कोर्टात साक्ष देऊ नये म्हणून महिलेच्या पाठीत खोरे तर पुरूषाच्या डोक्यात गज घातला.! अकोल्यातलं एक गाव पेटलं.!
अकोले तालुक्यातील टाहाकारी येथे दोन गटात तुंबळ हाणामार्या झाल्या. गेल्या पंधरा दिवसांपासून टाहाकारी येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र, अद्याप कायद्याचा वचक दाखवून पोलिसांना त्यावर नियंत्रण आणता आलेले नाही. त्यामुळे, गेल्या पंधरा दिवसात जवळ-जवळ एकट्या टाहाकारी गावात तीन ते चार गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी कोणाकोणाला अटक केले आणि कोणावर कठोर कारवाई केली. याची माहिती मिळून शकली नाही. मात्र, एक गुन्हा दाखल झाल्यानंतर कडक कारवाई आणि प्रतिबंधात्मक कारवाई केली तर मात्र अशा गुन्ह्यांना वाव मिळत नाही. त्यामुळे, टाहाकारीत शांतता प्रस्तापीत करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आशा विजय एखंडे (रा. टाहाकारी, ता. अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मी माझ्या घरात होते. तेव्हा आरोपी हे म्हणाले की, तुझा नवरा कोठे आहे. तो आमच्या विरोधात असणार्या चोरीच्या गुन्ह्यात साक्ष देणार आहे. असा समज करुन आशा यांच्या राहत्या घरात त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर त्यांचे पती विजय किसन एखंडे यांना आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपी भाऊसाहेब आबाजी एखंडे यांनी त्यांच्या हातातील काठी डोक्यावर अंगावर, पायावर व दोन्ही हातांवर जबर मारहाण केली.
दरम्यान आरोपी सखाराम आबाजी एखंडे याने त्याच्या हातातील फावड्याने आशा यांच्या डाव्या गुढग्यावर व पाठीवर मारहाण केली. त्यानंतर आरोपी हौशीराम भाऊसाहेब एखंडे याने त्याच्या हातातील लोखंडी गजाने विजय एखंडे यांच्या पायावर तसेच डोक्यात मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी आशा एखंडे या मध्ये पडल्या असता त्यांना देखील लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी केली. त्यानंतर जाताना त्यांनी धमकी दिली की, तुझ्या नवर्याने जर आमच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली तर तुला आम्ही जीवे ठार मारु. त्यानंतर जे जखमी झाले होते त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान 16 ऑक्टोबर पासून जखमी उपचार घेत आहेत. मात्र, त्यानंतर 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आशा एखंडे यांनी अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी भाऊसाहेब आबाजी एखंडे, हौशीराम भाऊसाहेब एखंडे, सखाराम आबाजी एखंडे, दिलीप भाऊसाहेब एखंडे, ज्ञानेश्वर सखाराम एखंडे, संकेत हौशीराम एखंडे, मनिषा दिलीप एखंडे (सर्व रा. टाहाकारी, ता. अकोले, जि. अ.नगर) अशा सात जणांना याप्रकरणी आरोपी केले आहे. तर यात जखमी व्यक्तीस सांगलाच मार लागला असून या घटनेत पुन्हा दुसरा गुन्हा देखील दाखल झाला आहे.
याबाबत दुसर्या गुन्ह्यात फिर्यादी सखाराम आबाजी एखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 16 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सखाराम एखंडे व त्यांचा पुतण्या शेतात काम करुन आरोपी यांच्या घरासमोरुन जात होते. त्यावेळी आरोपी विजय किसन एखंडे यास सखाराम हे म्हणाले की, तुम्ही आमच्या शेतात जनावरे का सोडली? त्यामुळे आमचे फार नुकसान झाले आहे. असे विचारल्याचा राग आल्याने आरोपीने लागेच लाथाबुक्क्या व काठीने मारहाण सुरु केली. जर माझ्या नादाला लागाल तर जीवे मारुन ठाकीन अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर सखाराम एखंडे यांनी दुसर्या दिवशी थेट पोलीस ठाणे गाठले. घडला प्रकार पोलिसांपुढे कथन केला असता फिर्यादीनुसार पोलिसांनी विजय किसन एखंडे, अनिल किसन एखंडे, पंकज विजय एखंडे, अविनाश अनिल एखंडे, मंगला अनिल एखंडे (सर्व रा. टाहाकारी, ता. अकोले, जि. अ.नगर) यांना आरोपी केले आहे. या घटनेचा पुढील तपास भोसले करीत आहेत.
तर या व्यतिरिक्त यापुर्वी याच गावात आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे. त्याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 13 ऑक्टोंबर रोजी रामदास विष्णु एरवंडे (रा. टाहाकारी, ता. अकोले) यांनी एका फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी माझ्या घरात असताना आरोपी हे ओढ्यावर आले व म्हणाले की, तू कोणाच्याही शेतात जायचे नाही. त्यावेळी रामदास हे त्यांना समजून सांगण्यासाठी गेले असता आरोपी यांनी त्यांच्या कानफाडीत मारली. यावेळी एक व्यक्ती सोडविण्यासाठी आली असता त्यांना देखील ढकलून देत लाथाबुक्यांनी मारहाण केली. आमच्या नादाला लागाल तर पाहून घेऊ असे म्हणून शिवीगाळ दमदाटी केली. हा प्रकार रामदास एरवंडे यांनी पोलीस ठाण्यात कथन केला असता पोलिसांनी गंगाधर विष्णु एरवंडे, महेश गंगाधर एरवंडे, मुकूंद गंगाधर एरवंडे, सुप्रिया गंगाधर एरवंडे (रा. टाहाकारी, ता. अकोले) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास गोराणे करीत आहेत.