इथापे कॉॅलेजच्या प्राचार्यानेच केले विद्यार्थीनींशी अश्लिल चाळे ! गुन्हा दाखल.!
सावभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरातील वामनराव इथापे डी फार्मसी कॉलेजच्या प्रॅक्टीकल रुममध्ये चक्क प्राचार्यानेच आपल्या विद्यार्थीनींशी अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार दि. 13 रोजी समोर आला आहे. तु जर माझ्याशी बोलली नाही तर तुला नापास करुन टाकतो असे म्हणून मोबाईलवर मेसेज टाकून नको तसे वर्तन केले. याप्रकरणी दोन पीडित मुलींनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात प्राचार्य आरषू पटेल (रा. लोणी) या नराधमावर अॅट्रॉसिटी आणि छेडछाड कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका भाजपच्या बड्या नेत्याच्या महाविद्यालयात असले चाळे चालतात ही धक्कादायक बाब असून येथे विद्यार्थीनी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिक्षण घेण्यासाठी बीड जिल्ह्यातून अवघ्या 21 वर्षाची तरुणी संगमनेरमध्ये वामनराव इथापे डी फार्मसी कॉलेज येथे मोठ्या विश्वासाने शिक्षण घेण्यासाठी आली होती. मात्र, सन 2019 च्या नोव्हेंबर महिन्यापासून त्या कॉलेजचा प्राचार्य आरषू पटेल याने त्याचे गुण उधाळणे सुरू केले होते. संबंधित पीडित तरुणीवर कॉलेजच्या प्रॅक्टीकल रुममध्ये जवळीक करुन चाळे करण्याचे प्रयत्न केले. इतकेच काय! भर क्लास सुरू असताना आरोपी हा पीडित तरुणीशी अश्लिल चाळे करीत होता. त्यानंतर क्लास संपतो कोठे नाहीतर पीडित तरुणीस तो कॅबिनमध्ये बोलावत होता. तेथे नोट्स देण्याच्या बहाण्याने तिच्याशी नको-नको ते चाळे करण्याचा वारंवार प्रयत्न करीत होता. या प्रकाराला घाबरुन ही विद्यार्थीनी बाहेर जात असे. मात्र, हा बहाद्दर येथेच थांबला नाही तर याने पीडित तरुणीचा पाटलाग करण्यासाठी तिचा मोबाईल नंबर उपलब्ध करुन ती कोठे रहायला आहे याची चौकशी सुरू केली.
दरम्यान, गुतली गाय फटके खाय अशी या पीडित मुलीची मनस्थिती झाली होती. कारण, हा गुरूस्थानी असणारा प्राचार्य मोबाईलहून नको त्या सुखाची मागणी करू लागला होता. असे केले नाही तर तू पास कशी होते, शिक्षण कशी घेते अशा धमक्या देऊ लागला होता. तू माझ्याशी बोलली नाही तर मी तुला नापास करुन टाकीन असे म्हणत व्हाटसअॅप मेसेज करीत असे. मात्र, आपले शिक्षण थांबायला नको त्यामुळे, पीडित मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. जर घरी सांगितले तर शिक्षण थांबेल व कॉलेजमध्ये सांगावे तर नापास होण्याची किंवा मार्क कमी होण्याची भिती. त्यामुळे, पीडित तरूणी प्रचंड द्विधा मनस्थितीत होती.
दरम्यान मार्च 2020 मध्ये कोविड-19 लॉकडाऊन सुरू झाले. त्यानंतर पीडित मुलीस घरी जाता आले नाही. त्यामुळे, ही तरुणी संगमनेरात एका खाजगी रुमवर राहिली. त्यानंतर आरोपी पटेल याने पीडित तरुणीस परिक्षेचे हॉलतिकीट घेण्यासाठी नवीन नगर रोडला ये असे मेसेज टाकले. मात्र, ही विद्यार्थीनी गेली नाही. त्यामुळे या आरोपीने तिला मेसेज टाकले की, तु भेटायला आली नाही. तू पास काशी होते. तेच मी पाहतो असे म्हणत याने तिला धमकी दिली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पीडित विद्यार्थीनी तिच्या गावी गेली होती. त्यावेळी कॉलेजचे ऑनलाईन लेक्चर सुरू झाले होते. तेव्हा मात्र, पटेल याने जाणूनबुजून या विद्यार्थीनीस जॉईन केले नाही तर नंतर परिक्षेदरम्यान याने या विद्यार्थीनीस मुद्दाम अपमानास्पद वागणुक दिली.
दरम्यान हा प्रकार पीडित विद्यार्थीनीने तिची दुसरी मैत्रीन हिला सांगितला असता त्या विद्यार्थीनीने देखील पटेलचे न पटेल असे चाळे सगळ्यांच्या समोर मांडले. त्यामुळे, हा प्रकार जर दोन मुलींनी स्वत: रणरागिणी होत सगळ्यांच्या समोर मांडून धैर्याने फिर्याद दाखल केेली. तर अशा अनेक कित्ती विद्यार्थीनी असतील ज्या आजवर बोलल्या नसतील. आता याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या महाविद्यालयात अशा प्रकारे विद्यार्थीनींचे शोेषण होत असेल तर अशा महाविद्यालयांना टाळे ठोकून मान्यता का रद्द करू नये. असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. तर याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार करणार असल्याचे काही संघटनांनी सांगितले आहे.