मुलानेच मित्र-मैत्रिणीच्या मदतीने घर फोडले.! आर्ई वडिलांचे 2 लाखांचे सोनेे चोरले.! आईने ठोकला मुलासह तिघांवर गुन्हा!

सावभौम (संगमनेर) :- 

                 ऐकावे ते नवलच.! अशा घटना आजकाल संगमनेरमध्ये घडताना दिसू लागल्या आहेत. कारण, आता स्वत:च्या राहत्या घरातच मुलाने आपल्या मित्र मैत्रीनीला हाताशी धरुन चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलाने चक्क आईच्या गळ्यातील मिनी गंठण, बापाची चैन आईच्या कानातील रिंगा झुबे आणि घरातील अन्य साहित्य असा 3 लाख 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल तिघांनी चोरुन नेला असून तो नाशिकच्या एका सोनाराला विकला आहे. अशा प्रकारची फिर्याद चक्क आपल्या जन्मदात्या आईने संगमनेर पोलीस ठाण्यात मुलासह तिघांच्या विरोधात दिली आहे. त्यामुळे याप्रकारणी मंगल संजय डमरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरातील एमएससीबी कॉलनी मालदाड रोड येथे मंगल संजय डमरे या ताई राहतात. त्या मंगळवार दि. 20 ऑक्टोबर रोजी घराबाहेर गेल्या असता त्यांचा मुलगा नाशिक येथून आला व त्याने बंद घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. या कामासाठी त्याने त्याचा नाशिकचा एक मित्र व मैत्रिण आणली होती. घरात गेल्यानंतर यांनी घरातील साहित्यांची उचकापाचक केली. तर कपाटात ठेवलेले आईचे 20 हजार रुपयांचे सोनाचे गंठण, 75 हजार गळ्यातील सोन्याची चैन, 87 हजार सोन्याचे कानातले झुबे व रिंगा, 25 हजार रुपयांची एक दुचाकी आणि 5 हजार रुपयांची पावर बँक व तीन घड्याळे असा 2 लाख 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल त्यांनी चोरुन नेला आहे.

दरम्यान, आपल्या आईने मुलगा आतीष संजय डमरे याच्याकडे विचारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, आपल्या मुलाची पार्श्वभूमी पाहता आणि काही संशयित गोष्टी लक्षात आल्यामुळे त्यांनी आतीष याच्यासह त्याचा मित्र सुरज वाघ आणि मैत्रीन निकीता वाघ यांच्या विरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानूसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पोलिसांनी काही संशयित गोष्टींचा छडा लावला असून तत्काळ या गुन्ह्याची उकल होईल असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, ही चोरी केल्यानंतर आरोपी यांनी काही सोने नाशिक येथील एका सोनाराला विकले असल्याचे समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी नाशिक येथे चौकाशी सुरू केली असून काही मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र, अद्याप यात आणखी मुद्देमाल कोठे आहे, आणखी यात कोणकोण सामील आहे. याचा सखोल तपास सुरू आहे. मात्र, अशा प्रकारचे आईने आपल्या मुलाला पाठिशी न घालता त्याच्यावर थेट गुन्हा दाखल केल्याने एक वेगळीच चर्चा रंगली आहे. एकादा मुलास धडा शिकल्याशिवाय तो ठिकाण्यावर येणार नाही त्यामुळे या माऊलीने अशा प्रकारे गुन्हा नोदविल्याचे बोलले जात आहे.