प्राचार्य व पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी चार महिलांवर गुन्हा दाखल.! संगमनेर तालुक्यातील घटना.!
सावभौम (संगमनेर तालुका) :-
संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथे प्राचार्य अशोक गुंजाळ व त्यांची पत्नी उज्वला गुंजाळ (रा. मालदाड रोड) यांना दहाव्याच्या विधीत मारहाण करण्यात आली होती. हा प्रकार सोमवार दि. 19 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास घडला होता. त्यानंतर ज्या महिलांना या दाम्पत्यास मारहाण केली. त्यांच्या विरोधात उज्वला अशोक गुंजाळ यांनी याप्रकरणी सोमवारी सायंकाळी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात चिखलीच्या चार महिलांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली असून या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
याबाबत उज्वला गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवार दि. 19 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास आम्ही निमगाव खुर्द येथे पुनम कासार हिच्या दहाव्याच्या विधीसाठी गेलो होतो. तेथे पुनमचे नातेवाईक आणि इतर लोक देखील आले होते. हा विधी आटपत आल्यानंतर तेथील काही महिलांनी आम्हाला शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरूवात केला. मात्र, आम्ही काही एक बोललो नाही. या दरम्यान पल्लवी सौरभ हासे, संगिता विलास हासे, स्वाती नवनाथ हासे व लिला हासे या महिला आल्या व त्यांनी माझ्या पतीस मारहाण करण्यास सुरूवात केली. हा प्रकार मी पाहिला असता मी पतीस सोडविण्यासाठी गेले तर या महिलांना मला देखील मारहाण केली. तसेच या दरम्यान माझ्या गळ्यातील सोन्याचे गंठण गहाळ झाले आहे. असे उज्वला यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या 10 महिन्यांपुर्वी अमोल आबासाहेब कासार याचा विवाह पुनमसोबत झाला होता. या दरम्यान पुनमच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांकडे 04 लाख रुपयांची मागणी केली. त्यासाठी पती अमोल कासार, सासरा आबासाहेब कासार व सासू अलका आबासाहेब कासार यांनी तिचा शारिरीक व मानसिक छळ सुरू केला. हे सर्व असहाय्य होऊ लागल्यानंतर अखेर सासरच्या त्रास कंटाळून शनिवार दि. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी पुनमने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर पोलीस ठाण्यात पती, सासू सासरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान अशोक गुंजाळ व हे अमोल आबासाहेब कासार याचे मामा आहेत. त्यांचे व मयत मुलीच्या नातेवाईकांचे मतभेद झाले होते. त्यामुळे, त्यांच्यावर हासे परिवाराचा रोष होता. दरम्यान दहाव्याच्या कार्यक्रमात हे मतभेदाचे रुपांतर अधिकच्या रोषात निर्माण झाले व हा प्रकार घडला आहे. तर यात मयत मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या तपासासह अनेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहे. त्यामुळे, या घटनेत पुढे काय होते. याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.