सैराट प्रकरण; प्रियकाराने प्रेयसिचे मुंडके कापले, झटपट झाली जन्मठेप.!

सार्वभौम (अहमदनगर) :- 

                      लग्नास नकार दिला म्हणून प्रियकराने प्रेयसिचे मुंडके कापल्याची धक्कादायक घटना दि. 26 मे 2016 रोजी नगर शहरातील भोसले आखाडा परिसरात घडली होती. हत्या करुन रक्ताळलेला कोयता हातात घेऊन थेट पोलीस ठाण्यात हजर झालेला आरोपी प्रदिप माणिक कणसे (वय 25, रा. लातूर) यास सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी अटक केली होती. त्यानंतर या गुन्ह्याचा सखोल तपास करुन हजारो पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. आज मंगळवार दि. 27 ऑक्टोबर रोजी जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी वकील अ‍ॅड. सतिष पाटील यांचा युक्तीवाद आणि सबळ पुरावे यांच्या आधारे जिल्हा सत्र न्यायाधीश आणेकर यांनी प्रदिप कणसे यास जन्मठेप व 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रदिप कणसे हा एका अनुसुचित जातीच्या मुलीवर फार प्रेम करीत होता. ती अल्पवयीन होती. मात्र, तरी देखील ते संपर्कात होते. कणसे हा एकुलता एक मुलगा असून तो पुण्यात बस चालकाची नोकरी करीत होता. ही दोघे एकाच जिल्ह्यातील व तालुक्यातील असले तरी यांच्यातील संपर्क घरच्यांना समजले होते. दरम्याच्या काळात या मुलीस तिच्या घरच्यांनी नगर येथे काकांच्या घरी पाठविले होते. यावेळी त्यांचा ऐकमेकांशी संपर्क झाला. मात्र, दोन वेगवेगळ्या जाती असल्यामुळे त्यांचा कधीही विवाह होऊ शकत नाही. हे मुलीस माहीत होते. त्यामुळे, जेव्हा-जेव्हा त्यांचा संपर्क होत असे तेव्हा-तेव्हा ती लग्नास नकार देत असे. मात्र, प्रदिपचे तिच्यावर फार प्रेम होते. "तू जर माझी झाली नाही तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही" यावर तो ठाम होता.

दरम्यान, मयत मुलगी काकांकडे आल्यानंतर दि. 26 मे 2016 रोजी प्रदिप हा नगरला येऊन एका लॉजवर थांबला. नंतर त्याने तिच्याकडे लग्न करण्यास साद घातली. मात्र, ही "समाज व्यवस्था" आपल्या विवाहास मान्यता देणार नाही. पुढे त्रास होण्यापेक्षा लग्नाची विषय बंद करावा असे ती त्याला सांगत होती. मात्र, हे प्रदिपला मान्य नव्हते. त्यामुळे तो थेट बाजारात गेला. तेथे त्याने एक कोयता विकत घेतला, त्याला धार लावणार्‍या व्यक्तीकडून धार लावून घेतली आणि थेट तिचे घर गाठले. त्याने या मुलीस एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर बोलविले. तेथे त्यांची भेट झाली आणि त्याने पुन्हा या मुलीस लग्न करण्यास विनंती केली. यावेळी त्यांच्यात चर्चा झाली मात्र, त्यातून कोणताही मार्ग निघाला नाही. त्यामुळे, "तू माझी झाली नाही तर मी तुला कोणाचे होऊ देणार नाही" असे म्हणत त्याने आपल्या प्रेयसिच्या मुंडक्यावर सपासप वार केले. तो रोष इतका होता की, त्याने घाव घातल्यानंतर मुंडके पाहण्याजोगे राहिले नव्हते.

अर्थात, प्रदिप आता कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार झाला होता. मात्र, तो खून करुन पसार झाला नाही ना तो दडून बसला. त्याने कोयता हातात घेऊन मुख्यरस्ता गाठला आणि एका रिक्षाला हात करुन थेट कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यावेळी तेथे पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर आणि सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण हे हजर होते. त्यांनी हा सर्व प्रकार ऐकला व पाहिला आणि कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही. यासाठी पहिले प्रयत्न सुरू केलेे. याचे कारण म्हणजे, त्यावेळी नगर जिल्ह्यात "कोपर्डी" प्रकरण अगदी ताजेच होते. यात मुलगी मराठा तर आरोपी दलित होतेे. या प्रकरणामुळे, राज्य पेटून उठले होते. तर या घटनेत मुलगा मराठा आणि मयत मुलगी दलित होती. त्यामुळे, निमित्ताला कारण नको. त्यासाठी पोलिसांनी थेट घटनास्थळ गाठले. तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. आरोपीने कोयता कोठून घेतला, तो ठेवण्यासाठी पिशवी कोठून घेतली, तो रात्री रहायला कोठे होता, त्याने हत्या का व कशी केली. तो कोणत्या रिक्षात पोलीस ठाण्यात आला. असे अनेक "सर्कमटन्स इव्हिडन्स" पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी जमा केला.

दरम्यान, पोलिसांनी घडलेल्या या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रचंड खबरदारी घेतली होती. अन्यथा काही व्यक्तींनी याच जातीय व्यवस्थेचा फायदा घेऊन हे प्रकरण कुठच्या कोठे नेले असते. मात्र, सुदैवाने असे काही झाले नाही. ही पोलिसांची उत्तम कामगिरी म्हणावी लागेल. या दोन वेगवेळ्या जातीच्या व्यक्तींच्या घटना घडून देखील यात जातीय आंदोलने किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. इतकी खबरदारी बाळगून विनोद चव्हाण यांनी या घटनेचा सखोल तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याबाबत त्यांच्या तपासावर निलंगा जिल्हा लातूर येथील मयत मुलीचे नातेवाईक देखील समाधानी होते.  कारण, यापुर्वी चव्हाण यांच्या 27 गुन्ह्यात शिक्षा तर एका गुन्ह्यात जन्मठेप लागलेली होती. त्यामुळे, यात देखील नातेवाईकांनी कठोर शिक्षेची अपेक्षा व्यक्त केली होती.

दरम्यान, हा खटला सन 2016 ते 2020 या काळात सुरू राहिला. यात कोविडचा आडथळा निर्माण झाला होता. मात्र, तरी देखील 50 ते 60 जणांचे जबाब नोंदविण्यात आले होते. यावर प्रतिवादी पक्षाने या मयत मुलीची हत्या तिच्या नातेवाईकांनी केली असून कणसेला या खटल्यात गोवण्यात आले आहे. ही त्याच्यावर खोटी एफआयआर दाखल केली आहे असा युक्तीवाद करण्यात आला होता. मात्र, सपोनी विनोद चव्हाण यांनी असे काही दोषारोपत्र तयार केले होते की, कणसे ज्या हॉटेलवर राहिला तेथील पुरावे आणि मालकाचे जबाब, ज्याच्याकडून कोयता घेताला त्याचे जबाब, बाजारातून ज्याच्याकडून पिशवी घेतली होती त्याचे जबाब, इतकेच काय! तो ज्या रिक्षाने आला होता त्याचे जबाब, वैद्यकीय अधिक्षकांचे जबाब, पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड यांचे जबाब असे अनेक सबळ पुरावे आणि परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात सादर केले होते. त्यांच्या आधारावर जिल्हा सरकारी वकील सतिष पाटील यांनी प्रबळ युक्तीवाद करुन प्रतिवाद्यांचा युक्तीवाद खोडून काढला. त्यानंतर दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी कणसे यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.