लांडग्याची धुमाकुळ, ११ जणांना चावला आणि लगेच मेला.! संगमनेरातील घटना.!
सार्वभौम (संगमनेर) : - संगमनेर तालुक्यातील कनोली, हंगेवाडी, शेडगाव, शिबलापूर व माळेवाडी या परिसरात पिसाळलेल्या लांडग्याने धुमाकूळ घातला. यावेळी त्याने हंगेवाडी व शेडगाव परिसरातील माजी पंचायत समिती सभापती यांच्यासह तब्बल दहा जणाना चावा घेत गंभीर जखमी केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की, शनिवारी दि. 24 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हंगेवाडी येथील माजी पंचायत समिती सभापती अंकुशराव कांगणे, मिराबाई सांगळे, अनुसया सांगळे याना पिसाळलेल्या लांडगा प्राण्याने चावा घेऊन जखमी केले. तर शेडगाव येथील कैलास सांगळे, निता सांगळे, शंकर सांगळे, भिका फड, मारुती नागरे व अन्य तिघांना देखील पिसाळलेल्या लांडग्याने चावा घेऊन जखमी केले. तर या जखमीना तातडीने संगमनेर येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली. तर, काहींवर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहे.
दरम्यान, कनोली येथे 5 वाजण्याच्या सुमारास हा पिसाळलेला लांडगा आढळून आला होता. तो पुढे जात हंगेवाडी, शिबलापूर, शेडगाव, माळेवाडी परिसरात गेला. येथे ह्या पिसाळलेल्या लांडग्याने अनेकांना चावा घेतला. या घटनेमुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये काहीकाळ दहशतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे, लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी घटनेची माहिती दिली. त्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. परंतु, नेहमीप्रमाणे त्यांचे वरातीमाघून घोडे अशी अवस्था पाहायला मिळाली. वनविभागाने पिसाळलेल्या लांडग्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पानोडी गावच्या परिसरात हा पिसाळलेला लांडगा मयत अवस्थेत मिळाला. सदर घटनेचा वनविभागाने पंचनामा केला आहे. तो कसा मयत झाला याबाबत विचारणा केली असता सांगण्यात आले की, एखादा प्राणी पिसाळला तर तो काही काळानंतर मयत होते. हा लांडगा देखील असाच मयत झाला आहे. तर पानोडी परिसरात या पिसाळलेल्या लांडग्याने काही नागरिकांना चावा घेतला असता, तेथे असणाऱ्या जनसमुदयाने त्याला मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची परिसरात एकच चर्चा सुरू आहे. दरम्यान वनाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अशी कुठलीही घटना झालेली नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर हे तरस नसून लांडगा असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.