शिवसेनेचा अतिरेक आणि कंगणाची धमकी.! सेनेचा सुड आणि राज्यातील राजकीय दंगल.! लवकरच वादळ येणार!


सार्वभौम (मुंबई) :- 

                      खरंतर इतिहासाची वारंवार पुनरावृत्ती होते हे कोणी नाकारु शकत नाही. याच वाक्याचे प्रतिबिंब पुन्हा महाराष्ट्रात उमटताना दिसू लागले आहेत. कारण, गेल्या काही पाच वर्षात भाजपने जे सुडाचे राजकारण करुन भाजप मोठा केला असा आरोप झाला. आज दुर्दैवाने ते सत्तेत नाहीत. मात्र, त्यांचा मित्रपक्ष शिवसेना महाराष्ट्राच्या गादीवर विराजमान झाली. अर्थातच वान नाही परंतु गुण लागला अशीच टिका त्यांच्यावर होऊ लागली आहे. कारण, अभिनेत्री कंगणा राणवत यांच्या वाकयुद्धाचे रुपांतर चक्क घरं तोडोफोडीत झाले! हा आवेश आणि सुडबुद्धी नाहीतर काय आहे? खरंतर कंगणा ते शिवसेना आणि केंद्रसरकार ते राज्यसरकार अशी चढाओढ आता सुरू झाली आहे. त्यामुळे, येणार्‍या काळात राज्यात फार मोठे वादळ उभे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, काहीही झाले तरी लोकशाही पद्धतीला हे घातक आहे. जे संविधानाचा आणि पुरोगामीत्वाचा उदोउदो करतात असे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सरकारमध्ये असे प्रकार व्हावेत हे कोठेतरी प्रत्येकाला बोचण्यासारखे आहे. त्यातल्या त्यात शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या सारकारमध्ये लोकशाही ऐवजी हुकूमशाही अनुभविण्यास मिळते हे देखील एक शल्याच अनेकांच्या मनातला बोचते आहे. तर दुसरीकडे कार्यालयावर हाथोडा पडल्यानंतर चवताळलेल्या कंगणा यांनी जो मुख्यमंत्र्यांच्या बाबत एकेरी उल्लेख केला. तो देखील आपल्या संस्कृतीला गोलबोट लावल्यासारखा आहे. त्यामुळे, एकीकडे कंगणा ते शिवसेना आणि केंद्रसरकार ते राज्यसरकार असा वाद सुरू झाला असून यात रिपाई आणि छोटे-मोठे नेते एक बळीचा बकरा होऊन बसले आहेत. काल ट्विटरवरील एक पोष्ट आज भयंकार मोठे युद्धच होऊन बसली आाहे. आता हा वाद नेमके कोठे थांबतो याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

सुशांत राजपूत या अभिनेत्यांने आत्महत्या केली आणि देशात रिया, ड्रग्स, मुंबई पोलीस, एक तरुण मंत्री, कंगणा आणि लपवाछपवी हेच वाक्य वारंवार कानावर पडू लागले. हे वास्तव आहे की, फिल्म जगतात प्रत्येकाचे शोषण होते, त्यातुनच सुशांतचा जीव गेला. मात्र, तपासात इतके धागेदोरे पुढे आले की, रियाचे प्रेम, नंतर ड्रग्स, हरॉशमेंट करणारे अनेक सेलिब्रिटी आणि एक तरुण मंत्र्यामुळे सगळे राजकारण ढवळून निघाले. यात कंगणा राणावत काही धक्कादायक खुलासे करीत असताना राऊत यांनी नेहमीप्रमाणे शब्दशस्त्रांचा नॉटी वापर करीत तिच्यावर टिकेची झोड ऊठविली. खरंतर सरकारचे एक जबाबदार घटक म्हणून यांनी फार संयमाने निर्णय घ्यायला हवेत. मात्र, तसे होताना दिसत नाही. एकीकडे गृहमंत्री म्हणतात कंगणाला मुंबईत येण्याचा आधिकार नाही. दुसरीकडे शिवसेना म्हणते तिला मुंबईत फिरु देणार नाही. तिसरीकडे काँग्रेसे भाई तर भलत्याच भुमिकेत आहेत. त्यामुळे, येथील राजकीय अराजकता किती मोठी आहे. हे सामान्य व्यक्तींच्या बुद्धीपलिकडे आहे.



आता कंगणा राणावत या अभिनेत्रीने तिच्या ज्या भूमिका मांडल्या किंवा मुंबईला ती पाकव्याप्त काश्मिर म्हणते याचे जर कोणी समर्थन करीत असेल तर तो नक्कीच चूक आहे. मात्र, तिला असा काय अनुभव आला कि जो तिच्या शब्दांना इतके प्रखर करुन गेला. हे देखील अभ्यासणे गरजेचे आहे. कारण, भारतात राहणारा कोणताही व्यक्ती पाकिस्तानावर प्रेम करु शकत नाही. मात्र, पराकोटीच्या वेदना आणि न अन्याय झाल्यानंतर तीने हे शब्दप्रयोग केले आहे. तर सरकारवर बोलताना तिने टिका जरी केली असेल तरी ती पचविण्याची ताकद यांच्यात पाहिजे. मात्र, कोणाचाही शब्द पकडायचा आणि तो रबरासारखा ताणून त्याच्याशी सामना उभा करायचा ही सेनास्टाईल मात्र आजकाल सगळ्यांनाच खटकू लागली आहे. खुद्द पवार साहेबांनी देखील असे राजकारण कधी केले नाही ना त्यांच्या हे अंगवळणी आहे. त्यामुळे, ते वारंवार सरकारचे कान पिळताना दिसून येतात. मात्र, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे! काहीच फरक पडायला तयार नाही.

