अकोल्यात झेडपी सदस्या सुषमाताई दराडे यांना घरात घुसून शिविगाळ व धक्काबुक्की.! परस्पर विरोधी गुन्हे दाखल

सावभौम (अकोले) :-

                   विकास कामांची माहिती विचारण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने अकोले तालुक्यातील समशेरपूर गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सुषमाताई बाजीराव दराडे (रा. नागवाडी, समशेरपूर ता, अकोले) यांना त्यांच्या घरात घुसून शिवीगाळ, दमदाटी करीत धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सुषमा दराडे यांनी अकोले पोलीस ठाण्यात  आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे ढामसे शेतकरी गट शेणीत या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव आनंदा ढामसे यांच्यावर विरोधात फिर्याद दाखल केली आहे. यात पोलिसांनी चौकशी अंती गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवार दि. 10 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास झेडपीच्या समशेरपूर गटाच्या सदस्या सुष्माताई बाजीराव दराडे या त्यांच्या घरी होत्या. यावेळी त्यांचे पती बाजीराव दराडे हे कामानिमित्त घराबाहेर गेल्याने घरी सुषमाताई व त्यांच्या दोन पुतण्या व सासुबाई होत्या. या दरम्यानच्या काळात एक इसम त्यांच्या घरी आला व तो थेट घरात घुसला. त्यावेळी त्यांनी विचारणा केली की, तू कोण आहे.? थेट घरात का घुसतो आहे. त्यावेळी तो म्हणाला मी नामदेव आनंदा ढामसे (रा.शेणीत, ता. अकोले) आहे. तुम्ही आमच्या गावात पाणी पुरवठा नळ योजनेचे व रस्त्याचे उद्घाटन केले होते. परंतु ती कामे पुर्ण होत नाही. तुम्ही आमच्या गावात आल्यानंतर मला का विचारत नाहीत. त्यावर दराडे यांनी उत्तर दिले की, सध्या जोरदार अतिवृष्टी असल्यामुळे कामकाज बंद आहे. पाऊस उघडल्यानंतर विकासकामे सुरू होतील. त्या असे म्हणाल्याचा राग येऊन नामदेव ढामसे याने वाईटसाईट शिविगाळ करुन धक्काबुक्की केली. तुम्ही जर दोन दिवसात काम चालु केले नाही तर तुम्ही गावात आल्यानंतर तुमचा बेद पाहु असा दम दिला. अशा प्रकारची फिर्याद सुषमा दराडे यांनी अकोले पोलीस ठाण्यात दिली आहे.

तर याच प्रकरणात नामदेव आनंदा ढामसे (रा.शेणीत, ता. अकोले) यांनी काल रात्री बाजीराव दराडे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यात ते म्हटले आहे की, मी नामदेव ढामसे व सागर विष्णु तळपाडे (रा. सांगवी. ता. अकोले) अशी दोघे रविवार दि. 11 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झेडपीच्या समशेरपूर गटाच्या सदस्या सुष्माताई बाजीराव दराडे यांच्याकडे गेलो होतो. त्यावेळी समशेरपूर गटातील शेणीत गावचे पंचक्रोशीतील रखडलेल्या विविध विकास कामांबाबत चर्चा करत होतो. तेव्हा बाजीराव दराडे यांना देखील प्रत्यक्ष भेटलो होतो.

दरम्यान त्यांना डामसे यांनी विचारणा केली होती की, साहेब.! मार्च 2020 मध्ये शेणीत गावातील पाणी पुरवठा नळ योजनेचे आपण उद्घाटन केले होते. तसेच देवगाव फाटा ते डामसेवाडी डांबरीकरण रस्ता उद्घाटन केला होता. त्या कामांच्या उद्घाटनाच्या वेळी काम पंधरा दिवसात सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सदरचे काम अद्याप सुरू न झाल्याने त्या रोडला फार खड्डे पडले आहेत. परिणामी त्यामुळे, संबंधित रस्त्याने शेती आवजारे आणि वाहनांना जाण्यासाठी प्रचंड त्रास होत असून तेथे किमान माती किंवा मुरूम तरी टाका. हे सर्व संभाषण सुरू असताना हे लोक आपल्या चर्चेची शुटिंग काढत असल्याचा संशय बाजीराव दराडे यांना आला व ते दोघांवर अचानक धावून गेले. आत्ताच्या आत्ता येथून चालते व्हा. या दोघांना अश्लिल शिवीगाळ करीत दराडेला जाब विचारण्यासाठी इथवर येण्याची तुमची हिंमत कशी झाली असे म्हणून शिवीगाळ करत डामसे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

