डिवायएसपी रोशन पंडित यांची उचलबांगडी, राहुल मदने संगमनेर अकोल्याचे नवे डेप्युटी.!


संगमनेर (सार्वभौम) :-  

            आज राज्य शासनाच्या गृह विभागाने पोलीस उपाधिक्षक पदाच्या 72 नियुक्त्या केल्या आहेत. त्यात नगर शहराचे तत्कालिन पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांना श्रीरामपूर पोलीस उपाधिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तर, पुर्वी कर्जतला असणारे सुदर्शन मुंडे यांची शेवगाव पोलीस उपाधिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तर सर्वात महत्वाचे म्हणजे, श्रीरामपूर येथील पोलीस उपाधिक्षक राहुल ज्ञानदेव मदने यांची संगमनेर पोलीस उपाधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, संगमनेरचे एसडिपीओ रोशन पंडित यांची पोलीस मुख्यालय उपाधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे,  आता संगमनेरचे कामकाज पुन्हा वेगाने वाढेल अशी अपेक्षा असून पंडित यांना असमाधानकारक ठिकाणी नियुक्त केल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर नवे डेप्युटी नेमके नवीन यंत्रणा उभी करणार की, येरे माझ्या मागल्या अशीच भूमिका बजावणार.! याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

     याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरोनामुळे अनेक बदल्यांना स्थगिती मिळाली होती. आता मात्र पोलीस खात्यात पोलीस उपाधिक्षकांमध्ये नव्याने फेरबदल झाले आहेत. नगर शहरातून संदिप मिटके या कार्यक्षम अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर त्यांना वेटींगवर ठेवण्यात आले होते. मात्र, नंतर त्यांनी आपल्या नशिबाला बळ दिले आणि त्यांची श्रीरामपूर पोलीस उपाधिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. मात्र त्यांच्या जागी असणारे राहुल मदने यांना महसुल मंत्र्यांच्या तालुक्यात काम करण्याची संधी मिळाली आहे.  यात विशेष म्हणजे, संगमनेर तालुक्यात बीडिओ, प्रांत आणि तहसिलदार यांच्या बदल्यांना स्थगिती मिळाली. अर्थातच त्यांचे काम समाधाकारक असावे. ते नामदारांना भावले असावे.  मात्र, असे एकमेव अधिकारी आहेत जे थेट संगमनेरहून उचलून मुख्यालयात नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे, मुख्यालयात कोणाची नियुक्ती होते, हे नव्याने सांगायला नको.!

               आता विशेष म्हणजे, पंडित हे फार सरळमार्गी व्यक्तीमत्व होते, मात्र तरी देखील त्यांचे आणि पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्यात कधी जमले नाही. बरं त्यांचा स्वभाव संशयी आणि कडक असला तरी त्यांनी फार काही कठोर निर्णय घेऊन आपला ठसा उमटविला असे कोठे पहायला मिळाले नाही. तालुक्यात भर दिवसा वाळु तस्करी होत आहे, शहरात आजही गुटखा व गांजा आणि बरेच काही अवैध धंदे चालतात. भलेभले कत्तलखाने आणि बेकायदा धंद्यांना अगदी उत आल्याचे पहायला मिळते आहे. मात्र, साहेबांनी तडकाफडकी कोणाला निलंबित केले असे पहायला मिळाले नाही. उलट, आलेल्या चौकशा ह्या कायम चौकशीत राहून गेल्या तर काही दडपल्या गेल्या.  संगमनेरात त्यांनी कोठेही कारवाई करण्यासाठी हात मोकळे सोडले नाही तर काही प्रकरणांची माहिती देऊन देखील त्यांनी हात आखाडते घेतले होते. चाललय म्हणून चाललय असेच वातावरण पोलीस दलात पहायला मिळत होते. अशा प्रतिक्रिय नागरिकांनी दिल्या आहेत.

        आता मदने यांची येथे नियुक्ती झाली आहे. त्यांच्यापुढे फार मोठे आव्हान असणार आहे की, वाळू, जुगार, मटका,  गांजा, गुटखा, आणि पोलीस खात्यात जे अंतर्गत वाद आहेत. त्यांवर हल काढणे प्रथमत: गरजेचे ठरणार आहे. तर, जे नामदार साहेबांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी समतोल राखून महसूल, पालिका व खाकी यांच्यात समन्वय साधून मोठमोठ्या कारवाया करणे हे मोठे चॅलेंज असणार आहे.

          दरम्यान, आता आयजी, डिआयजी, एसपी, अप्पर एसपी, डेप्युटी यांच्या बदल्यांची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. त्यानंतर आता रेंजनुसार पोलीस निरीक्षक यांच्या बदल्यांची प्रतिक्षा खात्याला आणि जनतेला लागली आहे. कारण, त्यानंतरच कोणत्या पोलीस ठाण्यात कोण पोलीस निरीक्षक हे निश्चित होणार आहे. त्यानंतर एपीआय आणि पीएसआय यांच्या बदल्या होतील. तेव्हा आता खऱ्या अर्थाने जे आज पोलीस बदलीच्या प्रतिक्षेत असून संभ्रमात आहे. तो दूर होऊन बदल्यांनंतर खातं स्थिर होणार आहे. ही घटीका आता जवळ आली असून जो तो पुढारी व ओळखीच्या व्यक्तींकडे सेटींग लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.

         आता आज या बदल्यांमध्ये आणखी एक बदली भुवया उंचावणारी झाली आहे. ती म्हणजे अहमदनगर मध्ये नव्यानेच रुजू झालेले अप्पर पोलीस अधिक्षक दत्ताराम राठोड यांची  बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी सौरभ कुमार अग्रवाल यांची नगर अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, राठोड हे नेमके कोणाला नडले की, त्यांनीच काही बदली वैगरे करुन घेतली हे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. सन २०१६ साली आर रामासामी यांची अशीच अचानक बदली करण्यात आली होती.