बाप रे! संगमनेरात अवैध धंद्यांवर थेट आयजीं साहेबांचे छापे.! तीन गुन्हे 20 आरोपी, 3 लाख मुद्देमाल...

सार्वभौम (संगमनेर) :- 

                    संगमनेर तालुक्यात चक्क पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या विशेष पथकाने तीन ठिकाणी छापे टाकले आहेत. यात तब्बल 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 20 जणांना आरोपी करण्यात आले आहेत. त्यामुळे, संगमनेर शहर आणि तालुक्यात अवैध धंद्यांना नेमके कोण पाठीशी घालत आहे. किंवा येथे पाच पोलीस ठाणे, पोलीस उपाधिक्षक कार्यालय असून यांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तर आज संगमनेर शहरात राहुल मदने हे पदभार घेण्यासाठी आले असता काही नाट्यमय घडामोडी घडल्या तरी त्यांना एसपी किंवा अप्पर पोलीस अधिक्षकांनीच नव्हे तर थेट आयजींनी सलामी दिली आहे. त्यामुळे, या तो ट्रेलर है.! पिक्चर अभी बाकी है! अशीच सुचना त्यांना नकळत मिळाली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांच्यासह पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे. त्यामुळे, संगमनेरात जुगार, मटका, दारु, वाळु हे सर्रस सुरू असल्याचे समोर आले आहे. यांच्यावर वचक निर्माण करुन धंदा बंद करणे हेच पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांच्यापुढे आव्हान असणार आहे. ते हे आव्हान पेलतात का? हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

डॉ. प्रतापराव दिघावकर साहेबांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांच्या पथकाने दि. 29 ऑक्टोबर 2020 रोजी संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे हॉटेल यादगारच्या पाठीमागे एका पत्र्याच्या घरात सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यात 15 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 2 लाख 29 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिपक राजेंन्द्र ठाकुर (पोलीस मुख्यालय धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आशरफ समशेरअली जहागिरदार (रा. संगमनेर तालुका) ताराचंद दत्तादत्रय गरगे (वय 30 वर्षे रा. जयभवानी हॉटेलजवळ संगमनेर), निहाल निसार शेख (वय 40, रा. वडगावपान ता.संगमनेर),  लक्ष्माण गंगाधर पानसरे (वय 65, रा. कोकणगाव ता.संगमनेर),  शिवाजी बापु गवळी (वय 35, रा, माळेगाव ता.संगमनेर), संतोष निवृत्ती भोसले वय 25, रा. कोंची ता, संगमनेर) विकास दिपक गायकवाड (वय 23, रा. निळवंडे) जगन बन्सी भिडे (वय 64. रा.टोलनाक्याजवळ वडगावपान ता संगमनेर), बाबासाहेब मारुती गवळी (वय 49 रा. वडगावपान ता.संगमनेर) विकास कांतीलाल जाधव (रा. वडगावपान ता, संगमनेर) महेंन्द्र भैय्यासाहेब गायकवाड (वय 30, रा. वडगावपान ता.संगमनेर) संजय गुलाब गायकवाड (वय 31 रा.वडगावपान ता.संगमनेर), भाऊसाहेब चंद्रकांत कोल्हे (वय, 38 रा. करुले  ता.संगमनेर) दशरथ (रा. वडगावपान ता.संगमनेर) अशा 15 जणांना आरोपी करण्यात आले आहे. हे सर्व संगनमताने पैसे लाऊन टाईम नावाचा जुगाराचा खेळ खेळताना व खेळविताना मिळून आले आहेत. यांच्याकडून 2,29,560 रुपये किंमतीची जुगाराची साधने  व मोटार सायकल व रोख रक्कम 7610 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

तर हा छापा टाकल्यानंतर हे विशेष पथक शहरात दाखल झाले. यांनी संगमनेरात कृषि प्रोड्युसर कंपनी दुकानाच्या शेजारी सुरू असणार्‍या कल्याण नावाच्या मटक्यावर छापा टाकला. यात दोघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून 52 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेंबल दिपक राजेंद्र ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अशरफ जहागीरदार (रा. संगमनेर) व मच्छिंद्र लक्ष्मण काकडे (रा. साळीवाडा, ता. संगमनेर) अशा दोघांना अटक केली आाहे.