खरंतर या राज्याच्या अराजकतेचा फायदा केंद्रसरकार घेणार नाही असे झाले तरी नवलच! त्यांनी कंगणाला केंद्रीय वाय प्लस सुरक्षा देत थेट महाराष्ट्रात पाठविले. एकतर शिवसेनेने चालु संसार मोडून भलताच संसार उभा केला. त्याची सल राज्यापेक्षा दिल्लीत जास्त आहे. त्यामुळे, दिल्लीचे कटाक्षाने थेट महाराष्ट्रावर आहे. त्यामुळे, येणार्‍या काळात कोठेतरी संधी साधून शिवसेना व काँग्रेसचा कुच्चामोड करायचा हे त्यांच्या डोक्यात असावे. म्हणून राज्यात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणविस हे राष्ट्रवादीशी पराकोटीचा विरोध पत्कारत नाही. मात्र, काँग्रेस व शिवसेनेला ते सोडत नाही. म्हणूनतर फडणविस अजित दादांचे कौतुक करताना दिसून येतात. याचे उत्तम प्रमाण म्हणजे एकनाथ खडसे यांनी जी माजी मुख्यमंत्र्यांवर टिका केली ते सर्वकाही सांगून जाते. तर दुसरीकडे केंद्राने कंगणाला संरक्षण देऊन स्वत: राज्यात हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे, एकीकडे नारायण राणे बोलतात, चंद्रकांत पाटील बोलतात, राम कदम आणि अन्य मान्यवर अजेंड्यावर आले. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी मात्र संजय उशिरापर्यंत राऊत यांच्यासारखे हाताची घडी तोंडावर बोट अशी भुमिका घेतल्याचे पहायला मिळाले आहे.                   



आता राजकारणाच्या पलिकडे पाहिले तर प्रशासकीय दृष्ट्या मुंबई महानगरपालिकेची भूमिका ही त्यांना पटत असली तरी ती सामान्य व समझदार नागरिकाला मात्र एक प्रकारची हिटलरशाहीच वाटेल अशी आहे. कारण, कंगणा आणि शिवसेना असे वाकयुद्ध सुरू होते कोठे नाहीतर शिवसेनेच्या ताब्यात असणारी महापालिका कंगणाच्या कार्यालयात जाते, तिच्या बिल्डींगचे मोजमाप सुरू करते, काही तासात नोटीस आणि लगेच काही तासात शेकडो पोलीस व जेसीबी, पोकलेन आणि इलिक्ट्रॉनिक यंत्रणा! का? तर म्हणे तिचे कार्यालयात अवैध बांधकामात येते. वा रे उद्धवा! अजब तुझे सरकार. म्हणजे सोबत राहुन गोड बोललं की अवैध ते देखील वैध! आणि विरोधात बोललं की वैध ते देखील अवैध! इतका अतिरेक! शिवरायंच्या नावाने राजकारण चालविता, राजे म्हणायचे, माझ्या रयतेच्या राज्यात कोणा स्त्रीवर अन्याय नको! मग एक महिला परराज्यात असताना तिच्या कार्यालयावर जेसीबी चालविणारे कोण? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेतर नोटीस दिल्यानंतर कंगणा मुंबईत येत होती. मात्र, ती येईपर्यंत देखील पालिकेला दम निघाला नाही. यावर उत्तर देताना महापौर म्हणतात तक्रार आली म्हणून कारवाई केली. आता मुंबईत कंगणा या एकाच व्यक्तीचे अवैध किंवा बेकायदा बांधकाम आहे का? आणि अर्ज आल्याआल्या लगेच कारवाई! इतकी तत्परता आहे तर हजारो अर्ज प्रलंबित आहेत. त्याचे उत्तर काय? तर वकीलाने न्यायालयात अपिल केल्यानंतर देखील ही कारवाई थांबेना, शेवटी न्यायालयाने दुपारी स्थगितीचे आदेश दिले तेव्हा ही कारवाई थांबली. आता या पलिकडे अतिक्रमण किंवा अवैध म्हणजे काय? हे तुम्हाला माहित आहे. मात्र, या कार्यालयातील खुर्च्या, टेबल, काचा आणि सुशोभनीय वस्तुंची तोडफोड करण्यात आली. हा प्रकार लोकशाहीचा नव्हे तर सुडबुद्ध आणि आवेशाचा आहे. असे कंगणाच्या वकीलांना सांगितले.

एकंदर सुशांत शांत झाला मात्र, त्याच्यानंतर संपुर्ण देश अशांत होऊन येथे  राजकीय अराजकता माजू लागली आहे. पालिकेच्या कारवाईनंतर कंगणा राणावत यांनी मुख्यमंत्र्यांबाबत जे काही एकेरी वक्तव्य केले ते नक्कीच असंस्कृत पणाचे आहे. मात्र, तिच्यावर अन्याय झाल्यानंतर एका चवताळलेल्या महिलेचा तो आवेश होता. असे बोलले जात आहे. मात्र, त्याचे कोणीही समर्थन करु शकत नाही. एकंदर तिच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईबाबत शरद पवार देखील म्हणतात की, ही वेळ योग्य नव्हती, रामदास आठवले देखील म्हणतात देशात लोकशाही आहे, मात्र राज्यात यांची हुकूमशाही सुरू आहे. त्यामुळे, अनेकांना खात्री आहे की, शिवसैनिकांना राज्याची भूमिका नक्कीच योग्य वाटेल. ते समर्थन देखील करतील. मात्र, स्वत:वर वेळ आल्याशिवाय त्याचे दु:ख आणि सल लक्षात येत नाही हेच खरे. तुर्तास तरी शिवसेनेकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, हे असेच सुरू राहिले तर ठाकरे सरकार येणार्‍या काळात अस्थिर होऊ शकते असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. 

- सागर शिंदे