आरे देवा.! झेडपीची शाळा फोडून होतं नव्हतं धुवून नेलं.! संगमनेरातील घटना, गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील देवी पठार येथे जिल्हा परिषदेच्या शाळेतच चक्क चोरी झाल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. यात दोन स्पिकर, युपीएससी आर.टीएस व काही होमथेटअर असा हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला आहे. याप्रकरणी मारुती रामभाऊ घुले (रा. खडकवाडी, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील देवी पठार येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. तेथे मुलांना शिकविण्यासाठी व शैक्षणिक साहित्य म्हणून काही वस्तु घेण्यात आल्या होत्या. तर काही देणगी स्वरुपात स्विकारण्यात आल्या होत्या. दरम्यान या वस्तु शाळा बंद असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी बंद शाळेचे कुलूप तोडून चोरुन नेल्याचे समोर आले आहे. याबाबत डॉॅ. पानसरे यांनी पाठपुरावा केला असता सोमवार दि. 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ते दुसर्या दिवशी शाळा बंद असण्याच्या काळात हात पराक्रम कोणीतरी केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, कोरोनाच्या महामारीमुळे, शाळा बंद आहेत. त्यामुळे, शिक्षक देखील निवांत असून ज्ञान देणार्या शाळा आता धुळ खात पडल्या आहेत. दरम्यान शाळेंमध्ये आता विद्यार्थी नसून कोरोनाचे रुग्ण आपल्याला पहायला मिळत आहे. तर ज्या शाळांमध्ये विद्यार्थी बसतात त्यात भलेभले साप वास्तव्य करीत असल्याचे दिसते आहे. शाळा बंद असताना शिक्षक, पालक किंवा कर्मचारी यांनी शाळांची निगा राखणे, त्यातील साहित्यांची देखभाल करणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होताना कोठे दिसत नाही. त्यामुळे, भुरटे चोर शाळेत प्रवेश करतात आणि शालेय वस्तू व अन्य साहित्यांची चोरी करुन त्याची विक्री करतात.
हा प्रकार कोठेतरी थांबला पाहिजे. यासाठी किमान काही दिवस तरी शाळा खुल्या केल्या पाहिजे. जे ज्ञानाचे मंदीर आहे. त्याची स्वच्छता केली पाहिजे. अनेक शाळांमध्ये संगणक आहेत, इलेक्ट्रॉनिक साहित्य आहेत त्यांच्यावरील धुळ झटकण्याचे कर्तव्य शासनाने केले पाहिजे. अन्यथा या वस्तू अशाच गंज खावून बंद पडल्या जातील. एकीकडे ऑनलाईन शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला असताना आता शालेय वस्तुंचा देखील बट्ट्याबोळ पहावयास मिळत आहेे.