बांध फोडला म्हणून दांडा डोक्यात टाकला.! दोन गटात मारामारी, सहा जणांवर गुन्हे दाखल.!
सार्वभौम (अकोले) :
शेताचा बांध फोडल्याच्या कारणाहून अकोले तालुक्यातील बेलापूर येथे दोन गटात हाणामार्या झाल्याची घटना शनिवार दि. 10 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. यात श्रद्धा कौलास आंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांना आरोपी करण्यात आले आहे. तर भाऊपाटील बाबुराव आंबरे (रा. हिवरगाव आंबरे, ता. अकोले) यांच्या फिर्यादीनुसार दोघांना आरोपी करण्यात आले आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही घटनेत सहा जणांना आरोपी केल्याची माहिती अकोले पोलिसांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाऊपाटील बाबुराव आंबरे (रा. हिवरगाव आंबरे, ता. अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी कौलास प्रभाकर आंबरे व श्रद्धा कौलास आंबरे (रा. हिवरगाव आंबरे, ता. अकोले) यांनी मागिल भांडणाचा राग मनात धरुन भाऊपाटील आंबरे यांची पत्नी मंगला व मुलगा श्रीकांत यांस लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन वाईट-वाईट शिविगाळ केली. या दरम्यान ते हा वाद सोडविण्यासाठी गेले असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली. तर श्रद्धा यांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडे डोक्यात मारुन जखमी केले आहे व आमच्या नादाला लागाल तर ठार मारुन टाकू अशी धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे.
तर, श्रद्धा कौलास आंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कौलास यांनी आरोपी श्रीकांत यांना विचारणा केली की, तू बांध का फोडलास? त्याचा राग आल्यामुळे, श्रीकांत भाऊपाटील आंबरे यांनी श्रद्धा व कौलास यांना लाकडी दांड्याने मारहाण केली. तर मंगल आंबरे, जनाबाई आंबरे, भाऊपाटील आंबरे यांनी शिविगाळ, दमदाटी करुन लाथाबुक्कयांनी मारहाण केली. जर परत आमच्या नादाला लागाल तर तुम्हाला ठार मारुन टाकू अशी धमकी दिली. यात श्रद्धा यांच्या गळ्यातील काही सोन्याचे दागिने गहाळ झाल्याचे त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान या दोन्ही घटना लक्षात घेता पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करुन घेतले आहे. सध्या यात जे कोणी जखमी आहेत ते किरकोळ असून त्यांनी वैयक्तीक पातळीवर उपचार घेतले आहेत. या दोन्ही घटना आता कायद्याच्या चौकटीत असून जशा फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास गोराणे करीत आहेत.