अकोल्यात जमिनिच्या वादातून कुऱ्हाडीने डोक्यात घाव.! तिघे आरोपी

 

सार्वभौम (अकोले) :- 

              अकोले तालुक्यातील विरगाव येथे शेतीच्या जुन्या वादातून दोन गटात कुऱ्हाडीने मारहाणी झाल्याची धक्कादायक घटना दि. २ आॅक्टो २०२० रोजी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे. यात भागवत गबाजी कुमकर (वय ५७, रा. विरगाव, ता. अकोले, जि. अ. नगर) यांना कुऱ्हाडीने बेदम मारहाण करण्यात आली असून त्यांच्या डोक्यात सात टाके पडले आहेत. याप्रकरणी सोपान संपत कुमकर, पोपट उर्फ बाजीराव संपत कुमकर, कौसाबाई संपत कुमकर (सर्व रा. विरगाव) या तिघांना यात आरोपी करण्यात आले आहेत.

         याबाबत सविस्तर माहिती अशी की, भागवत कुमकर हे २ तारखेला त्यांचे गट नं ८५४ मध्ये ट्रॉक्ट्रर घेऊन गेले होते. या दरम्यान ते विहिरीकडे जात असताना आरोपी हे तेथे आले व त्यांनी भागवत यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. त्यांचे जमिनिचे जूने वाद काढून भागवत यांना ट्रॉक्ट्ररच्या खाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुला सांगितले होते ना की आमच्या शेतात आणि विहिरीकडे येथे यायचे नाही म्हणून. असे म्हणत भागवत यांना ट्रॉक्ट्ररसह पेटून देण्याची धमकी देण्यात आली.

      दरम्यान, आरोपी हे खरोखर पेटून देतात की काय.! या भितीने फिर्यादी घाबरले असता आरोपी १ सोपान संपत कुमकर याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीच्या तुंब्याने भागवत यांच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर तसेच उजवे हाताच्या मनगटावर मारहाण केली. तर या पलिकडे  डोक्यावर कुऱ्हाडीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. या मारहाणीत भागवत यांच्या डाव्या हाताचा कोपरा फॅक्चर झाला असून डोक्यात सात टाके पडले आहेत असे फिर्यादीत म्हटले आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसले करीत आहेत.

        दरम्यान, सोपान संपत कुमकर यांनी देखील भागवत गबाजी कुमकर यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. यात सोपान यांच्या  अर्जानुसार भागवत यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद अकोले पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे, तुर्तास भाऊबंदकीचा वाद आता न्यायालयात जाऊन पोहचला असून कलम ३२६ मुळे या प्रकरणात दुसऱ्या गटाला हे प्रकरण जड जाण्याची शक्यता आहे.