अकोलेकरांचे डोके ठिकाण्यावर आहे काय? आजी माजी आमदारांवरील राजकारण थांबवा.!
सार्वभौम (अकोले) :
मानवी प्रवृत्ती ही विकासाची आणि सदभावना बाळगणारी असली पाहिजे तेव्हा खरा एक सक्षम समाज उभा राहत असतो असे म्हटले जाते. मात्र, दुर्दैवाने अकोले तालुक्यात मानसांची कमी आणि मेंढरांच्या डोक्याची मानसिकता असणार्यांची संख्या वाढते आहे की काय? असा प्रश्न उभा ठाकला जाऊ लागला आहे. कारण, एक नित्तांत गरजेचा अजेंडा घेऊन ना. थोरात, आ. डॉ. किरण लहामटे व माजी मंत्री पिचड हे एका व्यासपिठावर आले काय आणि तालुक्यातील नतदृष्ट मुठभर लोकांनी त्याचे भांडवल सुरू केले काय. काय तर म्हणे तेथे माजी मंत्री साहेबांना पुढाकर देण्यात आला, स्वत: आमदारांनी त्यांचा नामोल्लेख करीत त्यांच्या ज्येष्ठत्वाचा आदर केला. आता या गोष्टी तालुक्यातील जनतेने प्रचंड सकारात्मक घ्यायला हव्या होत्या. दोन कट्टर विरोधक कोविडशी लढण्यासाठी एकत्र येत एका महत्वपुर्ण हॉस्पिटलचे उद्घाटन करतात. मात्र, नाही.! ख्वाडा घालून राजकारण करणार नाही ते राजकारणी कसले? उलट विद्यमान आमदारांनी मोठेपणा दिला हे लक्षात घेऊन तालुक्यात राजकारणाविरहीत यांची मैत्री कशी घडवून आणता येईल यासाठी प्रयत्न करायचे सोडून दिले आणि लोक नको त्या क्लिपा फिरवत तेरे बसकी बात नाही, तेरे बाप को भेज! असा अपप्रचार करीत तालुक्यातील संवेदनशिल वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे कोठेतरी थांबले पाहिजे. राजकारणाच्या पलिकडे तालुक्याला एक वेगळी संस्कृती आहे. काल एकमेकांनी एकमेकांचा आदर राखला तोच पुढे वृद्धींगत होण्यासाठी तरुणांनी आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे अन्यथा हे असे चालु राहिले तर हा व्यक्तीद्वेष अधिक वाढत गेल्याशिवाय राहणार नाही असे अनेकांना वाटते आहे.
अकोले तालुक्यात विधानसभेच्या निमित्ताने एक नवे परिवर्तन जनतेला पहायला मिळाले. मात्र, दुर्दैवाने येथे 8 महिन्यानंतर ते ही खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन बेड पहायला मिळाला हेतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे फार मोठे अपयश म्हणावे लागेल. कोणी काहीही म्हटले तरी, आज अकोले तालुक्यात 1 हजार 891 रुग्ण मिळून आलेले आहेत तर निव्वळ कागदावर 26 जणांचा मृत्यू झालेला आहे. मात्र, वास्तवत: ही संख्या फार मोठी आहे फक्त झाकली मुठ सव्वा लाखाची. अशी परिस्थितीत असताना एक दुर्गभ भागातील भांडकोळी डॉक्टर स्वत: 35 खाजगी व 25 सरकारी ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देतात ही तालुक्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कारण, तुम्हाला आश्चर्य वाटेल की, अगदी किड्या मुंगीसारखे तडफडून येथील तरुणांनी आपला जीव सोडला आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी संगमनेर गाठून अवघ्या पाच सहा दिवसांचे लाखो रुपयांचे बील भरले आहेत. कदाचित ही सुविधा लवकर प्रशासन उभी करु शकले असते तर आज अनेकांना आपला जीव गमवावा लागला नसता. अगदी सामान्य माणूस विचार देखील करु शकत नाही. इतके विदारक चित्र अकोले तालुक्यात आजवर निर्माण होऊन गेले आहेत.
एकतर कोरोनावर अद्याप लस नाही. जे काही सुरू आहे. ते सर्व सो-सो सुरू आहे. अशात अकोल्यात आरोग्य यंत्रणेकडे आजवर स्वत:चे 75 (खानापूर) वगळता सुसज्ज असे कोणतेही बेड नव्हते. सुदैवाने साखर कारखाण्याकडून 100 बेड मिळाल्यानंतर कोठेतरी जीव भांड्यात पडला होता. मात्र, तरी देखील मुळ प्रश्न उभा होता तो म्हणजे ऑक्सिजन बेडचा तो प्रश्न काल खर्या अर्थाने मार्गी लागला आहे. मात्र, दुर्दैवाने कधी आजी माजी आमदार आणि त्यात नामदार हे कधी एकत्र येत नाहीत. आले तर त्यावर किती मोठे रणकंद माजविले जात आहे. उलट, हे दोन व्यक्ती राजकीय व व्यक्तीद्वेष सोडून एका छताखाली आले असते तर यापुर्वीच तालुक्याला कोरोनाशी लढण्याचे बळ मिळाले असते. मात्र, तसे होताना दिसले नाही. एव्हाना आजी माजी आमदारांच्या सभोवताली जी अविचारी यंत्रणा आहे तीच मुळत दोन व्यक्तींमधील द्वेष वाढविण्याचे काम करीत असल्याचे समोर येऊ लागले आहेे. तसेही राजकीय मतभेद कोठे नसतात? मात्र, एक व्यासपीठावर आल्यानंतर ते आपोआप लोप पावतात. हेच चित्र डॉ. किरण लहामटे व माजी मंत्री यांच्याबाबत पहायला मिळाले. मात्र, दुर्दैवाने हा कार्यक्रम संपल्यानंतर काही हलचाली अशा टिपल्या गेल्या की, त्यातून सामाजिक तेढ कशी निर्माण होईल याकडे कटाक्षाने लक्ष केंद्रीत करण्यात आले आणि तेच सोशल मीडियात फिरवून आजी माजी नेत्यांमध्ये द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला गेला. आता या गोष्टीकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. अन्यथा येणार्या काळात तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असे सुज्ञ व्यक्तींचे मत आहे.
हे काहीही असले तरी तालुक्यात राजकीय एकोपा नांदु नये यासाठी एक वेगळी यंत्रणा काम करताना दिसते आहे. हे विदुषकी वृत्तीचे लोक पोलीस प्रशासनाने शोधुन काढले पाहिजे. देश एकीकडे कोरोनाशी झुंज देत असताना दुसरीकडे काही लोक राजकीय पोळ्या भाजण्याचे काम करीत आहेत. खरंतर पाच वर्षे जनतेला तुमच्या राजकारणाचे काही एक घेणेदेणे नसते. मात्र, या दरम्यानच्या काळात प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी जनतेच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची अपेक्षा असते. ती अपेक्षा भंग झाली की जनता पाच वर्षानंतर सगळ्यांचे ऑडिट करते. या सगळ्यात कोणी राजकारण न करता सामाजिक एकोपा कसा राखता येईल हे पाहणे अपेक्षित आहे.