अकोले नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला.! नगरसेवक होण्यासाठी गुढग्याला बाशिंग.!

 
सार्वभौम (अकोले) : 

                       देशात कोरोनाची महामारी सुरू असताना  बिहारच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तर राज्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. अशात नगर जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींच्या निवडणुकींचा बिगूल वाजला आहे. त्यात नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधित पारनेर, कर्जत आणि अकोले या नगरपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.

कर्जत तालुक्यात राम शिंदे यांना पराभूत करुन रोहित पवार यांनी आपला डेरा उभा केला आहे. तेथे आजही भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करताना दिसत आहेत. त्यामुळे, कर्जतची नगपंचायत यावेळी आणखी रंगतदार होणार यात तिळमात्र शंका नाही. कारण, याच स्थानिक स्वराज्य संस्थांहून पुढील निवडणुका आणि बळ अवलंबून असते. त्यामुळे, येथील राजकीय आखाडा पाहण्याजोगा असणार आहे.

तर या व्यतीरिक्त पारनेर येथे तर सरकारमधील शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत घेण्याची अनोखी यंत्रणा आ. निलेश लंके यांनी आखली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधान आले होते. त्यांच्या पाठोपाठ आ. कोकाटे यांनी राष्ट्रवादीत शिवसेनेचे नगरसेवक आणले. तेव्हापासून राष्ट्रवादी अधिक प्रबळ होताना दिसून आली. आता प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादीने आपले पाय रोवले आहेत. त्याचा तोटा शिवसेनेला किती होतो हेच या निवडणुकीत पाहयला मिळणार आहे. या तीन नगरपंचायती या एक प्रकारची रंगीत तालीम असणार आहे.

तर यात सर्वांत महत्वाचे म्हणजे, अकोले तालुक्यात येणार्‍या काळात नेमके काय परिवर्तन पहायला मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण, तालुक्यात ज्या पद्धतीने पिचड यांचा पराभव झाला. त्यानंतर राष्ट्रावादीला येथे फारसे पाय रोवता आले नाही. येथील काही पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या वादाच्या भोवर्‍यात सापडल्या तर राष्ट्रवादीतील गटबाजी हीच पक्षाला मारक ठरताना दिसून येत आहे. नकळत याचाच फायदा पिचड यांना झाल्याचे पहायला मिळते आहे. आता शहरावर वर्चस्व गाजवायचे असेल तर राष्ट्रवादीला महत्वाची भूमिका बजवावी लागणार आहे. काही बुळग्या भूमिका बाजुला सारुन किमान स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यासाठी अजेंडा आखला पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही. आता नगरपंचायतीचा बिगूल वाजला आहे. त्यामुळे, अनेकजणांनी मोर्चे बांधनी सुरू केली आहे. तर कोणी गेल्या कित्तेक दिवसांपासून आपापल्या पद्धतीने प्रभाग आवटून बसले आहेत. पक्षीय राजकारण पाहता नाराजी आणि फुटातूटी यात मात्र, अकोले नगपंचायत चांगलीच रंगणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

कसा असेल कार्यक्रम...

21 ऑक्टोबर पर्यंत प्रभाग रचनेचे प्रस्ताव सादर करणे आपेक्षित आहेत.

29 ऑक्टोबर पर्यंत प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणे अपेक्षित आहे.

03 नोव्हेंबरला सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीसाठी नोटीसा प्रसिद्ध होणार आहेत.

10 नोव्हेंबर रोजी नगरपंचायतीची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

18 ते 26 नोव्हेंबर प्रारुप प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे व सदस्य पदाच्या आरक्षणावर हरकती मागविण्यात येणार आहेत.

10 डिसेंबर रोजी हरकतीवर सुनावणी होणार आहेत.

17 डिसेंबर रोजी अंतीम प्रभाग रचना मंजूूर करण्यात येणार आहेत.

24 डिसेंबरपर्यंत अधिसुचना स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपंचायतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.