या ठिकाणी छापा टाकल्यानंतर या पथकाने आरगडे गल्लीकडे आपला मोर्चा वळविला. तेथे त्यांनी अशाच कल्याण मटना जुगारावर छापा टाकला. यात या विशेष पथकाच्या हाती 96 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हाती लागला. यात तिघांना आरोपी करण्यात आले असून दोघांना अटक केली असून एक पसार असल्याची माहिती या पथकाने दिली आहे. यात कपिल धर्माजी चिलका (रा. पदमानगर, मालदाड रोड संगमनेर), जयवंत अरविंद अभंग (रा. घोडेकरमळा, रंगारगल्ली, संगमनेर) व शंकर भागप्पा इटप (रा. तेलीखंट, संगमनेर) या तिघांना आरोपी करण्यात आले आहे. याप्रकरणी विश्वेश सुरेश हजारे (दोंडाईचा पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान गेल्या कित्तेक वर्षानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी त्यांचे विशेष पथक निर्माण केले आहे. यापुर्वी असे कधी झाल्याचे दरम्यानच्या काळात पहायला मिळाले नाही. तर असे बोलले जात होते की, अनेक बड्या अधिकार्‍यांना त्यांचा मलिदा रात्री अपरात्री अगदी बिनबोल पोहच होत होता. त्यामुळे, बड्या अधिकार्‍यांची पथका कधी नगर जिल्ह्यात दाखल झाली नाहीत. आता मात्र, अशा पथकांमुळे अवैध धंद्यावाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. तर वर्षानुवर्षे अवैध धंद्यांना पाठबळ देणार्‍या अधिकार्‍यांच्या देखील आता अंगावर काटा फुटला आहे. यापुर्वी नगर जिल्ह्यात तत्कालीन अप्पर पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे सर जे आता कोल्हापूर येथे पोलीस अधिक्षक आहेत. त्यांनी अशा प्रकारचे विशेष पथक तयार केले होते. हे पथक तेव्हा कोणाच्या दबावाला किंवा अर्थपुर्ण तडजोडीला कधी बळी पडले नाही. यांनी मोठमोठ्या कारवाया करुन जिल्ह्यात आपल्या अधिकार्‍याचा एक चांगला चेहरा निर्माण केला होता. त्यानंतर एक विशेष पथक म्हणजे काय? याचा नमुना विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांच्या रुपाने पहायला मिळाले आहे.

दरम्यान आज पोलीस राज्यात पाचशे पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात नगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार तसेच पोलीस निरीक्षक बहिरट यांची पुण्याला बदली झाली आहे. दिलीप पवार यांची कामगिरी प्रचंड यशस्वी असली तरी अनेक वेळा ते वादात सापडले होते. मात्र, नगर जिल्ह्यातील रस्तालुट (कलम 392), दरोडे (कलम 395), दरोड्याच्या तयारीत असणारे (कलम 399) यापलिकडे गावठी कट्टे (आर्म अ‍ॅक्ट), तडिपारी, खून (कलम 302) यातील आरोपी असे एक हजार पेक्षा जास्त आरोपींना त्यांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे 399 कलमाचा पुरेपुर वापर करुन येथील रस्तालुट, दरोडे आणि चोर्‍या रोखण्याचे काम जर कोणी केले असेल तर दिलीप पवार यांचे नाव पहिल्यांदा नक्की येईल. पवार यांची बदली झाल्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत आता कोणाची वर्णा लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

यापलिकडे आता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत आपला नंबर लागावा म्हणून जिल्ह्यातील पाच पोलीस अधिकारी मोठी सेटींग लावण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, अद्याप परिक्षेत्राच्या बदल्या सुरू असून कोणीतरी अधिकारी बाहेरून देखील येऊ शकतो. जळगाव वैगरे येथून देखील काही अधिकारी येणार आहेत. त्यामुळे, अजून चारदोन दिवस एलसीबीवर कोण राज्य करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. जे दोन अधिकारी येथे टिकूण राहणार होते. त्यापैकी काहींच्या बदल्या झाल्याने अनेकांच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. आता पोलीस दलाचा छोटा एसपी कोण? हे थोड्याच दिवसात पहायला मिळणार आहे.