आत्ताच्या आत्ता येथून चालते व्हा. नाहीतर ठार मरुन टाकीन असे म्हणून धमकी दिली. त्यानंतर दराडे यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये बळजबरीने शुटिंग सुरू केली व मी सांगेल त्याप्रमाणे बोल असे म्हणून पुन्हा दमदाटी केली. त्यानंतर मोबाईलमध्ये शुटिंग काढत डामसे यांच्याकडून वदून घेतले की, मी दारुच्या नशेत चुकून बाजीराव दराडे यांच्या घरी आलो. आता माझी चुक झाली, पुन्हा मी त्यांच्या घरी येणार नाही असे वदून घेत डामसे यांच्या ताब्यातील मोबाईल काढून घेतले. त्यातील सर्व डाटा डिलीट करुन दुसर्‍या दिवशी ते मोबाईल सांगवी येथे बाजीराव दराडे यांनी स्वत: आणून दिले. त्यामुळे, त्यांना मला मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी केली असून माझी त्यांच्या विरोधात तक्रार आहे. असे ढामसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, यात दोन परस्पर विरोधी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात दोन्ही फिर्यादीत प्रचंड संदिग्धता आहे. जर सखोल तपास केला तर यात उलट पोलीस कारवाई करू शकतात. विशेष म्हणजे एका फिर्यादीत म्हटले आहे 11 तारखेला  6 वाजता घटना घडली तर दुसर्‍या फिर्यादीत म्हटले आहे 10 तारखेला 8:30 वाजता घटना घडली. या पलिकडे दोन्ही फिर्यादी मोठ्या रंगतदार असून त्यातील वास्तव पोलीस समोर आणू शकतील. मात्र, दुर्दैव असे की, पोलिसांनी देखील फिर्याद घेताना तपासी अधिकारी म्हणून येथून बदलुन जाऊन जमाना झालेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर साहेब यांना तपासी अधिकारी दाखविले आहे. म्हणजे पोलिसांमध्ये देखील काही पारदर्शी व मन लावून केलेला कारभार दिसायला तयार नाही. पाहू... घोडा आणि मैदान आता समोरासमोर आहे....

""""""""""""""""""""""""""""""""""

 प्रिय वाचक मित्रांनो.!

         सांगताना अत्यानंद होतो की, आज या बातमीच्या रुपाने रोखठोक सार्वभौमने १ कोटी वाचकांचा पल्ला गाठला आहे. गेल्या १५ महिन्यांपुर्वी जन्माला आलेले हे पोर्टल अवघ्या ८५१ बातम्या व अभ्यासपुर्ण लेखात १ कोटी वाचक करु शकले. कोणाकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता दिवसरात्र आम्ही आपल्या सेवेत होतो. म्हणतात ना, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण.! त्याप्रमाणे एक संपादक म्हणून मी फार काही नाव कमविले आणि आरोग्य गमविले आहे. अगदी काल परवा मी ८ दिवस आॅक्सिजनवर होतो. तरी आमच्या बातम्यांचा खंड पडला नाही. नि:शब्द कष्ट घेऊन आजवर अगदी निर्भिड लिखान आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. 

      अर्थात माझे प्रतिनिधी सुशांत पावसे, आकाश देशमुख, महेश जेजुरकर, शंकर संगारे, सुशांत आरोटे यांच्यासह जे कोणी ज्ञात अज्ञात वाचक ही लिंक शेअर करतात. हे सर्व श्रेय मी त्यांना देतो. कळत-नकळत आमच्याकडून आपले मन दुखावले गेले असेल. कधी अनावधानाने चुकीचे वृत्तांकन झाले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो.

      आज १ कोटी वाचकांचा गुणवत्तापुर्ण वर्धापन दिन म्हणून आम्ही एक विशेष पुरवणी काढत आहोत. रोखठोक सार्वभौमने अनेकांना मोठे केले आहे. मात्र, हे फुकटचे मोठेपण मिरवणारे आता आमच्या लक्षात आले आहे. तरी जे आमचे हितचिंतक आहेत. त्यांनी स्वत:हून जाहिरातीसाठी संपर्क साधावा. तसेच १ कोटी वाचकांच्या निमित्ताने आम्ही "वॉरियर्स" म्हणून काही निवडक व्यक्तींना सन्मानित करत आहोत. तुम्हाला कोणचे योग्य नाव वाटले तर सुचवा.

जाहिरातीसाठी संपर्क अकोले : ८८८८७८२०१०, ८२०८५३३००६, संगमनेर : ८३०८१३९५४७, राजूर ९०११२२३३१२, अकोले ९३७३२३९१४.

              संपादकीय

             सागर शिंदे