये हा सर्व प्रकार उघड होईल. मात्र, डॉक्टरांनी त्या जखमा जुन्या असून कदाचित हा मृत्यु ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. दुर्दैवाने येथे मयत होणार्‍या संशयित व्यक्तींचे शवविच्छेदन येथे करण्याचे धाडस करावे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण, यापुर्वी राहूल देठे (वय 15, रा. विठे) याचा खून असाच दडपला गेला. त्या पाठोपाठ अमोल वाघमारे (वय 20, रा. आंबेकरनगर) व राहुल शिंदे (वय 25, रा. चास) अशा तिघांची हत्या करण्यात आली होती. मात्र, दुर्दैवाने यांच्यासह अनेक घटना दडपल्या गेल्या. त्यावर मोठमोठ्या अर्थपुर्ण तडजोडी करुन या गुन्ह्यांवर पडदा टाकल्याचे समोर आले. मात्र, असेच प्रकार दडपले जात असतील तर सामान्य मानसांचा कायद्यावरील विश्वास राहणार नाही. त्यामुळे, या घटनांमध्ये वरिष्ठांनी लक्ष घालणे गरजेचे असल्याची मागणी आता सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.