सह्याद्री कॉलेजचे प्राचार्यांना दहाव्यात 10 ते 15 महिलांकडून बेदम मारहाण.! संगमनेर तालुक्यातील घटना.!



सार्वभौम (संगमनेर तालुका) :-

                      संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथे सह्याद्री कॉलेजचे प्राचार्य अशोक गुंजाळ (रा., खांडगाव, ता. संगमनेर) यांना 10 ते 15 महिलांनी दहाव्याच्या विधीत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज सोमवार दि. 19 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. गेल्या दहा दिवसांपुर्वी पुनम अमोल कासार (वय 23, रा. निमगाव खुर्द) या तरुणीने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. यावेळी लाखो रुपये देऊन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न गुंजाळ करीत होते. त्यामुळे, त्यांच्यावर पुनमच्या नातेवाईकांचा राग होता. तर आज गुंजाळ व त्यांचे कुटुंब पुनमच्या विधीसाठी आले असता त्यांना महिलांनी पाहिले आणि दहा दिवस मनात दाबून ठेवलेला राग व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ नगर जिल्ह्यात अगदी वार्‍यासारखा पसरला होता. याप्रकरणी पोलिसांनी उशिरा हस्तक्षेप केला आहे.


यबाबत सविस्तर माहिती अशी की, 10 महिन्यांपुर्वी अमोल आबासाहेब कासार याचा विवाह पुनमसोबत झाला होता. या दरम्यान काही दिवस त्यांच्यात चांगला संसार चालला. मात्र, कालांतराने शेतीसाठी ट्रॉक्टर हवा म्हणून पुनमच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांकडे 04 लाख रुपयांची मागणी केली. मात्र, आई वडिलांना हा प्रकार कसा सांगावा? म्हणून तीने ही मागणी नेहमी पोटात ठेवली. मात्र, 4 लाखांसाठी पती अमोल कासार, सासरा आबासाहेब कासार व सासू अलका आबासाहेब कासार यांनी तिचा शारिरीक व मानसिक छळ सुरू केला. हे सर्व असहाय्य होऊ लागल्यानंतर पुनमने हा प्रकार तिचा भाऊ सौरभ विलास हासे (रा. चिखली. ता. संगमनेर) यास सांगितला. मात्र, आपल्या बहिनीचा संसार मोडायला नको म्हणून त्यांनी देखील थोडे दिवस त्यांची मानसिकता बदलण्याची वाट पाहिली. लवकरच काहीतरी मार्ग काढू असे प्रयत्न सुरू असताना पुनमच्या सासरच्यांना काही दम निघाला नाही. त्यांनी तिला त्रास देणे सुरूच ठेवले.

अखेर सासरचा त्रास अनावर झाल्यामुळे शनिवार दि. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी पुनमने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर अनेकांचे डोळे उघडले, तर पुनमच्या माहेरच्यांनी थेट निमगाव गाठले. तेथे गेल्यानंतर मोठा राडा झाला. हासे परिवाराने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. दिवसभर तणावपुर्ण वातावरणात निमगाव होते. तर हा प्रकार पोलिसांना समजताच त्यांनी निमगावात तळ ठोकला होता. प्रशासनाच्या विनंतीनंतर व कारवाईच्या आश्वासनानंतर रात्री उशिरा पुनमवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असताना मुलाचा मामा गुंजाळ यांनी लाखो रुपये देऊन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमची मुलगी जीवाने गेली आहे. ती पुन्हा येणार आहे का? हा आक्रोष नातेवाईकांचा कामय होता. त्यामुळे, गुन्हा दाखल करण्यासाठी अडथळा निर्माण करणार्‍या मामावर नातेवाईकांचा तेव्हापासून राग होता. आज सकाळी पुनमवर निमगाव येथील ओढण्यावर दहाव्याचा विधीसाठी ते आले असता काही महिलांनी त्यांना पाहिले आणि 10 ते 15 महिलांनी त्यांच्या दिशेने धाव घेत त्यांना बेदम मारहाण केली. संबंधित माहिती मयत मुलीच्या नातेवाईकांनी दिली आहे. तर इतके मोठे प्रकरण असून या विधीचे पोलिसांना गांभिर्य वाटले नाही. हे देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गेल्या आठवड्यात इथापे कॉलेजमध्ये एका प्राचार्याने दोन विद्यार्थीनींची छेडछाड केली होती. त्यानंतर आता या प्राचार्याने एक विद्यार्थी किंवा लेकीसारखी मुलगी मयत झाली आणि तडजोडी करुन असे गुन्हे मिटविण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, एक शिक्षकी पेक्षा असणारे सुज्ञ लोक असे करीत असतील तर यांना सामाजिक भान आहे की नाही? असा प्रश्न सामाजिक संघटनांनी उपस्थित केला आहे.